अंध:काराचा नायनाट करुन सार्यांच्याच जीवनात प्रकाश दाखविणारा दीपोत्सव, अर्थात दिवाळी सण वसूबारस पासून सुरु झालेला आहे. आता पुढील पाच दिवस सारा आसमंत प्रकाशमय होऊन उजळून निघेल. गेल्या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे दिवाळीचा सण उत्साहात साजरा करता आला नाही. पण, यावर्षी सरकारने कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करुन सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गेले दीड वर्षे रुतलेले अर्थचक्रही आता गतिमान होताना दिसत आहे. हे चक्र असेच सुरु ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. यासाठी सर्वांनीच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे बनलेले आहे. दिवाळी आली की सर्वांनाच वेध लागतात ते बोनसचे. त्यावरुन कामगार संघटना आक्रमक होतात. सरकार, कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन, उपोषणे केली जातात. याचा त्रास सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात होतो. सर्वसामान्यांचे नाक दाबले की राज्यकर्ते, कंपनी व्यवस्थापन नमते घेते, हे कामगार संघटनांना चांगलेच ज्ञात असल्याने ऐन सणावारालाच ही आंदोलने होतात. त्यातून मग जनतेला त्रास जाणवू लागला, की राज्यकर्ते मागण्या मान्य करुन रुतलेली गाडी पुन्हा रुळावर आणतात. हे वर्षानुवर्षे चाललेले आहे. अर्थात, त्याला आमचा कधीच विरोध नाही. कारण, जे कर्मचारी वर्षभर प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना नियमानुसार त्यांचे हक्क हे मिळालेच पाहिजेत. त्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलने केली तरी, ती आंदोलने त्यांच्या हिताचीच असतात. त्यामुळे सरकारनेही असे सणवार सुरु होण्यापूर्वीच जर आवश्यक मागण्या पूर्ण केल्या, तर भविष्यात असे संप, आंदोलने कमी होत राहतील आणि जनतेलाही त्याचा त्रास कमी होईल. पण, प्रत्येकाला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी हवी असते. ती या माध्यमातून घेतली जाते. आतासुद्धा एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास बसलेले होते. अर्थात, त्या आंदोलनास आमचा पाठिंबाच आहे. कारण, अत्यल्प पगारात हे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी काम करीत असतात. गेल्या दीड वर्षांपासून तर एसटीची चाके रुतूनच राहिलेली आहेत. त्यामुळे लालपरीचे अर्थचक्रच बंद पडलेले होते. ते आता जरा कुठे हलू लागलेले आहे. ते सुरु राहिले तरच राज्याच्या विकासाचा गाडा सुरु राहणार आहे. कारण, राज्याच्या विकासात एसटीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे लालपरी सुरु ठेवणे, हे राज्यकर्त्यांबरोबरच एसटी महामंडळाचे कर्तव्य आहे. यासाठी या एसटी कर्मचार्यांनी ज्या काही मूलभूत मागण्या केलेल्या आहेत, त्या सरकारने पूर्ण करणे गरजेचे आहे. ‘पूर्णवेळ सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घ्यावे,’ ही एसटी कर्मचार्यांची मागणी रास्त आहेत. सरकारी कर्मचार्यांप्रमाणेच या एसटी कर्मचार्यांनाही सोयी-सुविधा प्राप्त होणे गरजेचे आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेऊन राज्याच्या विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या एसटी कर्मचार्यांना सरकारी कर्मचारी सेवेत सामावून घेऊन दिवाळीची भेट द्यावी. जेणेकरुन त्या एसटी कर्मचार्यांची दिवाळी गोड होऊन ते नव्या दमाने लालपरीची सेवा करतील.सरकारनेही दिवाळीनंतर तातडीने या मागण्यांबाबत विचार करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला आहे. एसटीप्रमाणेच सार्वजनिक व्यवस्थेत काम करणारे शेकडो घटक कार्यरत आहेत. मग त्यात पोलीस, आरोग्य सेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, लाखोंचा पोशिंदा बळीराजा, त्यावर अवलंबून असणारे विविध घटक आदींचा यामध्ये समावेश होतो. त्यांच्याही मागण्या सरकार तसेच ज्या कंपन्यांमध्ये हे घटक काम करतात, त्यांनीही त्या पूर्ण करुन या सर्वांची दिवाळी गोड करावी, अशी आग्रही मागणी आम्ही यानिमित्ताने करीत आहोत. दिवाळी हा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण असतो. वर्षातूनच एकदाच दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता माणूस प्रसंगी कर्ज काढून दिवाळी सण साजरा करीत असतो. कारण, त्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहर्यावर फुललेले हास्य बघायचे असते. त्यामुळे तो वर्षभर जीवतोड मेहनत करीत असतो. हे ऋतुचक्रासारखे सुरुच आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक संकटे आली. पावसाने उडालेला हाहाकार, जलप्रलय, साथीचे थैमान, वाढलेली महागाई अशी कितीतरी निसर्ग आणि मानवनिर्मित आव्हाने झेलत सर्वसामान्य उभा राहिलेला आहे. त्याला धीर देण्याचे काम सर्वच घटकांनी करणे गरजेचे आहे. राज्यकर्ते आपल्या परीने मदत, सहकार्य करीत असतात. अशावेळी समाजानेही आपले काही कर्तव्य आहे, अशा भूमिकेतून पिचलेल्या घटकाला मदत केली तर त्यांचीही दिवाळी आनंदात साजरी होईल. यासाठी सर्वांनीच सामूहिकपणे प्रयत्न करावेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून सर्वांनीच आपापसातील मतभेद विसरुन एकदिलाने राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे घडले तर सर्वांचीच दिवाळीच नव्हे, जगणेदेखील गोड होईल.
दिवाळी गोड व्हावी

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024