गोखलेंचे चुकलेले नाही

ज्येष्ठ मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनी एका नवीन वादाच्या प्रवाहात उडी मारून स्वत:ला वाहत्या गंगेत पावन करून घेण्याचे ठरविल्याने त्यांच्यावर टीका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणावत या अभिनेत्रीने देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले आणि 1947 साली जे मिळाले ती भीक होती, असे वक्तव्य केले होते. त्याचा आम्ही येथेही यथेच्छ समाचार घेतला होता. आता त्यात विक्रम गोखले यांनी तिची री ओढत तिचे बेताल वक्तव्याचे प्रेत स्वत:च्या खांद्यावर घेणारा विक्रम बनवण्याचे ठरल्याने त्यांचाही तसाच समाचार घ्यायला हवा, हे संयुक्तिक आणि तार्किक झाले. परंतु विचारांती गोखले यांचे तसे करण्यात काहीच चुकलेले नाही असे आढळले आणि त्यांच्या बाजूची किमान तीन कारणे हाती लागली. ती येथे सादर करीत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे, माणूस ज्या मानसिक परीघात वाढतो, त्याला जग तेवढेच आहे असे वाटते. इतकेच नव्हे तर आपले जे जग आहे, तसेच जग सर्वांचेच असेल असे वाटते. ट्रेनमध्ये प्रवाशांपुढे गाणी गाऊन भीक मागणार्‍या मुलाबायकांना हे प्रवासीही कुठेतरी जाऊन आपल्यासारखेच गाऊन बजावून भीक मागतात असेच वाटत असते. त्यामुळे गोखले ज्या वर्गाच्या विचारांचे प्रतिनिधित्व करुन त्यांचे प्रवक्तेपणा घेऊ पाहात आहेत, त्यांचेही जग लोकांपुढे भीक मागूनच दिवस ढकलण्याचे होते. त्यामुळेच त्यांच्या वर्गातले काहीजण अशीच दयेची भीक मागून वीर बनले. तसेच, पेन्शनसाठी दयेचे अर्ज पाठवले, म्हणजे याचनाच ती. त्यामुळे सगळे जगच असे भीक मागत आहे, असे वाटणे साहजिक होते. आताही गोखले म्हणतात की लोक हॉटेलमध्ये जाऊन दहा दहा हजार रुपये खर्च करतात, परंतु पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल तक्रार करतात. ते स्वत: असा खर्च करू शकत असल्याने त्यांना देशातील सगळेच लोक हॉटेलमध्ये तेवढे पैसे उडवतात, असे वाटणे साहजिक आहे. त्यामुळे त्यांना दोषी धरता येत नाही. विक्रम गोखले यांनी स्वातंत्र्याबद्दल सोडाच, एरवीही काही त्यांनी केलेल्या सुमार कामांशी संबंधित संवादापलीकडे बरे वाचन केल्याचे दिसत नाही. नाहीतर महाराष्ट्रासह देशभर त्यावेळच्या तरुणांनी इंग्रजांना कसे सळो की पळो करून सोडले आणि त्यासाठी कसे हसत हसत फासांवर चढले हे कळले असते. स्वातंत्र्याच्या चळवळीत जेव्हा हजारो लाखो लोक आपल्या संसाराची होळी करून स्वातंत्र्यदेवतेसाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान करत होते, तेव्हा गोखलेंच्या विचारांचे लोक स्वत:भोवती संरक्षक भिंत उभारून होते. परंतु केवळ अंगी गुण असून चालत नाही, त्यासाठी मनाची मशागत कोणत्या खताच्या संस्कारांनी झालेली आहे, ते अधिक महत्त्वाचे असते. कारण तेच तुमच्या कृतीतून आणि वाणीतून बाहेर येते. जसे ते आता येत आहे. त्यामुळे त्यांची चूक नाही. दुसरे कारण, माणूस अनुभवातून, आसपासच्या घटनांतून शिकतो. त्यांनी पाहिले की कंगना आपल्यापेक्षा किती ज्युनियर आणि कुठे पोचली! कशामुळे? तर आपल्या बेतालपणामुळे. हा बेतालपणा आपण का नाही अंगीकारायचा? त्याचे लाभ केवढे! आपल्या अख्ख्या आयुष्यात आपण अशा वकुबाचे काही करू शकलेलो नाही आणि आता यापुढे ते जमेल असेही नाही. त्यामुळे कंगनाच्या मार्गाने पुढे जाण्यात गैर ते काय? असे म्हणतात की साठीनंतर मेंदू शिणायला लागला की त्याला आयुष्यातील अतृप्त इच्छा, आकांक्षांचे नवे धुमारे फुटतात. महत्वाकांक्षा बाळगणे हा काही गुन्हा नाही. त्यामुळे त्यांचे चुकले असे म्हणता येणार नाही. आता तिसरे कारण. त्यांनी पुण्या नजीकच्या सुमारे 14 लोकांना जवळपास एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याबद्दल त्यांच्यावर चारसोबीसचा गुन्हा काही वर्षांपूर्वी दाखल झाला आहे. खोटी कागदपत्रे आणि खोटी माहिती सांगून लोकांना त्यांनी गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि त्यात फसलेल्यांनी पोलिसांत धाव घेतली. आता असे गुन्हे असलेल्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठीची सर्वांत सुरक्षित जागा कोणता राजकीय पक्ष देतो हे सर्वांना माहिती आहे. त्याच्या आश्रयाला आलेले कोणत्याही प्रकारचे लोक शुद्ध होऊन जातात. आपणही होऊ असे त्यांना वाटले असेल. कारण अनिल देशमुख यांनाही न्यायालय तुरुंगाचेच जेवण जेवा असे सांगत असताना त्यांनी या पक्षाला सोयीची भूमिका घेतली, तर त्यांचा तो दोष म्हणता येणार नाही.

Exit mobile version