बहुआयामी सुधारक, लोकांचा राजा

प्रा. अविनाश कोल्हे

पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महामानवांचे योगदान आहे. यातही मला व्यक्तीशः छत्रपती शाहू महाराजांचे खास कौतुक वाटते. ज्या काळी देशातील इतर संस्थानिक ऐशोआरामाचे जीवन जगत होते, शिकार करत होते, परदेशी जाऊन मौजमजा करत होते  त्याकाळी शाहू महाराज कोल्हापुर संस्थानात आधूनिक विचारांचा पाया असलेल्या राष्ट्राची उभारणी करत होते. गेल्या रविवारी म्हणजे 26 जून रोजी त्यांची 148 वी जयंती महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहात साजरी झाली. महाराष्ट्रात  दरवर्षी 26 जुन हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा होतो.
शाहू महाराजांनी 1874 ते 1922 या त्यांच्या छोट्याशा जीवनात अशी काही भरीव कामगिरी करून दाखवली की त्याला तोड नाही. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांचा राज्यारोहण समारंभ पार पडला. तेव्हा त्यांचे वय अवघे वीस वर्षे होते. त्यांना 6 मे 1922 रोजी मृत्यूने मुंबईला गाठले. याचा अर्थ असा की त्यांची कारकिर्द उण्यापुर्‍या 28 वर्षांची होती. त्यांनी 6 जुलै 1902 रोजी कोल्हापुर संस्थानात ‘आरक्षण’ सुरू केले आणि ब्राह्मणेतरांना पन्नास टक्के आरक्षण लागू केले. प्रजासत्ताक भारतात सुरू झालेल्या आरक्षणाचे जनक म्हणजे शाहू महाराज. शाहू महाराजांचे सामाजिक कार्य बहुआयामी होते. या छोटेखानी लेखांत त्यांच्या लोकोत्तर कार्याला सलाम करण्याचा नम्र प्रयत्न केला आहे.
आजच्या काळातील विविधांगी विषमता नष्ट करायची असेल तर बहुजन समाजाने शिक्षणाची कास धरली पाहिजे याची महाराजांना जाणिव होती. म्हणून त्यांनी शिक्षणावर भर दिला. त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. हा निर्णय भारत सरकारने 2002 साली घेतला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना एक रूपया दंड आकारण्याची तरतूदसुद्धा केली. महाराजांच्या आरक्षणाच्या निर्णयाला अनेक उच्चवर्णीय पुढार्‍यांनी अपेक्षित विरोध केला. त्या काळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या अनेक जातींच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद केली आणि अस्पृश्यांना सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. अशा सरकारी आदेशाच्या जोडीने महाराजांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक बागबगिचे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असेही आदेश जारी केले. या शिक्षणाच्या गंगेत स्त्रीयांना जागा असावी म्हणून सरकारी हुकूम जारी केली.
शिक्षणाच्या प्रसाराप्रमाणेच महाराजांनी अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी सक्रिय प्रयत्न केले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्रात लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा’ हा वाद रंगला होता. सुधारकांत दोन प्रकारचे सुधारक होते. एक कर्ते सुधारक तर दुसरे फक्त बडबड करणारे सुधारक. महाराज पहिल्या गटात मोडणारे होते. त्यांनी 1916 साली गंगाराम कांबळे या दलित समाजातील व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे हॉटेल सुरू करण्यास सर्व प्रकारची मदत केली. कांबळे यांच्या ‘सत्य सुधारक हॉटेलात महाराज स्वतः चहा पिण्यासाठी जात असत. ‘बोले तसा चाले, त्याची वंदावी पाऊले’.
या वैचारिक बांधिलकीचा नंतरचा टप्पा म्हणजे महाराजांनी 1919 मध्ये सवर्ण आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वेगळया शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद संपवण्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. एवढ्यावर महाराज थांबले नाही तर त्यांनी स्वतःच्या चूलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील इंदुरच्या यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. याचप्रमाणे महाराजांनी संस्थानात सुमारे शंभर मराठाधनगर विवाह घडवून आणले. नंतर महाराजांनी पुनर्विवाहाचा कायदासुद्धा केला. यामुळे कोल्हापुर संस्थानात विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली. त्याकाळी धर्माच्या नावाखाली देवांना मुलं वाहण्याची पद्धत भारतात अनेक ठिकाणी सुरू होती. महाराजांनी कोल्हापुर संस्थानात ‘जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा’ केला आणि ही घृणास्पद पद्धत बंद केली.
महाराजांचे कार्य फक्त सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सुधारणांपुरतेच मर्यादित नव्हते. त्यांना आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातसुद्धा संस्थानाची प्रगती व्हावी अशी आस होती. याच हेतूने त्यांनी कोल्हापुर जवळ 1907 साली राधानगरी धरणाचे काम सुरू केले. तसेच त्यांनी 1906 साली कोल्हापुर शहरात ‘श्री शाहू छत्रपती मिल्स’ सुरू केली. या उद्योगव्यवसायासाठी कुशल कामगार लागतील याचा अंदाज असल्यामुळे तांत्रिक शिक्षण देणारे तंत्रविद्यालय सुरू केले. रयतेला राजकीय शिक्षण मिळावे यासाठी महाराजांनी 1919 साली ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था निपाणीला स्थापन केली.
शाहू महाराज पुरोगामी विचारांचा प्रसार करणार्‍या अनेक संस्था आणि व्यक्तींना सढळ हाताने मदत करत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ला महाराजांनी त्याकाळी आर्थिक मदत केली होती.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीत वेदोक्त प्रकरणाला फार महत्व आहे. काही अभ्यासकांच्या मते पुढे महाराष्ट्रात गाजलेल्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे मूळ वेदोक्त प्रकरणात आहे. महाराजांच्या इच्छेप्रमाणे वेदोक्त पद्धतीने संस्कार करण्यास नकार दिल्यामुळे हा वाद सुरू झाला. यात महाराजांनी पुरोहित उपाध्याय राजोपाध्ये यांचे इनाम जप्त केले. एवढेच नव्हे तर महाराजांनी ब्राह्मण शंकराचार्यांना पर्याय म्हणून क्षात्रजगत्गुरूंचे धर्मपीठ स्थापन केले आणि ब्राह्मणशाहीचा बीमोड करण्यासाठी प्रत्येक जातीचे उपाध्याय तयार करण्याची मोहीम हाती घेतली. महाराजांचे जीवनकार्य काळजीपूर्वक बघितले तर असे दिसून येते की महाराज ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते तर ब्राह्मणी मानसिकतेच्या विरोधात होते. महाराजांनी मराठा समाजाप्रमाणेच जैन, मुसलमान, लिंगायत आणि अस्पृश्य जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे काढून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती.
त्यांनी सुरू केलेल्या वसतिगृहांच्या यादीवरून नजर फिरवली तर छाती दडपते. 1901 साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस, 1901 साली दिगंबर जैन बोर्डिंग, 1906 साली वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह, 1906 साली मुस्लिम बोर्डिंग, 1915 साली इंडियन ख्रिश्‍चन होस्टेल, 1919 साली ढोर चांभार बोर्डिग वगैरे नावं काळजीपूर्वक वाचली म्हणजे महाराजांचा सर्वसमावेशक दृष्टीकोन समोर येतो. ही वसतीगृहं फक्त कोल्हापुर संस्थानात स्थापन केली, असं नाही. महाराष्ट्रातल्या इतर शहरांतही महाराजांनी अशी वसतीगृहं स्थापन केली. 1920 साली नासिक येथे उदाजी मराठा वसतीगृह, 1920 साली अहमदनगर येथे चौथे शिवाजी महाराज मराठा वसतीगृह, 1920 साली नाशिकला उभे केलेले वंजारी समाज वसतीगृह, 1920 साली नागपूर येथे बांधलेले चोखामेळा वसतिगृह तसेच 1920 साली पुण्यात स्थापन केलेले छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग वगैरे संस्थांबद्दल वाचले की महाराजांच्या विशाल दृष्टीकोनाचा अंदाज येतो.
महात्मा फुलेंनी पुण्यात 24 सप्टेंबर 1873 रोजी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन केला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचे निधन झाले. त्यानंतर काही काळ सत्यशोधक चळवळीला मरगळ आली होती. यथावकाश या चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांकडे आले. या चळवळीच्या वाटचालीत 1919 साली संपलेला तिसरा टप्पा महत्वाचा समजला जातो. सत्यशोधक समाजाच्या वार्षिक परिषदांना महाराजांचा भक्कम पाठिंबा होता. म्हणूनच या काळात सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रभर पसरली. सत्यशोधक समाजाची पहिली परिषद 1911 साली रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. शाहू महाराजांच्या उदार आणि सक्रिय पाठिंब्यामुळे या चळवळीने झंझावाताचे रूप धारण केले. परिणामी कोल्हापुरात 11 जानेवारी 1911 रोजी ‘श्री शाहू सत्यशोधक समाज’ स्थापन करण्यात आला. ब्राह्मणेतर पुरोहित तयार करण्यासाठी भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जुलै 1913 मध्ये कोल्हापुरात ‘सत्यशोधक शाळा’ स्थापन करण्यात आली.
शाहू महाराजांना गोरगरीबांच्या उद्धाराची फार कळकळ होती. यासाठी ते महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांच्या सतत संपर्कात असत. 1917 साली शाहू महाराज ‘प्रबोधन’कार के. सी. ठाकरे यांना म्हणाले होते ‘कोटयवधी मागासलेल्या खेडूतांच्या उद्धाराचा आज सवाल आहे. त्यांना सामाजिक आणि धार्मिक रूढींच्या विळख्यातून सोडवायचे आहे. त्यासाठी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजतत्वांचा खुप प्रसार व्हायला पाहिजे’.
शाहू महाराजाचे असे बहुआयामी कार्य या छोटया लेखाच्या अवकाशात पकडणे शक्य नाही. लोकोत्तर आणि पुरोगामी विचारांच्या शाहू महाराजांना नम्र अभिवादन!

Exit mobile version