व्ही. त्यागराजन
अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या पश्चात पक्षाच्या दोन नेत्यांमधला संघर्ष तीव्र झाला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पक्षाच्या नेत्यांनी त्यातून धडा घेतलेला दिसत नाही. आता तर या पक्षातल्या दोन नेत्यांमधला वाद हाणामारीपर्यंत गेला असून जयललिता यांच्या पश्चात पक्षाचं अस्तित्व राहत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तमिळनाडूमधल्या गेल्या काही महिन्यांतल्या घटनांवर नजर टाकली तर अण्णाद्रमुक पक्षाचं नेतृत्व कुणी करायचं, यावरून जोरदार संघर्ष सुरू असल्याचं पहायला मिळतं. हा संघर्ष पाहिला तर दोन नेत्यांमधल्या पराकोटीच्या वादात पक्ष दुबळा होत असल्याचं दिसतं. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून संघर्ष करणारे हे दोन नेते आहेत एडप्पादी पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम. दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. पक्षावर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी दोघांमध्ये सुरु असलेल्या लढाईमुळे पक्षाला मोठा फटका बसत आहे. वर्चस्वाची ही ‘छुपी’ लढाई पक्षाला नक्कीच कमकुवत करणारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होत आहे. राज्यात भाजप आक्रमकपणे पाय पसरत असताना हे घडत आहे. दोन्ही नेत्यांनी हा प्रश्न काही काळ सोडवला तरी नेतृत्वाचा मुद्दा अण्णाद्रमुकसाठी अडचणीचा ठरणार आहे. हे असंच सुरू राहणार आहे आणि ते लवकर सुटण्याची शक्यता नाही. अण्णाद्रमुक पक्ष निराशेच्या आणि नेतृत्वाच्या लढाईच्या टप्प्यातून जात असला तरी तो भारतीय जनता पक्षाच्या स्वप्नांवर आणि महत्वाकांक्षांवर आधारित आहे. राज्यात अण्णाद्रमुक अजून कमकुवत झालेला नाही. हा पक्ष कमकुवत झाला तर ते त्याची जागा घेऊ शकतील, असं भाजप आणि पक्षाचे नेते अण्णामलाई गृहीत धरत असतील तर त्यांचा विचार अजिबात योग्य नाही. तामिळनाडूचा अलीकडचा राजकीय इतिहास या गोष्टीचा पुरावा आहे की अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोन्ही द्रविडीयन पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना त्यांच्या राज्यात प्रवेश करू दिलेला नाही आणि साठच्या दशकाच्या उत्तरार्धात काँग्रेसची हकालपट्टी केल्यानंतर आपले पाय रोवले आहेत.
अण्णाद्रमुक असो वा द्रमुक, दोन्ही पक्षांना निःसंशय अनेक निवडणुकांमध्ये दणदणीत पराभव पत्करावा लागला आहे; परंतु नंतर त्यांनी दणदणीत विजयासह पुनरागमनही केलं. जयललिता यांना 1996 मध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं; पण पाच वर्षांनी त्यांचं जोरदार पुनरागमन झालं. तसंच द्रमुकनेही पराभवानंतर अनेकदा दणदणीत विजय मिळवला. आधी काँग्रेस आणि आता भाजप राज्याच्या राजकारणात पोकळी भरून काढण्याचा विचार करतात आणि त्यासाठी प्रयत्नही करतात; परंतु त्यांना या कामी कधीही फारसं स्थान मिळालेलं नाही. दोन प्रादेशिक पक्षांच्या जीवावरच त्यांचं राजकारण चालतं. पुढील दोन-तीन वर्षांसाठी निवडणुका नाहीत आणि तोपर्यंत हे दोन्ही नेते पक्षाच्या नेतृत्वासाठी डावपेचांचा खेळ आरामात खेळू शकतात. जयललिता यांच्या पश्चात पक्षाचं नेतृत्व कुणाच्या एकाकडे असावं, असा सूर पक्षाच्या बैठकीत निघाला. अण्णाद्रमुकचे प्रवक्ते आणि माजी ज्येष्ठ मंत्री डी. जयकुमार यांनी यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना सांगितलं की, एकाच नेतृत्वाबाबत चर्चा झाली आहे. या चर्चेत कोणतीही नकारात्मकता नसून बहुतांश पदाधिकारी आणि जिल्हा सचिवांनी अण्णाद्रमुकमध्ये एकच नेतृत्व असण्यावर भर दिला आहे. पलानीस्वामी यांनी एक प्रकारे पक्षावर पकड ठेवली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबाही आहे. त्याच वेळी, पनीरसेल्वम यांची पोहोच तामिळनाडूच्या पश्चिम भागापर्यंत मर्यादित आहे. या तुलनेत पलानीसेल्वन यांना पक्षांतर्गत पूर्ण पाठिंबा मिळत असून महापरिषदेच्या कामकाजातही हीच बाब समोर आली असून पक्षाची धुरा एकाच नेत्याकडे देण्याची मागणी नेत्यांनी एकजुटीनं केली आहे.
आकड्यांवर बारकाईने नजर टाकली तर जयललिता यांच्या निधनानंतर, दुहेरी नेतृत्व मॉडेलला निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पोटनिवडणुकांचा निकाल त्याला अपवाद आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत पलानीसेल्वम सरकारला सत्तेत राहण्यास मदत केली. सध्याची राजकीय परिस्थिती द्रमुकला अनुकूल आहे. हा पक्ष शांतपणे आपलं स्थान मजबूत करण्यासाठी पुढे जात आहेत. व्ही. के. शशिकला या जयललिता यांच्या दीर्घकालीन सहयोगी होत्या. त्या अधूनमधून पक्षावर आपला अधिकार सांगून त्यांच्या नेतृत्व संघर्षात भर घालतात. अण्णाद्रमुकने नेतृत्वाचा प्रश्न लवकर सोडवून पक्षाच्या बेशिस्तीला आळा घातला नाही, तर पक्ष गंभीर संकटात सापडू शकतो. याचा अर्थ अण्णाद्रमुक लगेच संपेल असं नाही. अण्णाद्रमुकमधल्या नेतृत्वाच्या संघर्षाचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करत असला तरी ते लगेच साध्य होईल असं नाही. जयललिता यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते सी. पोनय्यान यांनी भाजपबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अण्णाद्रमुकला राज्याच्या राजकारणात आपल्या क्षेत्रावर अतिक्रमण होत आहे, हे चांगलंच माहीत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात पक्ष आपली प्रतिष्ठा आणि सत्ता बहाल करण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचलू शकतो. तामिळनाडूमध्ये भाजपने अण्णाद्रमुकसोबत केलेली सौदेबाजी ही राज्यात अधिक सत्ता मिळवण्यासाठी आहे, हे लपून राहिलेलं नाही. तामिळनाडूच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी भाजपला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
जयललिता यांच्या मृत्युपश्चात कुटुंबातलं कोणीही नसल्याने त्यांचे वारसदार असल्याचे दावे अनेक नेत्यांनी केले होते. त्या वेळी प्रामुख्याने तीन नेते पुढे आले. व्ही. के. शशिकला, तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आणि एडापाडी पलानीस्वामी. वारसदारांमध्ये व्ही. के. शशिकला यांना फारसा विरोध नसल्यानं त्यांचं नाव आघाडीवर होतं; पण भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर ईडी-सीबीआयने केलेल्या चौकशीमध्ये व्ही. के. शशिकला यांना तुरुंगवास झाला. त्यामुळे त्या राजकीय वारसाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या. त्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी दोन (इपीएस आणि ओपीएस) गट निर्माण झाले. या दोन्ही गटांच्या स्पर्धेत व्ही. के. शशिकला यांनी इपीएस गटाच्या बाजूनं कौल दिला. त्या गटाचे एडापाडी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपद मिळालं तर ओपीएस गटातल्या ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर झालं ते ताजं आहे. शशिकला तुरुंगात असताना पलानीस्वामी यांना किमान पक्षांतर्गत आमदारांवर प्रभाव निर्माण करता आला. ते चार वर्षं मुख्यमंत्रिपदावर राहिले. त्यांनी पक्षांतर्गत स्पर्धा कमी करून पक्ष स्थिर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अण्णाद्रमुकच्या मतदारांमध्ये त्यांना काही प्रमाणात मान्यता मिळाली होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मात्र मतदारांनी त्यांना धडा शिकवला. अलिकडेच अण्णाद्रमुकचे समन्वयक ओ. पनीरसेल्वम आणि सहसंयोजक पलानीस्वामी यांच्या समर्थकांमध्ये रॉयपेट्टा इथल्या पक्षाच्या मुख्यालयात हाणामारी झाल्याने अण्णाद्रमुकचा एक कार्यकर्ता जखमी झाला.
2पक्षाच्या ठराव समितीची पक्ष कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर बैठक सुरू असताना आणि पन्नीरसेल्वम आपल्या समर्थकांसह पक्ष मुख्यालयाच्या तळमजल्यावर बैठक घेत असताना ही हाणामारी झाली. दुसरीकडे, पलानीस्वामी हे त्यांच्या निवासस्थानी एसपी वेलुमणी, विजयभास्कर आणि थंगमणी यांच्यासह माजी मंत्र्यांशी सल्लामसलत करत होते. पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना मारीमुथू यांनी आरोप केला की ईपीएसचा समर्थक असल्यामुळे त्यांना मला मारहाण केली. पक्ष कार्यालयात येणार्या पक्षाच्या सदस्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि सुरक्षा कर्मचार्यांना गर्दी आवरता आली नाही. पक्षाच्या दोन गटांमधल्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. यावरून पक्षातल्या राजकीय संकटाची तीव्रता पुढे आली आहे. एकल नेतृत्वाच्या वाढत्या मागणीला अंतिम रूप देण्यावरून दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये वादाची नवी फेरी सुरू झाली आहे. पलानीस्वामी यांनी बैठकीत ठराव मंजूर करून पक्षाचे सरचिटणीस बनण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं असताना पनीरसेल्वम आणि त्यांच्या गटाचा त्यांना कडवा विरोध आहे. पन्नीरसेल्वम यांना पुढील सरचिटणीस व्हायचं आहे. दोन्ही गटातले नेते सभेसाठी येत असल्याने त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकही आले होते. या बैठकीला पलानीस्वामी यांनी अनुपस्थित राहणं पसंत केलं. नेते भित्तीपत्रकावर चर्चा करत असताना कार्यालयासमोर उभे असलेले कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांनी आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पलानीस्वामी यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री जयकुमार सभेसाठी आले असता पनीरसेल्वम यांच्या समर्थकांनी ताकद दाखवण्यासाठी त्यांना अडवलं. शाब्दिक युद्ध हाणामारीपर्यंत पोहोचलं. एकंदरीत घडामोडींवरून नेतृत्वाचा संघर्ष किती टोकाला गेला आहे, हे कळतं.





