शिवकाळाने झपाटलेला शाहीर

शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्वांचे आराध्य दैवत आणि हे आराध्य दैवत जनमानसात अधिकाधिक रुजवण्यासाठी आपल्या शाहिरीतून हयातभर शिवकाळ जिवंत करण्याचे काम करणारे शिवप्रेमी बळवंत मोरेश्‍वर पुरंदरे तथा सर्वांचे परिचित बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एका खर्‍या शिवशाहीराला महाराष्ट्र मुकला आहे. आपल्या व्याख्यानांतून, कथनातून संशोधन तसेच लेखनातून लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाचा ध्यास घेतला. पुढे त्यांनी नाट्य प्रयोगातूनही प्रदीर्घ काळ तेच काम केले. महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव जिवंत ठेवण्यात त्यांनी सुरुवातीलाच कथालेखनाचा मार्ग अवलंबला. ‘ठिणग्या’ या नावाने प्रकाशित झालेल्या त्यांच्या कथांतून हा त्यांचा शिवकाळ जिवंत करण्याचा प्रयत्न दिसतो. सतराव्या शतकातील घडामोडी या संपूर्ण सुदूर पसरलेल्या प्रदेशासाठी निर्णायक होते त्या आणि त्या कालखंडाच्या परिवर्तनाचे एकमेव नायक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे हे सतरावे शतक त्यांनी शिवाजीबरोबरच आपल्या शाहिरीतून, कथनातून जिवंत केले आणि जिवंत ठेवले. म्हणून महाराजांबद्दल कोणतीही गोष्ट त्यांना माहिती नाही, असे कधी त्यांच्याबाबतीत घडले नाही. आधीपासून आणि अजूनही अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी जात. अलिकडे काही दिवसांपूर्वी दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल होईपर्यंत ते सातत्याने लोकांच्या मध्ये असत. लोक त्यांना सातत्याने भेटत आणि त्यांच्या तोंडून शिवाजी महाराजांच्या कालखंडातील काही क्षण जिवंत होण्याचा अनुभव घेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या या दैदीप्यमान कालखंडाला लोकांपुढे तितक्याच दैदीप्यमान पद्धतीने सादर करण्याचा हेतू डोळ्यांपुढे ठेवून भव्य नाट्यनिर्मितीही केली. भारतीय रंगभूमीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे व विशाल स्वरूपाचे हे नाट्यमय सादरीकरण म्हणजे अचंबित करणारा, जुना काळ कलात्मक पद्धतीने लोकांपुढे जिवंत करण्याचा यशस्वी प्रयोग होता. त्यासाठीची त्यांना प्रेरणा मिळाली ते लंडनला गेले असताना. तेथे त्यांनी अगाथा ख्रिस्तीचे गाजलेले ‘माऊसट्रॅप’ पाहिले आणि रोमन बॅले पाहिले तेव्हा. अनेक कलाकार, तंत्रज्ञ, भव्य सेट, विलक्षण ध्वनीयोजना या सगळ्यांचा परिणाम त्यांनी पाहिला. रोमन बॅलेचे विशाल दृश्यरूप रंगमंचावर कसे साकार होते ते पाहिले. तेव्हा त्यांना अशाच भव्य पद्धतीने महाराजांसह तो मंतरलेला कालखंड लोकांपुढे सादर करण्याची त्यांना कल्पना सुचली आणि त्यानुसार त्यांनी काम लगेच सुरू केले. 1985 मध्ये ‘जाणता राजा’ या नावाने रंगमंचावर आलेले हे तीन तास चालणारे, शेकडो कलाकारांचा समावेश असलेले नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. त्याचे सातशेहून अधिक प्रयोग झाले. त्यातील भव्य शिवकालीन रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. त्याची प्रयोग केवळ महाराष्ट्रात व भारतातच नाही तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेतही झाले. तसेच त्यांनी शिवाजी महाराजांचे राजा शिवछत्रपती हे चरित्र लिहिले, त्याच्याही असंख्य आवृत्त्या निघाल्या. बाबासाहेबांना वक्तृत्वाचे वरदान होते. त्यामुळे त्यांनी ठिकठिकाणी जाऊन लोकांच्या मनात शिवाजीचा काळ उभा करण्यासाठी या वक्तृत्वकलेचा उपयोग केला, त्यांनी आपल्या हयातीत जसा शिवकालीन तपशीलांचा ध्यास घेतला, त्यासाठी प्रवास केला, तितक्याच प्रमाणात त्यांनी या विषयावर व्याख्यानेही दिली. असे म्हणतात की त्यांनी बारा हजाराहून अधिक व्याख्याने शिवकालीन कालखंड व शिवाजी महाराज यांच्यावर दिलेली आहेत. त्यांच्या संशोधनाला, गड-किल्ल्यांच्या अभ्यासाला, शिवकालीन कालखंडाच्या उत्खननाला प्रेमभक्तीचे स्वरुप होते. त्यामुळे त्यांच्या लेखनाला पांडित्यपूर्ण अभ्यासकाचा दर्जा मिळाला नाही. तसेच, काही वेळा वादही झाले. त्यांच्या लेखनावर आक्षेपही घेतले गेले. परंतु त्यांचे शिवप्रेम अबाधित होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी अवलंबलेल्या शाहिरी मार्गाबद्दल ते संतुष्ट होते. शाहिरी हा अधिक लोकप्रिय मार्ग आहे; शास्त्रोक्तपणा आणल्याने महाराजांचा काळ अधिक लोकांपर्यंत पोचणार नाही, असे त्यांना वाटले असेल. कारण, लोक कथा अधिक पद्धतशीरपणे लक्षात ठेवतात, भावनिक पातळीवर अधिक प्रतिसाद देतात, हे त्यांना माहिती होते. तसेच तोच त्याचा पिंड होता आणि तेच काम त्यांनी सार्थकी लावले. जीवनाच्या अखेरपर्यंत त्याच निष्ठेने त्यांनी तेच काम केले. या प्रवासात त्यांनी अनेक शिवकालीन दस्तऐवज, वस्तू जमा केल्या. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या साधनांची साठवणूक केली. असंख्य दशकांच्या या अथक ध्यासामुळेच त्यांच्याकडे सगळे महाराष्ट्र जन चलता बोलता इतिहासकार म्हणून पाहू लागले. ऐन तरुणपणीच त्यांना शिवाजी महाराजांच्या दैवतरुपी, प्रकाशमान व्यक्तित्त्वाने पछाडले, ते त्यात आनंदाने हयातभर गुंगून राहिले. त्यामुळे त्यांचे वर्णन शिवकाळाने झपाटलेला शाहीर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांना विनम्र श्रद्धांजली!

Exit mobile version