दृढनिश्‍चयी प्रेरक नेतृत्व

खरे नेतृत्व आपल्या अनुयायांसोबत आपला भवतालही आपल्या वास्तवाने परिवर्तीत करते. आपल्या सभोवतालची संस्कृती, अर्थव्यवस्था, कार्यपद्धतीला आकार देते. कालांतराने तो अवघा प्रदेशच त्या नेतृत्वाच्या प्रवृत्तीने, नावाने ओळखला जातो. रायगड जिल्ह्याला अशाच प्रकारे प्रगतीशील आकार देणार्‍या कुटुंबाचा वारसा आज समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, कष्टकर्‍यांचा आधार आणि प्रदीर्घ काळ आपल्या निश्‍चयी नेतृत्वाने शेतकरी कामगार पक्षाची पताका फडकावत ठेवणारे पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील. ते आज वयाची 66 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करताना त्यांच्या कर्तृत्वाचाही आढावा घेणे संयुक्तिक ठरते. भाई जयंत पाटील यांचा सकृतदर्शनी असलेला साधेपणा आणि स्वागतशीलता हा गुण त्यांच्या विशाल जनसमुदायाशी असलेल्या संबंधांचे रहस्य उलगडतो. त्याचबरोबर त्यांच्या दृढनिश्‍चयी आणि धाडसीपणाचे रूपही त्यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट होत जाते. त्याच्या जोडीला असलेली बुद्धीमत्ता आणि सखोल अभ्यास करण्याची वृत्ती त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात असलेल्या वेगळ्या स्थानाचे कारण सांगते. प्रदीर्घ काळ समाजाचे राजकीय नेतृत्व करताना आवश्यक असणारी दूरदृष्टी त्यांच्यापाशी किती आहे हे त्यांनी उभारलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक संस्थांद्वारे दिसून येते. त्यामुळे भाई जयंत पाटील म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी, संघर्ष करणार्‍या कष्टकर्‍यांसाठी वडिलधारकीचा आधार आहेत आणि संकटात असलेल्या जनतेसाठी मित्रासारखा मदतीचा हात आणि धीराचा आवाज आहेत. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते विधान परिषदेत अभ्यासू व विचारी नेते म्हणून ओळखले जातात. महान नेता तोच जो आपली वैचारिक बांधिलकीभोवती पक्की मांड ठोकतो आणि ती कोणत्याही परिस्थितीत सैल होऊ देत नाही. कोणत्याही तात्कालिक मोहाला बळी पडत नाही आणि आपल्या लक्ष्यावरून नजर हटू देत नाही. आणि त्याचबरोबर सभोवतालच्या सातत्याने बदलत राहणार्‍या, कधी आव्हानात्मक बनणार्‍या परिस्थितीशी चार हात करण्यासाठी, त्यावर मात करण्यासाठी आपल्या डावपेचात लवचिकता आणण्याइतका सजग असतो. भाईंनी हे ब्रीद कधीच सोडले नाही. दिलेले शब्द बदलले नाहीत. शब्द पाळायची, आपल्या ध्येयाशी कटिबद्ध राहण्याची अनेकदा किंमत मोजावी लागते. खरा नेता ती मोजण्यास घाबरत नाही. भाईंनी ती मोजली पण आपल्या शब्दाची किंमत राखली. म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली एक पिढी जाउन नवीन आली तरी त्यांचे नेतृत्व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ताजेतवाने आणि सरळसळते आहे. याचे कारण त्यांचे विचार आणि चिंतन नित्यनूतन आहेत. त्यांची भविष्याची स्वप्ने भव्य आणि त्यांची जीवनाची मूल्ये सर्वांना सामावून घेणारी आहेत, सोबतीने घेऊन चालणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवती नेहमी लोकांची गर्दी असते. लोकांत असताना भाई पूर्णार्थाने तळपत असतात. कारण जसे लोकांसाठी भाई हे स्फुरणीय नेते आहेत तसेच तमाम जनता ही भाईंसाठी चैतन्य आहे. इतका प्रदीर्घ काळ राजकीय नेतृत्व करत असताना, जिल्ह्यात शिक्षणासाठी शाळांचे जाळे उभारत असताना, आपल्या द्रष्टेपणाने जवळच्या देशाच्या आर्थिक राजधानीची सुबत्ता आपल्या प्रदेशात यावी यासाठी मार्ग निर्माण करताना, मजबूत वित्तीय आणि औद्योगिक संस्था उभारत असताना सगळे काही सहज झाले असणे शक्य नाही. हा दीर्घ प्रवास अडीअडचणींचा, संघर्षाचा आणि काही वेळा व्यक्तिगत दु:खाचाही असतो. भाईंनी त्या संघर्षाची कटुता आपल्या ओठांवर कधी येऊ दिली नाही आणि मनातही ठेवली नाही. दिलदारपणा आणि क्षमाशीलता हे त्यांचे छुपे गुण अनेकांच्या अनुभवांचा भाग आहेत. भाईंनी मात्र त्याचे कधी प्रदर्शन केले नाही. इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहायला गेल्यास भाई समृद्ध, विकसित समाजाचे भविष्य आणि संघर्षयुक्त चळवळींचा इतिहास याचा सुवर्णमध्य आहेत. रायगडमधील पहिला मोठा शेतकर्‍यांचा संघर्ष भाईंच्या आजोबांच्या नेतृत्वाखाली झाला. तेथून या प्रदेशाची राजकीय वाटचाल वेगळ्या पद्धतीने सुरू झाली. तोच वारसा पुढे चालवत भाई मार्गक्रमण करीत आहेत. मात्र त्याचबरोबर भविष्याची आव्हाने, प्रश्‍न आणि संघर्ष वेगळे आहेत. भावी नवीन पिढ्यांची स्वप्ने निराळी आहेत. नवीन आलेल्या माध्यमांची आव्हाने आणि त्याने आणलेल्या संधी वेगळ्या आहेत. भाईंची नजर तेथेही आहे. त्यामुळे ते इतिहास आणि भविष्याची कावड घेऊन कार्यरत असलेले वेगळे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी जिल्ह्यातील उणिवा हेरल्या आणि त्याला सक्षम असे तोडगे दिले. त्यांनी या प्रदेशाची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक सुबत्तेची साधने निर्माण केली. कष्टकरी, शेतकर्‍यांपासून कोळीबांधवांपर्यंत सर्वांच्या हक्कासाठी, त्यांच्या संघर्षात नेहमी त्यांच्या बरोबरीने उभे राहिले आणि त्यांचे नेतृत्व केले. विधान परिषदेत कार्यरत असताना अवघ्या राज्याच्या भलेपणाचा दृष्टीकोन ठेवून काम केले. त्यांची कार्यनिष्ठा अनुकरणीय ठरावी. आताही त्यांच्या पायाला दुखापत झालेली असताना, आधाराशिवाय चार पावले पुढे टाकणे अवघड असतानाही त्यांनी आराम करण्याऐवजी विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याला प्राधान्य दिले. आपल्या उपस्थितीने फरक पडतो, आपल्या शब्दांने फरक पडतो, हा विश्‍वास, हे विचार त्यांना कार्यरत ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समवयस्कांसाठी प्रेरक आणि तरुणांसाठी अनुकरणीय आहे. या तरुण, प्रेरक नेत्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त दैनिक कृषीवल परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा!

Exit mobile version