पोटनिवडणुकीचे धक्के

गेल्या आठवड्यात देशभरातील विविध लोकसभा तसेच विधानसभांच्या रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्के दिले आहेत तर अनेक बाबतीत चकितही करून सोडले आहे. वर्षभरात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार्‍या हिमाचल प्रदेशातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला जोराचा झटका बसला असून तेथील सर्व तीन विधानसभेच्या आणि मंडी ही लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकली आहे. बहुतेक ठिकाणी भाजपाला पिछेहाटीचा मुकाबला करायला लागला असून केवळ मध्यप्रदेशमध्ये त्याला जागा जिंकणे शक्य झाले आहे. अपेक्षेनुसार पश्‍चिम बंगाल मधील सर्व जागा तृणमूलने जिंकल्या आणि तेथे भाजपाला आपले अस्तित्व दाखवता आले नाही. कर्नाटकातही दोनपैकी एका जागेवर काँग्रेसने पुन्हा आपला पंजा कसल्याने त्यांना तेथे सत्ता असूनही एकाच जागेवर समाधान मानावे लागले. राजस्थानमधील दोन्ही जागा काँग्रेसने मिळवल्याने तेथेही भाजपाला निराशेचा सामना करावा लागला. महाराष्ट्रात देगलूर बिलोली या एकाच विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली आणि त्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा 41 हजारांहूनही अधिक मतांनी पराभव केला. याचा लाभ अंतापूरकर यांच्यापेक्षाही या विजयासाठी डावपेच आखणी करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना झाल्याची चर्चा असून ते पुन्हा प्रकाशझोतात आल्याचे दिसते. तसेच, दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारलेली दिसली. शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार महेश गावित यांना त्यांच्याहून जवळपास निम्मीच मते मिळाली. त्यामुळे एकीकडे शिवसेनेच्या या महाराष्ट्राच्या बाहेरच्या विजयाने वेगळी वाटचाल सुरू करून देणारा, तसेच सर्वांना चकित करणारा निकाल भाजपसाठी खूप मोठा झटका आहे. या मतदारसंघाचे खासदार मोहन डेलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यानंतर ही जागा रिक्त होती. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांनी शिवसेनेत प्रवेश करून ही जागा लढवली. देशभरातील विविध राज्यांत आणि तुरळक ठिकाणीच झालेल्या निवडणूक निकालातून व्यापक अर्थ काढणे उचित ठरणार नाही, हे खरे. तथापि, ज्या पार्श्‍वभूमीवर आणि वातावरणात या निवडणुका झाल्या तसेच विशेषत: हिमाचलमधील निकाल हे स्पष्टपणे काही गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करतात हे जाणवते. देशात वाढलेले पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे भाव सर्वसामान्यांच्या सहनशक्तीच्या पलिकडे गेले असून जनता आता भाजपाला आपल्या हातात असलेल्या मताच्या हत्याराने उत्तर देत आहे. पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात भाजपा सरकार पुन्हा जनतेपुढे जनमतासाठी जाणार आहे. मात्र ताज्या निकालाने विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाचा पाया आताच खिळखिळा बनला आहे. कारण, ही पोटनिवडणूक भाजप सरकारच्या कामगिरीवरील सार्वमत म्हणून पाहिली गेली. त्यामुळे येत्या काही महिन्यांत किंवा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर, तेथे नेतृत्वबदल झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. यावेळी कोणत्याही दृष्टीने मोदी लाट नसल्यामुळे पोटनिवडणुकीतील चारही जागांवर भाजपचा पराभव झाला, असे मानण्यात येत आहे. एकतर कोव्हिड साथीमुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या या राज्याला फटका बसला आणि आता केंद्र सरकारच्या मनमानीपणाने लुटण्याच्या प्रवृत्तीमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस आदींच्या किंमती वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती हाताबाहेर गेल्या. त्याचा वचपा मतदारांनी मतपेटीद्वारे काढला. मुख्यमंत्री ठाकूर यांनी संपूर्ण प्रदेशाचा विचार करण्याऐवजी केवळ आपल्या मतदारसंघाच्या आसपास पर्यटन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले, असे मतदार सांगतात. तसेच, शेतकर्‍यांचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. सफरचंदाचे मुख्यालय असलेल्या हिमाचलमध्ये सफरचंदाचे भाव पडल्याचाही फटका तेथील शेतकर्‍यांना सहन करावा लागला. त्यांना कोणत्याही प्रकारे सरकारकडून दिलासा मिळाला नाही. एका बाजूला केंद्राची निष्ठूर भूमिका आणि महागाईच्या आगीत होरपळत असलेली जनता आणि दुसरीकडे काँग्रेसने घेतलेली मेहनत व केलेले काम याचेही प्रतिबिंब या निकालात पडलेले आहे. उदा. अशोक चव्हाण यांनी निवडणूक घोषित झाल्यापासून देगलूर मतदारसंघाच्या बांधणीसाठी नांदेडमध्ये तळ ठोकला आणि लांब गेलेल्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे काम केले. कर्नाटकमधील हनगल येथे श्रीनिवास माने यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मतदारसंघात कोव्हिड काळापासून सातत्याने जनतेच्या सेवेत राहिल्याने विजय मिळवला. म्हणजे कामातून बदल शक्य आहे, याची नांदी या निकालाने दिलेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Exit mobile version