अवकाळीचा फटका

अलिबागसह संपूर्ण रायगडमध्ये पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे भातशेती, तसेच बागायतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आकस्मिकपणे आलेल्या पावसाने शेतकर्‍यांना त्यांच्या पिकांच्या ऐन फलप्राप्तीच्या वेळी गाठले आहे. त्यामुळे सरकारने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत आणि शेतकर्‍यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, ती अत्यंत रास्तच आहे. अलिबाग तालुक्यातील, तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना, चक्रीवादळे, अतिवृष्टी अशा अस्मानी संकटांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. त्याचा वेळोवेळी आढावा या स्तंभातून घेण्यात येऊन त्यात शेतकर्‍यांच्या व्यथा आणि रास्त मागण्या मांडण्यात आल्या होत्या. आताही शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कारण, गेल्या आठवड्यात ऐन दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले भात, तसेच शेतात कापणीसाठी तयार असलेले उभे भातपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. त्यांचे नव्याने पंचनामे त्वरित करून शेतकरी त्यात कोणत्या प्रकारच्या नुकसानीचा सामना करीत आहे, याचा अंदाज सरकारने घेणे आवश्यक आहे. कारण, निसर्ग चक्रीवादळात झालेले नुकसान मोजले गेले तरी त्याची भरपाई अद्याप मिळालेली नसताना, या पुन्हा नव्याने पुढे ठाकलेल्या संकटाने शेतकरी पार कोलमडून गेला नसता तरच नवल! कारण, प्रतिकूल परिस्थिती असूनही तो पुन्हा धीराने उभा राहिला. या अवकाळीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असल्याने तो हताश होणे साहजिक आहे. या अवकाळी पावसाचे कारण अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र होय. ते अजून गडद होण्याची शक्यता असताना, सुदैवाने ते किनारपट्टीपासून दूर समुद्रात सरकले. त्यामुळे व्यापक प्रमाणात होऊ शकणारी हानी मर्यादित झाली. मात्र, त्याचा प्रभाव दोन दिवस तरी रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टी, तसेच अन्य संलग्न भागांवर होता. त्यामुळे रायगडला शनिवारपासून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार पाऊसही झाला. रायगड जिल्ह्यातील जनतेलाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. सुदैवाने नागरी वस्तीत पाऊस तीव्र पडूनही त्याचा नुकसानकारक परिणाम दिसला नाही. मात्र, या अचानक आलेल्या संकटामुळे दिवाळीच्या निमित्ताने काहीसा निवांत बनलेल्या शेतकर्‍याला धावपळ करावी लागली. तरी बहुतांश ठिकाणी तयार झालेले पीक आडवे होण्यापासून त्याला ते वाचवता आले नाही. याच सुमारास बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्राला लागून असलेल्या भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिणेतील तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजला. तसेच कर्नाटकात अनेक ठिकाणी सतत मुसळधार पाऊस होत राहिला. आंध्र प्रदेशातील रायलसीमा आणि दक्षिण तटीय आंध्र प्रदेशातील कृष्णा, गुंटूर, प्रकाशम आणि नेल्लोर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. तेथे मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत आंध्र तसेच तामिळनाडूत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारपर्यंत कर्नाटकातील तेरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि या संदर्भात यलो अलर्टही जारी करण्यात आला होता. त्यानुसार तेथे सलग आठ- दहा दिवस पाऊस पडत आहे. दक्षिण कन्नड, उडुपी आणि उत्तर कन्नड या किनारी जिल्ह्यांमध्येही पाऊस कोसळला आणि त्याचा परिणाम या पट्ट्यात पुढे रायगडमधील आणि विशेषत: अलिबाग तालुक्यात झाला. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळाने निर्माण झालेल्या दाबामुळे पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो झोपड्या उद्ध्वस्त झाल्या व काही घरांचेही नुकसान झाले. या पावसाने तेथील राजधानी चेन्नई येथे हाहाकार माजवल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने शहर महापालिकेवर ताशेरे ओढत गंभीर परिणामांचा इशारा दिला. आठवडाभरात परिस्थिती सुधारली नाही तर चेन्नईच्या रहिवाशांना पावसाचे पाणी साचल्यामुळे होणार्‍या त्रासाबाबत उच्च न्यायालय स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेईल, असे सांगितले. न्यायमूर्तींनी ‘हे मागासलेले राज्य नाही’ अशी टिप्पणी केली. त्याप्रमाणेच महाराष्ट्रही मागास राज्य नाही. त्यानेही त्वरित पावले उचलत स्थानिक प्रशासनाला जागे करून रायगडमधील शेतकर्‍यांची पिके वाया गेली, त्याचा पंचनामा करून घेतला पाहिजे. त्यासाठी निवेदन सादर केले जाण्याची वाट पाहू नये.

Exit mobile version