उत्तरार्ध

दलित पँथर इथून पुढची आव्हानं

दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना चळवळीसमोरच्या आजच्या विविध आव्हानांचा नव्याने वेध घ्यायला हवा. त्यांना भिडायला हवे तरच विद्यापीठ नामांतरासारख्या आंदोलनांचे खरे चीज होईल.

पुढे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 12 जागा दिल्या. परंतु या 12 पैकी एकही जागा निवडून आली नाही. सर्वच्या सर्व 12 जागा पडल्या. कारण या मंडळीला निवडणुकीचं तंत्र माहीत नव्हतं व निवडणुकीच्या तंत्रामध्ये वाकबगार असलेली काँग्रेस स्वतःचा पूर्ण फायदा करुन घेते आणि सहकारी पक्षाला पूर्णपणे वापरुन घेते. या निवडणुकीत काँग्रेसने तेच केले आणि पँथर उर्फ न्यु रिपब्लिकनला निष्प्रभ म्हणजे दात आणि नखे काढलेला चित्ता बनविले. ही शक्ती उद्रेकी बनू नये म्हणून काँग्रेसचे मुरब्बी नेतृत्व शरद पवार यांनी रामदास आठवले यांना स्वतःच्या मंत्रीमंडळात समाजकल्याणचे मंत्री म्हणून घेतले व टी.एम. कांबळे यांना विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त आमदार बनविले. रामदास आठवले हे मंत्री झाल्यामुळे आता नामांतर प्रश्‍न सोडवून घेतील ही अपेक्षा वाढली. परंतु 1989 पासून ते 1993 पर्यंत रामदास आठवले नामांतराचा साधा उच्चार सुद्धा करु शकले नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढली. गंगाधर गाडे यांनी रामदास आठवलेंना निर्वाणीचा इशारा दिला, जर नामांतराबद्दल काही निर्णय होत नसेल तर मला पुन्हा रस्त्यावर उतरुन पँथरच्या झेंड्याखाली नव्याने नामांतर संघर्ष सुरु करावा लागेल! परंतु रामदास आठवले मात्र कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नव्हते. वास्तविक बाबासाहेबांचे जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने शरद पवारांना निर्णय होत नसेल तर मला पुन्हा रस्त्यावर उतरुन पँथरच्या झेंड्याखाली नव्याने नामांतर संघर्ष सुरु करावा लागेल. परंतु रामदास आठवले मात्र कोणताही प्रतिसाद देण्यास तयार नव्हते. वास्तविक बाबासाहेबांचे जन्म शताब्दी वर्षानिमित्ताने शरद पवारांना निर्णय घेण्यास रामदास आठवले सांगू शकत होते. परंतु रामदास बोलण्यास तयार नव्हते. उलट ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यांनी नामांतर मुद्यावर चर्चा करीत होते. त्या त्यावेळी रामदास आठवले कार्यकर्त्यांनाच दम देत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती. कार्यकर्त्यांच्या या असंतोषाला वाट करुन देण्याचे काम गंगाधर गाडे यांनी केले. 1993 साली पुन्हा भारतीय दलित पँथरची घोषणा औरंगाबाद येथे करण्यात आली .आणि गंगाधर गाडे यांच्या नेतृत्वाखाली पँथरने नामांतर लढ्याला पुन्हा गती दिली. याचा परिणाम असा झाला की तरुण कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थी यांच्या मनात नामांतर प्रश्‍नाला घेऊन असलेल्या असंतोषाला नव्याने वाट मिळाली आणि महाराष्ट्रातील युवा शक्ती पँथरच्या माध्यमातून पुन्हा रस्त्यावर उतरली. त्यातच पँथरने नांदेड जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे यांनी महाराष्ट्र शासनाला नामांतर होत नसेल तर स्वतः आत्मदहन करेल अशी नोटीस दिली. परंतु शासनाने म्हणावी तशी दखल घेतली नाही. कारण अशा नोटीस देणारे खरोखर आत्मदहन करतातच असे नाही असे गृहीत धरुन जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र शासन आणि समाजकल्याण मंत्री व नामांतर लढ्याचे एकेकाळचे सेनापती रामदास आठवले हे सुद्धा गाफील राहिले व करारी आणि शुर बाण्याचा नामांतर सैनिक गौतम वाघमारे याने स्वतः सरण रचून, सरणावर पेट्रोल टाकून आणि स्वतःच्या अंगावर सुद्धा पेट्रोल टाकून घेतले व स्वतःच स्वतःच्या सरणाला आग लावली व त्यावर स्वतःला झोकून दिले व स्वतःचे आत्मबलिदान करुन विझत चाललेल्या नामांतर लढ्याला पुन्हा पेटविले.
गौतम वाघमारे नंतर प्रतिभा तायडे, रामटेके, बनसोडे, साहेबराव गायकवाड अशा शेकडो विरांनी एका नंतर एक करुन नामांतर प्रश्‍नावर आत्मबलिदान दिले. त्यामुळे शरद पवारांसारख्या सुज्ञ आणि दूरदृष्टीच्या व परिवर्तनाची चाड असलेल्या पुरोगामी नेतृत्वाने स्वतःची खुर्ची पणाला लावून 14 जानेवारीला व मराठी संस्कृतीमध्ये तीळगूळ घ्या व गोडगोड बोला या वैरभाव विसरण्याचा संदेश देणार्‍या संक्रांतीच्या सणांचा मुहूर्त साधून मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराची घोषणा केली व 17 वर्षाच्या संघर्षाला पूर्णविराम दिला.परंतु खंत एकच आहे की, शेकडो लोकांची आहुती आणि शेकडो तरुणांचे आत्मबलिदान, घरादारांची राखरांगोळी व अनेक आयाबहिणींवर अमानुष बलात्कार! एवढी किंमत देऊनही बाबासाहेबांचे नाव फक्त मराठवाडा या नावाला जोडून नामविस्तार केला व त्याचेही विभाजन करुन चारच जिल्हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जोडले व चार जिल्हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला जोडले. आम्हाला नामांतर पाहिजे होते परंतु मिळाले मात्र नामविस्तार! आणि नामांतर विरोधकांना मात्र मिळाले रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ!
आणि आता या विद्यापीठाचे विभाजन करुन उस्मानाबाद केंद्राला स्वतंत्र विद्यापीठ करुन नवीन विद्यापीठ बनविण्याचा घाट जातीयवादी मंडळींनी पुन्हा घातला आहे. यामागे जातीयवादाशिवाय दुसरा कोणताच हेतू नाही. बाबासाहेबांच्या नावाची पदवीची सनद आम्ही देवघरात लावावी का? असा प्रश्‍न कालही विचारीत होते व आजही तीच सल या जातांध व धर्मांध शक्तीच्या मनात आजही आहे. म्हणून बाबासाहेबांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध न करता विभाजनाचा घाट घालून बाबासाहेबांच्या नावाला दोन जिल्ह्यापर्यंतच मर्यादित करण्याचा हा कुटील डाव आहे. पुढे मागे एका  जिल्ह्यापर्यंत व शेवटी मिलिंद महाविद्यालय व नामसेन परिसरापर्यंतच करण्यासही हे कुटील कारस्थानी मागे पुढे पाहणार नाहीत. कारण मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर व इतर विद्यापीठाचे प्रशासनाच्या व विभागीय विस्ताराच्या कारणाने कितीवेळा विभाजन झाले? याचाही हिशेब जातीयवादी व कारस्थानी मंडळींनी दिला पाहिजे. मुंबईचा विस्तार तर दिवसेंदिवस वाढतच आहे. मग त्याचे किती विभाजन करणार? हा आमचा प्रश्‍न आहे. एकीकडे हा देश बाबासाहेबांच्या घटनेमुळे व बाबासाहेबांच्या राष्ट्रीय भूमिकेमुळे हा देश एकसंघ आहे असे म्हणायचे व दुसरीकडे बाबासाहेबांचे नाव जोडले म्हणून त्या विद्यापीठाचे विभाजन करायचे हे सर्व ढोंग असून अजूनही हे लोक बाबासाहेबांना स्विकारायला तयार नाहीत हेच यावरुन सिद्ध होते. असे खेदाने म्हणावे लागते.
परंतु आम्ही हार मानणार नाही. यानंतर आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करणार आहोत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देऊन या विद्यापीठाचे महत्त्व देशभरच नव्हे तर जगभर करावे. याचबरोबर दलित, ओबीसी व आदिवासी विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी. या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची सोय करावी त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत आणि सक्तीचे असावे. नोकरीची हमी व राखीव जागा त्वरीत भरण्यात याव्यात, यासह गायरान जमीन, खासगीकरण बंद करावे, राखीव जागा भराव्यात व राखीव जागेतील बढती यासह अनेक प्रश्‍न घेऊन पुढे वाटचाल करणार आहेत. 

Exit mobile version