ट्रेकर मंडळी, जरा धीर धरा !

संतोष डुकरे

सह्याद्रीत अशी एकही गोष्ट नाही की जी फक्त जुन जुलै मध्येच दिसते आणि त्यानंतर दिसतच नाही, वा तिचा आनंदच घेता येत नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर हे दोन महिने आपल्याला सह्याद्रीतील निसर्ग संपदेचा 100% यथार्थ आनंद देण्यात सक्षम आहेत, त्यापुढील हिवाळाही अनुकूलच आहे.मग जणू काही मरणाची ओढ लागलीय, असा उताविळपणा दाखवणारे पर्यटन, ट्रेकिंग कशासाठी? 

रणरणत्या उन्हाळ्यानंतर पाऊस सुरू झाला की पाणी, हिरवळ आणि डोंगरप्रेमी पर्यटक व ट्रेकर… त्यातही नवाट ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येईल तो शनिवार रविवार ट्रेक, अ‍ॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेक धंदेवाईक मंडळी ही संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात… आणि खरा धोका इथून पुढे सुरू होतो.
 जुन ते ऑगस्ट कालावधीत तुम्ही ट्रेक करू इच्छित असाल, सह्याद्रीत पावसाळी भटकंतीला जावू इच्छित असाल तर आधी पुढील गोष्टी बारकाईने वाचा आणि मग तुम्हाला हवं तसं करा…
 सह्याद्री + पावसाळा + ट्रेकिंग/पर्यटन या गोष्टींच्या गेल्या 20 वर्षांच्या डोळस अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष आपल्यासमोर मांडतोय. अनुभवी मंडळींना हे ठावूक आहे आणि त्याबरहुकूम ते कृतीही करतात, कारण सह्याद्री काय किंवा हिमालय काय… चुकीला माफी नाही, हे त्यांना ठावूक असतं.
 15 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीत सह्याद्री सर्वाधिक धोकादायक, आपत्तीकारक व जिवघेना असतो. सर्वसाधारणपणे सह्याद्रीतील 80 टक्के अपघात या काळात घडतात.
दरडी कोसळणं, भुसख्खलन, ओढे, नाले वा नद्यांना अचानक पाण्याचा लोंढा येणं, ढगफुटी, विजा कोसळणं, विषारी सर्पदंश, दाट धुक्यामुळे रस्ता चुकणं, घसरणं, झाडं कोसळणं ही या अपघातांची कारणे असतात.
शाळेत भूगोल निट शिकलेल्यांना सह्याद्री कसा बनलाय, त्यातील खडकाचे प्रकार, स्तर, त्यावर ऊन, वारा व शेवटी पावसाचा परिणाम होवून दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीला होणार्या नैसर्गिक गोष्टींची जाणिव असेलच. ते ही नसेल तर आंबेगाव तालुक्यातील माळीण दुर्घटना मनात ताजी असेलच… ती ही नाही आठवली तर गेल्या महिनाभरात सिंहगडापासून अनेक ठिकाणी घडलेल्या दुर्घटना, घाटात दरडी पडून रस्ते बंद झालेलं तरी पाहत असालच.
विजा कोसळून होणारे मृत्यू वा हानी हा ही सह्याद्रीतील चिंतेचा विषय. विजा कोसळण्याचेही शास्र आहे आणि त्यांच्यापासून बचावाचेही आहे. उंच ठिकाणी व झाडांखाली न थांबणे ही त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट. जी तुम्ही सह्याद्रीत फॉलो करू शकत नाही किंवा करणं अति अवघड. विज कोसळण्याची पूर्वसूचना देणारे अ‍ॅप आलेय, पण मुळात एवढं जिवावर उदार होऊन जोखीम घ्यायचं कारणच काय. दोन महिने शांत राहीलं, धोकादायक पर्यटन नाही केलं तर आयुष्य थोडंच उद्ध्वस्त होणार आहे तुमचं?
केदारनाथ आणि आत्ता अमरनाथ च्या ढगफुटीचा व त्यातील जिवितहानी चा विषय ताजा आहे. पण ढगफुटी काय फक्त हिमालयातच होते असे नाही. सह्याद्रीत तर ती नेहमीचीच बाब आहे. अगदी ऊन पडलेलं असतानाही ढगफुटी होवून आलेल्या लोंढ्यांमुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला गेलेल्या अनेकांनी जीव गमावले आहेतच.
गेल्या पावसाळ्यात माळशेज घाटात ढगफुटी झाली. ते पाणी अचानक एमटीडीसी रिसॉर्टच्या खालच्या बाजूने धो-धो वाहू लागले. यात काळू धबधबा पहायला गेलेला एक गृप सापडला. 3-4 तासाच्या निकराच्या झुंजीनंतर कसेबसे बचावले. अशी उदाहरणे जागोजागी भेटतात. आम्ही काशी केली, अमक्या जागी गेलो आणि थोडक्यात बचावलो, 10 मिनिट उशीर झाला असता तर मेलो असतो असे अनेक लोकं सांगतात… पण लक्षात कोण घेतो.
पावसाळ्यात सह्याद्रीतील साध्या वाटाही अत्यंत धोकादायक होतात. काही अपघात घडले तर मदत व बचावकार्य करणार्या यंत्रणांना तिथपर्यंत पोहचणं व जीव वाचवणं दुरापास्त होवून बसतं. इतर वेळी जर अशा ठिकाणी अपघातग्रस्तांचे जिव वाचण्याची शक्यता 95 टक्के असेल तर पावसाळ्यात ती फक्त 5 टक्के असते, हे गांभिर्याने लक्षात घ्या.
सह्याद्रीत अशी एकही गोष्ट नाही की जी फक्त जुन जुलै मध्येच दिसते आणि त्यानंतर दिसतच नाही, वा तिचा आनंदच घेता येत नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर हे दोन महिने आपल्याला सह्याद्रीतील निसर्ग संपदेचा 100% यथार्थ आनंद देण्यात सक्षम आहेत, त्यापुढील हिवाळाही अनुकूलच आहे. मग जणू काही मरणाची ओढ लागलीय, असा उतावीळपणा दाखवणारे पर्यटन, ट्रेकिंग कशासाठी?
नेमका हाच काळ आहे, ज्यात सह्याद्री पुरुत्पादनाच्या प्रक्रियेत असतो. किडामुंगीपासून लाखो वनस्पतींपर्यंत सर्वजण जागतिक जैवविविधतेचा हा प्रचंड मोठा ठेवा, समृद्ध वारसा निसर्गतः संवर्धित करण्याच्या प्रयत्नात असतात. मग त्यात भंडारदरा, ताम्हिनीतील काजवे ही आले. आपला पर्यटनाचा अतिरेकी हव्यास, अति धोकादायक दोन तीन महिन्यातही शांत न रहाणं या जैवविविधतेच्याही मुळावर उठतेय. आपण सह्याद्रीचे पहारेकरी न ठरता मारेकरी होतोय… याचेही भान राखायला हवे.
15 मे ते 15 ऑगस्ट हा कालावधी सह्याद्रीत ट्रेक साठी अनुकूल नाही, ही खूणगाठ मनाशी बांधून या काळात ट्रेक करणं कटाक्षाने टाळायला हवं.
ट्रेकिंग करताना गर्दीची ठिकाणं किंवा गर्दीचे दिवस कटाक्षाने टाळायला हवेत. आपल्याला जर निसर्गाचा आनंद चांगल्या पद्धतीने घ्यायचाय, एनरिच व्हायचंय तर त्यासाठी शनिवार रविवार सोडून इतर दिवस काढा ना वेगळा. शनिवार रविवारी गर्दीचे महापूर लोटतात अनेक ठिकाणी मग ती कळसुबाई असेल किंवा हरिहर, तोरणा वा अगदी मोरोशीचा भैरवगड. 100 ची क्षमता असलेल्या ठिकाणी 1000-2000 लोकं कोंबल्यावर जी परिस्थिती उद्भवणार तिच सध्या या व यासम अनेक किल्ल्यावर उद्भवतेय. कशासाठी ही एवढी झुंबड. बरं असंही नाही की गडकिल्ले फक्त शनिवार रविवार सुरू असतात दर्शनाला. सगळ्या गोष्टी आपण आपल्या आंधळ्या सोईनं आणि अर्धवट ज्ञानानं करायला जात असू तर एक ना एक दिवस आपला घात होणार हे निश्‍चित.
सह्याद्री सोडून इतरत्रही महाराष्ट्र पर्यटन पसरलं आहे. कमी पावसाचा मराठवाडा, पश्‍चिम विदर्भ, खानदेशाचा सपाटीचा प्रदेश या भागातही विपूल व सुरक्षित आनंद घ्यावा अशी निसर्गसंपदा, दुर्गसंपदा आहे. या काळात आपण आपला मोर्चा तिकडे वळवू शकता, जर बाहेर पडायची खुमखुमी टाळता येत नसेलच तर…
15 ऑगस्ट नंतर पावसाची उघडीप किंवा शांत अतिमंद रिमझिम पाऊस व शांत वारा असेल तेव्हा पन्हाळा ते पावनखिंड, भिमाशंकर ते लोणावळा असे काही सुरक्षित पठारी ट्रेक आहेत. दर वर्षी शेकडो ट्रेकर ते निर्विघ्नपणे पार पडतात. एकमेव गोष्ट म्हणजे निसर्गाची अनुकूलता.
लक्षात घ्या… ट्रेकिंग, दुर्गभ्रमंती, पावसाळी पर्यटन, सह्याद्रीतील भटकंती ही पुर्णतः निसर्गाशी निगडीत बाब आहे. त्यासाठी निसर्गाची, सह्याद्रीची अनुकूलता सर्वाधिक महत्वाची असते. ते नसेल तेव्हा बळजबरी करण्यात अर्थ नसतो, जिवावर बेततं. कोणत्याही साहसवीराच्या, ट्रेकरच्या, पर्यटकाच्या आयुष्यात सहकार्यांचे मृतदेह पाहण्याची वेळ येणं हा आयुष्य उध्वस्त करणारा भाग असतो. जाणता अजाणता तुम्ही त्या चुकांचे कारण असणं ही उर्वरीत आयुष्य पोखरणारी गोष्ट असते. अशी वेळ कुणावरही येवू नये… म्हणून दक्ष रहा, स्वतःच्या मनावर किमान 15 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत तरी ताबा ठेवा आणि त्यानंतरही वाफाडल्यासारखं न करता संयमाने ट्रेकिंग, साहस पर्यटन करा.
(साभार)
(लेखक शिवनेरी ट्रेकर्स जुन्नरचे प्रमुख आहेत.)

Exit mobile version