परिवर्तनवादी हरपला

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक घडामोडींत सहभागी झालेले कार्यकर्ते तसेच अनेक राजकीय व सामाजिक परिवर्तनवादी चळवळींत सक्रीय सहभागी झालेले ज्येष्ठ शाहीर लीलाधर हेगडे यांच्या निधनाने देशातील महत्त्वपूर्ण घडामोडींना आकार देणारा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेले तरुण स्वातंत्र्य सेनानी होतेच, शिवाय त्यानंतर अनेक सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक लढ्यातही त्यांचा सातत्याने सक्रीय सहभाग असे. त्यातील ठळक म्हणजे सानेगुरुजी यांचा पंढरपूर सत्याग्रह, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही होय. अशा ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचे सक्रीय साक्षीदार असलेले लीलाधर हेगडे यांनी पुढे राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षपदही भूषवले होते. सेवा दलासह समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी प्रचंड योगदान दिले. आपल्या शाहिरीचा आवाज त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि मानवतेच्या मूल्यांचा स्वर उंचावण्यासाठी केला. ती मूल्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून जपली व त्यांचा प्रसार आणि प्रचार केला. त्या दृष्टीने ते एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी महाराष्ट्र दर्शन, शिव दर्शन, भारत दर्शन अशा एकाहूनएक सरस कलापथकांद्वारे राष्ट्र सेवा दलाला देशभरात वेगळी ओळख मिळवून दिली. खडा आवाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते. राष्ट्र सेवा दल कलापथकातून अनेक कलाकार जसे त्यांनी घडवले तशी माणसेही घडवली. त्यांनी सेवा दलाच्या कलापथकाचे नेतृत्व करताना गाणी, वगनाट्य या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य केले. रंजनाच्या माध्यमातून लोकशाही-समाजवादी तत्त्वांचा प्रसार केला. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली. अस्पृश्यता निवारण चळवळीतील त्यांचे मोठे काम आहे. सांताक्रूझ चुनाभट्टी येथील झोपडपट्टी परिसरात त्यांनी साने गुरुजींच्या नावाने आरोग्य मंदिर आणि शाळाही सुरू केली. त्यांना अभिनयाचीही उत्तम जाण असल्याने ते पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ लोकनाटकात ‘रोंग्या’ची भूमिका करत. सुमारे सहा सात वर्षांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून ते आजारी होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी ठरणारा हा राष्ट्र सेवा दलाचा डफ आता शांत झाला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

Exit mobile version