महाविद्यालयाची दारे उघडली

राज्यातील महाविद्यालये प्रदीर्घ काळानंतर बुधवारपासून सुरू झाली आहेत. गेले दीड वर्ष कोरोनाच्या साथीमुळे बंद असलेली ही ज्ञानाची दारे अखेर खुली होत आहेत, ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. याआधीही या स्तंभातून आम्ही कोरोनाच्या लाटेची अखेर कशी होत चालली आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर कशी येऊ लागली आहे, यावर भाष्य केले होते. खास करून दिवाळीच्या सणानिमित्त दुकाने, मॉल आणि रेस्टॉरंट यांच्या वेळा वाढवून देऊन अर्थात नियमांचे पालन करून ही सूट देण्यात आली. त्यामुळे लोकांना मोकळेपणाने दिवाळीचा सण साजरा करता येऊ शकेल. मात्र हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा एक मोठा वर्ग या महामारीच्या काळात वेगळ्याच प्रकारच्या ताणतणावातून, करिअरच्या संघर्षातून आणि बंदिस्त जगत असताना शिक्षणाच्या पायर्‍यांशी होत असलेल्या अडथळ्यातून जात होता. शालेय शिक्षण संपल्यावर महाविद्यालयीन, पदवी शिक्षणाची स्वप्ने असतात. आजकाल महाविद्यालयीन शिक्षण सर्वत्र उपलब्ध झाले आहे आणि अनेक छोट्या गावांतही ते शिक्षण सर्वसामान्यांनाही घेता येते, हे खरे आहे. आजकाल असंख्य पदवीधर निर्माण होतात आणि ती काही फार अप्रुपाची गोष्ट राहिली नाही, हेही खरे आहे. मात्र आजही एक असा मोठा वर्ग आहे, त्याच्यासाठी हे अजूनही स्वप्न आहे आणि पदवीधर होणे हा फार मोठा संघर्ष आहे. त्यात या महामारीने मोठा अडथळा निर्माण केला होता. तो आतापासून दूर होत आहे, याबद्दल केवळ विद्यार्थी वर्गानेच नाही, तर एक सुशिक्षित समाज म्हणूनही आपण सगळ्यांनी त्याचे स्वागत केले पाहिजे. काही प्रमाणात सधन वर्ग सोडला तर फार मोठा वर्ग मध्यमवर्गीय आणि कष्टकरी, कामगार वर्ग आहे. त्यांच्या मुलांसाठी पदवीचे शिक्षण ही फार मोठी गोष्ट आहे. आर्थिक संघर्ष तर असतोच, शिवाय अभ्यासासाठी आवश्यक असलेले वातावरण, परिसर, शांतता याचीही अनेकदा वानवा असते. घरासाठी काम करावे लागते ते वेगळेच. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन परिसर, वाचनालय आदी हे आवश्यक वातावरण बहाल करतात. प्राध्यापक मंडळी भेटतात, वर्गाबाहेरच्या चर्चा, वैचारिक देवाणघेवाण शक्य होते. तसेच, सहविद्यार्थी भेटतात, त्यांच्यात चर्चा होतात, स्वप्ने पाहिली जातात, ती आकाराला आणली जातात. यात महत्वाचा असतो तो वेळ. दहावीनंतरची दोन वर्षे बारावी, त्यानंतर विविध शाखांतून पदवीपर्यतचे अथवा दहावीनंतर पदविकापर्यंतचे शिक्षण घेण्याच्या वाटा सुरू होतात. त्या अभ्यासक्रमांचा, पदवीचा कालखंड ठरलेला असतो. त्यानंतर आयुष्याच्या मैदानात उतरण्याचा टप्पा असतो. नोकरी, व्यवसाय करून आपले कुटुंब सावरणे आणि ते करत असताना स्वत:साठीचेही एक कुटुंब निर्माण करणे, घराची व्यवस्था करणे हेही या टप्प्यानंतरची महत्त्वाची कर्तव्ये किंवा स्वप्ने असतात. त्यामुळे या पदवीपर्यंतच्या खर्चाची गणिते कशीबशी जुळवलेली असतात आणि तो टप्पा संपला की या खर्चाचा होणारा गुणाकार रोखून त्याला भागाकारात बदलण्याची गणिते मांडलेली असतात. मात्र करोना साथीने ही सगळी गणिते बिघडवून टाकलेली आहेत. अनेकांच्या गुणाकारातच वाढ झालेली आहे आणि अनेकांच्या आईवडिलांचे रोजगार अडचणीत आल्याने स्वप्नांचे भागाकार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, काहीही असले तरी आयुष्य पुन्हा जुळवून घ्यावे लागते. तसे देशातील तमाम तरुण विद्यार्थ्यांनाही ते जुळवून घ्यावे लागेल. कारण, ही महामारी जीवघेणी होती आणि मृत्यूने ज्या प्रकारे जगभर थैमान घातले ते या तरुण पिढीनेही पाहिले आहे. त्यामुळे एक प्रकारे महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा महाविद्यालयांच्या प्रांगणात शिरणार्‍या तरुण सैनिकांसारखी त्यांची मन:स्थिती असणार आहे. दीर्घ काळाने ते महाविद्यालयाच्या भिंतीना स्पर्श करतील आणि आपल्या शिक्षकांना भेटतील. कोरोनाच्या साथीच्या आधी महाविद्यालयाची इमारत त्यांना जशी दिसली त्यापेक्षा आता ती खूप वेगळी भासणार आहे. प्राध्यापकवर्ग आणि अन्य प्रशासकीय वर्गही वेगळे दिसणार आहेत. कारण, ते स्वत: बदललेले आहेत. या महामारीने त्यांना आयुष्याच्या प्रागंणात पाऊल ठेवत असतानाच खूप मोठे धडे दिले आहेत. आयुष्याची क्षणभंगुरता त्यांनी अनुभवली आहे. पोक्तपणात प्राप्त होणारे आयुष्याच्या मोलाचे ज्ञान त्यांना ऐन तरुणपणीच प्राप्त झाले आहे. मात्र हा पोक्तपणा त्यांच्या स्वच्छंदी तारुण्याच्या उत्साहाच्या आड येता कामा नये. उलट हा उत्साह अधिक सकसपणे अभ्यास करण्यास, अधिक उत्कटतेने आयुष्य जगण्यास प्रेरक ठरला पाहिजे. कारण, महाविद्यालयात आज पडणारी पावले उद्याचा समाज, देश साकारणारी आहेत.

Exit mobile version