बालरोगतज्ज्ञ संघटनेचे सिंहावलोकन

डॉ. चंद्रशेखर दाभाडकर

डॉक्टर, मुलं अशी का वागतात हा प्रश्‍न प्रत्येक बालरोग तज्ज्ञाला पालकांकडून विचारला जातो. तो खूप चिडचिड करतोय, एकाकी राहतो. काही खात नाही, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केले जातात. अर्थात याचा अभ्यास करुन बालरोग तज्ज्ञही पालकांचे समाधान करतात. भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या रायगड शाखेच्यावतीने गुरुवारी 25 नोव्हेंबरला पीएनपी सभागृह, अलिबाग येथे तीन राज्यांचे बालरोग तज्ज्ञांचे अधिवेशन होत आहे. त्यानिमित्ताने एकूणच रायगड शाखेच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा.

आज राष्ट्रीय बाल रोग संघटनेची रायगड जिल्हा शाखा तीन राज्यांचे बालरोगतज्ज्ञांचे अधिवेशन आयोजित करीत आहे.ही केवळ रायगड जिल्ह्याच्या बालरोग तज्ज्ञांनाच नव्हे तर रायगडवासीयांकरिता एक अभिमानाची गोष्ट आहे. पण या शाखेची स्थापना, वाटचाल व उत्कर्ष याचा इतिहास रोमांचकारी आहे, आणि या स्थापनेत माझाही खारीचा वाटा आहे याचा आनंद वेगळाच आहे.
महाड येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर राज्यपातळीवरच्या अनेक अधिवेशनास व परिसंवादास उपस्थित राहण्याचा योग आला. एकदा अशाच अधिवेशनाच्या कार्यक्रमात काही जिल्ह्यांना ‘बेस्ट ब्रँच’ पुरस्कार मिळाला आणि रायगड जिल्ह्यात इतके चांगले बालरोगतज्ज्ञ असताना आपल्याकडे ही शाखा का नसावी असा विचार डोक्यात आला. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ बालरोगतज्ज्ञांना मी हा विचार बोलूनही दाखवला पण रायगड जिल्ह्याचे, त्यातील तालुक्यांचे  भौगोलिक अंतर, पुणे-मुंबईचे यासारख्या शहरातील जवळच्या शाखा यामुळे आपली स्वतंत्र चूल मांडण्यापेक्षा याच शहरी शाखेशी संलग्न व्हावे असा विचार काहींनी बोलून दाखवला, हे खरे ही होते. पण  अनेक छोट्या मोठ्या शाखा चांगले काम करीत असताना आपली जिल्हा संघटना का नसावी हा विचार अस्वस्थ करीत होता आणि मी, डॉ. धामणकर, डॉ. पी.बी. जैन, डॉ. मोहिते यांना हा विचार बोलूनही दाखविला. पण ती वेळ यायची होती.
जिल्हा शाखा स्थापन होण्यापूर्वीच आपल्याला राज्याचे अधिवेशन भरविता येईल का असाही विचार डोक्यात आला, अशी मी स्वप्ने पाहायला लागलो! दिवास्वप्नच ती!! माझ्याकडे अधिवेशनाचा सगळा आराखडा तयार होता. अगदी ब्ल्यू प्रिंट म्हणा ना! हॉल ए, हॉल बी,  खर्चाचा तपशील, वक्ते, विषय, आणि इतरही पण आर्थिक बाजू सांभाळणे माझ्या ताकदीच्या बाहेर होते आणि तेच तर आवश्यक होते. कधीतरी एकदा अलिबागला डॉ. धामणकर सरांकडे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ गुरुवर्य आमडेकर सर आणि गुरुवर्य पोतदार सर आले होते. धामणकर सर ही आता या विचारास सहमत झाले होते आणि 2004 साली या दोघांच्या उपस्थितीत रायगड शाखेची स्थापना करावयाचे ठरले आणि डॉ. धामणकर सरांना सर्वानुमते या नवनिर्वाचित शाखेचे अध्यक्ष केले गेले. त्यानंतर डॉ. मपारा, डॉ. कुलकर्णी, मी आणि नंतर डॉ. मोहिते अध्यक्ष झालो. अनेक छोट्या मोठ्या परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले, पण या दरम्यान कधीतरी आम्ही नागोठण्यात डॉ. आमडेकर सरांच्या नेतृत्वाखाली सर्व फॅमिली डॉक्टरांचे बालरोग शास्त्रावर एक उद्बोधन शिबिर ठेवले. विशेष हे की या वेळेस कुठल्याही औषध कंपनीकडून किंवा कोणाकडूनही कुठलाही निधी न घेता डॉक्टरांच्याच शुल्कातून एक अत्यंत यशस्वी प्रकल्प आम्ही राबविला, आणि सगळ्यांचाच उत्साह द्विगुणित झाला. त्याचदरम्यान कधीतरी माथेरानला राज्यातील बालरोग तज्ज्ञांकरिता एक अधिवेशन घेतले, डॉ आमडेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. पी. बी. जैन यांच्या परत औषध कंपन्यांकडून कुठलीही मदत घेतली नाही आणि आणखी एका यशस्वी अधिवेशनाच्या श्रेयाचे आम्ही धनी झालो. या दरम्यान एक चांगली गोष्ट झाली. जिल्ह्यात आलेले तरुण बालरोगतज्ज्ञ सक्रिय झाले, चार्ज झाले. डॉ. राजेंद्र चांदोरकरांच्या मनात वेगळेच चालू होते. त्यांच्या अनेक प्रकल्पाबरोबरच आमच्या शाखेला पहिला पुरस्कार मिळवण्याचे श्रेय त्यांचेच. डॉ. जय भांडारकर यांच्या उत्साही आणि कल्पक कारकिर्दीत तर अनेक परिसंवादांची रेलचेल झाली आणि डॉ. आठवले फाऊंडेशनची एक कॉन्फरन्स म्हणजे आमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांचा परिपाक होता. एक अत्यंत यशस्वी शाखा म्हणून राज्यात नावलौकिक होत होता. याच दरम्यान कधीतरी मुलांच्या वाढ व विकास या संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरची एक अत्यंत यशस्वी कॉन्फरन्स आम्ही एम.जी.एम. कॉलेजात आयोजित केली. कदाचित राष्ट्रीय पातळीवर औषधी कंपन्याांकडून एकही पैसा न घेता केलेली ही इंडियन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिऍट्रिकची पहिली (व कदाचित शेवटची) कॉन्फरन्स असावी.
त्यानंतर डॉ. आबासाहेब पाटणकर सारख्या तरुण, तडफदार आणि कामाचा झपाटा लावणारा अध्यक्ष संस्थेला मिळाला आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील काना कोपरातल्या बालरोग तज्ज्ञांना त्यांनी कामाला लावले. आधीच सामाजिक काम करण्याची इच्छा आणि ही संधी. सर्व कामांची यशस्वी नोंद ठेवली आणि या शाखेचे सुवर्णयुग अवतरले. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर या शाखेला अनेक पुरस्कारच मिळाले नाहीत तर ‘बेस्ट ब्रांच’  म्हणून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला. जेव्हा डॉ. हेमंत गंगोलियासारख्या अत्यंत शिस्तबद्ध व संयोजनात तेवढ्याच ताकदीच्या बालरोगतज्ज्ञांकडे ही सूत्रे गेली तेव्हा त्यांनी या यशाचा कळस गाठला. केवळ अ‍ॅकॅडेमिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात या शाखेने आपला राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला. पुरस्कार मिळवण्याचे तर व्यसनच लागले होते, ते देखील मिटले पण आपल्या सखोल वैद्यकीय कायद्याच्या ज्ञानामुळे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले. सलग दोन वर्षे ‘बेस्ट ब्रांच’ हा पुरस्कार ही मिळवला. राज्य अधिवेशनाचे यजमानपद रायगड जिल्ह्याकडे खेचून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आणि इ.स. 2020 सालचे यजमानपद या शाखेला मिळाले. पण दुर्दैवाने 2020 साली हे अधिवेशन भरविता आले नाही. पण शाखेने या अधिवेशनाची सूत्रे त्यांच्याकडेच सोपविली. या दरम्यान मला व डॉ. महेश मोहिते यांना दोन वेळेस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद म्हणून महाराष्ट्रातील बालरोगतज्ज्ञांनी भरघोस व विक्रमी मतांनी निवडून दिले.एव्हढेच नव्हे तर गेल्यावर्षी मला पश्‍चिम विभाग राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून देशभरातील बालरोगतज्ज्ञांनी अत्यंत विक्रमी मतांनी निवडून दिले ही शाखेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट. याबरोबरच रायगड जिल्ह्यातील आमचे अनेक तरुण बालरोगतज्ज्ञ सातत्याने कार्यरत राहिले. किंबहुना या विक्रमी वाटचालीचे श्रेय त्यांनाच. डॉ. विनायक पाटोल, डॉ. सुनील शेठ, डॉ. वैभव देशमुख, डॉ. महेश सांभारे, डॉ. प्रमोद वानखेडे, डॉ. विकास मोरे, डॉ.सकिना इंगळे, डॉ. नीलिमा भांडारकर, डॉ. चित्रा कुलकर्णी, डॉ. संजीवनी मोरे यांच्या सातत्यपूर्ण व उत्साही कामगिरीमुळे या शाखेस राष्ट्रीय स्तरावर धडक मारण्याची संधी मिळाली, हे नाकारून चालणार नाही. आणि या शाखेचे या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सर्व महिला बालरोग तज्ज्ञांनी या शाखेची धुरा उचलली आणि डॉ. सुकिना इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. नीलिमा भांडारकर (सचिव), डॉ. चित्रा कुलकर्णी (उपाध्यक्ष) व डॉ. संजीवनी मोरे तसेच डॉ. नेहा सिंग व इतर अनेक महिला सदस्यांनी अधिवेशनाच्या वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या सर्व सभासदांना, या शाखेस आणि या अधिवेशनाला माझ्या शुभेच्छा.

Exit mobile version