‘झिका’ची भीती, ‘डेल्टा प्लस’चा इशारा

विजय जोशी

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येणं, तिसरी लाट येणं, डेल्टा वायरसबद्दल चिंता पसरणं आणि इतर विषाणू-व्याधींच्या लाटा जाणवणं अशा अनेक विषयांवरील चर्चांना सतत नवनवीन आयाम मिळत असताना देशात झिका विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच वेळी घातक ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा मुकाबला करण्यासाठी कोरोना लसीचा एक डोस अपुरा असल्याची माहिती पुढे येत आहे. या बातम्यांनी सामान्यजनांची चिंता वाढवली आहेच पण दिवसेंदिवस आरोग्य जपणं किती आणि कसं अवघड होत आहे, हे पहायला मिळत आहे.
कोरोनाचं संकट कायम असताना केरळमध्ये गेल्या काही दिवसात झिका विषाणूंचे रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या आता 15 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने तज्ज्ञांची एक टीम माहिती घेण्यासाठी पाठवली. या टीममधले सहा सदस्य परिस्थितीचा आढावा घेत राज्य सरकारला मदत करणार आहेत. या निमित्ताने देशातला झिका वायरसचा धोका अधोरेखीत होत आहे. केरळमधल्या 14 जणांचे अहवाल चाचणीसाठी पुण्यातल्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्यात सर्वप्रथम एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर इतरांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. एडीस जातीचे डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. त्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता आणि इतर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितलं. हा व्हायरस कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणं आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
केरळमध्ये सर्वप्रथम एका गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली. महिला उपचार घेत असलेल्या रुग्णालयातल्या काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुनेदेखील तपासणीसाठी पाठवले होते. त्यात फक्त ती पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, या 24 वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांनादेखील या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. ताप येणं, अंग दुखणं तसंच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणं ही झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. हा त्रास जडल्यास प्रचंड डोकेदुखी होते. डोळे लाल होणं, अशक्तपणा आणि थकवादेखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचं सांगणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करून निदान करणं आवश्यक आहे. डास चावण्यापासून संरक्षण करणं हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणं आवश्यक ठरतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलांना झिकाचा सर्वाधिक धोका असतो. याचा परिणाम न जन्मलेल्या मुलावरही होऊ शकतो. एखाद्या संक्रमित पेशंटने लैंगिक संबंध ठेवल्यास निरोगी व्यक्तीलाही झिका होतो.
2007 मध्ये प्रशांत महासागरातील याप बेटावर प्रथम झिका विषाणूच्या साथीची घटना घडली. त्यानंतर, ब्राझील, अमेरिका आणि आशियामध्येदेखील या रोगाची साथ पसरली. या रोगामुळे अर्धांगवायूचा त्रास होऊन मृत्यू होऊ शकतो. नवजात मुलामध्ये मायक्रोसेफली आणि इतर जन्मजात रोग होऊ शकतो. याला जन्मजात झिका सिंड्रोम म्हणतात. यामुळे गर्भवती महिलांच्या गरोदरपणातील गुंतागुंत वाढते आणि गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो. ब्राझीलमधल्या 2014 च्या साथीच्या रोगामुळे मृत्यूचा धोका कित्येक पटीने वाढल्याची आठवण ताजी आहे. संक्रमित महिलांमध्ये जन्मलेली मुलं मायक्रोसेफली विकसित करू शकतात. अशा परिस्थितीत मुलाचं डोकंलहान होतं. काही रूग्णांमध्ये नेत्रविकार जडतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हनण्यानुसार झिकाने संक्रमित रूग्णांसाठी कोणतेही अचूक उपचार किंवा लस विकसित झालेली नाही.
फ्रान्सच्या ‘पाश्‍चर इन्स्टिट्यूट’चे प्रख्यात विज्ञान नियतकालिक असलेल्या ‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या संशोधनानुसार कोरोना लसीचा एक डोस सामान्यत: विषाणूच्या बिटा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटवर परिणाम करत नाही. हे संशोधन अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर-बायोटेक लस घेतलेल्यांवर केलं गेलं. भारतात, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस ‘कोविशिल्ड’ या नावाने ‘सीरम इन्स्टिट्यूट’मध्ये बनवली जाते. या दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेणार्‍यांना मात्र ‘डेल्टा प्लस’ला आळा घालता येऊ शकतो. पाश्‍चर इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे प्रमुखआणि व्हायरस अँड इम्यूनिटी युनिटचे प्रमुख ऑलिव्हियर श्‍वार्ट्ज म्हणतात की, ज्या लोकांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका किंवा फायझर-बायोटेक लसचा एकच डोस मिळाला, त्यापैकी फक्त दहा टक्के लोक कोरोनाचे अल्फा आणि डेल्टा रूप नष्ट करू शकले. त्याच वेळी, यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस प्राप्त करणारे 95 टक्के लोक डेल्टा आणि बिटा प्रकाराच्या विषाणूला प्रतिकार करू शकतात, असं आढळलं. संशोधकांच्या मतानुसार हा एक मोठा फरक आहे. डेल्टा किंवा बिटा प्रकाराशी लढण्याची शक्ती तयार करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे. कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 95 टक्के लोकांकडे डेल्टा प्रकारच्या कोरोनावर मात करण्याची शक्ती असेल.
फ्रेंच संशोधकांनी अशा लोकांचीदेखील तपासणी केली, ज्यांना ही लस मिळाली नाही; परंतु त्यांनी कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली होती. संशोधनानुसार, अशा लोकांमध्ये तयार झालेली प्रतिपिंडं कोरोनाच्या सामान्य विषाणूपेक्षा कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरूद्ध चारपट कमी प्रभावी असल्याचं आढळलं. अशा लोकांना लसीचा डोस मिळाल्यानंतरच त्यांच्या प्रतिपिंडाची शक्ती आश्‍चर्यकारक रीतीने वाढली. कोरोनाला एकदा पराभूत करणार्‍यांना आपल्या शरीरातली प्रतिपिंडं डेल्टा व्हेरियंटच्या विरूद्ध लढण्यास चारपट कमी पडतात, असं आढळलं आहे. फायझर आणि बायोटेक कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्रकारासाठी विशेष लस तयार करत आहेत. दोन्ही कंपन्या या लसींच्या क्लिनिकल चाचण्या ऑगस्टपासून सुरू करू शकतात. तिसर्‍या बुस्टर डोसचा निकालही खूप चांगला होता. तथापि, दोन्ही कंपन्यांनी या निकालांशी संबंधित डेटा जाहीर केला नाही. कोरोना लसीचा तिसरा डोस, ज्याला बूस्टर डोस म्हणतात; सुरुवातीच्या दोन डोसच्या सहा महिन्यांनंतर दिला जातो. कंपन्यांचा असा दावा आहे की, अशा बुस्टर डोसमुळे मूळ विषाणूविरूद्ध तयार झालेली प्रतिपिंडं दहापट अधिक प्रतिकारकशक्ती दाखवतात. दोन्ही कंपन्या पुढील दोन-तीन आठवड्यांमध्ये अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे (यूएस-एफएडीए) डेटा सादर करतील. आयसीएमआरनेदेखील या लसीचे दोन्ही डोस प्रभावी असल्याचं सांगितलं होतं. फ्रेंच संशोधकांचे हे निकाल या आठवड्याच्या सुरुवातीला आयसीएमआर (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या संशोधनासारखेच आहेत. ज्यात म्हटलं आहे की कोरोना लसीचे दोन डोस डेल्टा प्रकार आहेत. एक डोस घेतला तर डेल्टाविरुद्ध लढण्याची ताकद 82 टक्के होते तर दोन डोस घेतल्यास डेल्टा रोखण्याचं प्रमाण 95 टक्के होतं. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे अमेरिकेसह 98 देशांमध्ये अराजक पसरलं आहे.

Exit mobile version