ममतांची दोन्हीकडून अडचण…

सौरभ बॅनर्जी

राष्ट्रपतीपदाच्या आणि आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने घेतलेली परस्परविरोधी भूमिका पाहता त्यांचा धरसोडपणा दिसतो. भाजपच्या विरोधात कठोर भूमिका घेणार्‍या ममता बॅनर्जी अप्रत्यक्षरीत्या आता भाजपला मदत करण्याची भूमिका घेत आहेत. भाजपने मात्र पश्‍चिम बंगालच्या मंत्र्यांमागे ‘ईडी’चं शुक्लकाष्ट लावल्याने त्यांची दोन्हीकडून अडचण झाली आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये सध्या नाटक सुरू आहे. ममता बॅनर्जी सरकारमधले ज्येष्ठ मंत्री पार्थ चटर्जी हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात आहेत. शिक्षक भरती घोटाळ्यात चौकशी करणार्‍या ‘ईडी’ने त्यांना अटक केली. अटकेपूर्वी त्यांची 26 तास चौकशी करण्यात आली. शाळेतल्या शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित तपासात ही अटक करण्यात आली आहे. पार्थ चटर्जी हे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीसही आहेत. त्यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता बॅनर्जी यांच्या घरातून ‘ईडी’ला 21 कोटी 20 लाख रुपये मिळाले. सरकारी शाळांमधल्या शिक्षकभरतीच्या संदर्भात ‘मनी लाँड्रिंग’चा तपास सुरू असून त्यात अनेक व्हीव्हीआयपींच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारी अनुदानित शाळांमधल्या शिक्षक भरती प्रक्रियेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता अर्पिता बॅनर्जीला ताब्यात घेतल्यानंतर ‘ईडी’ चटर्जी आणि बॅनर्जी यांच्यातील संबंधाची चौकशी करण्याची शक्यता आहे. किमान भाजपचा तरी तसाच प्रयत्न आहे. अर्पिताच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसने ही वसुली केल्याचा भाजपचा आरोप आहे. अर्पिता ही चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक बंगाली, उडिया आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे; पण अर्पिता मुखर्जीची दुसरी ओळख म्हणजे पार्थ चटर्जी यांची अगदी जवळची सहकारी, असं भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचं म्हणणं आहे; मात्र तृणमूल काँग्रेस अर्पिता बॅनर्जीसोबतचे संबंध नाकारत आहे.
अर्पिताला दुर्गापूजा मंडपांमध्ये जाहिरातीची जबाबदारीही मिळाली होती, अशी माहिती आहे. दुर्गापूजेदरम्यानच पार्थ आणि अर्पिताची भेट झाली. ‘ईडी’ला पार्थ चॅटर्जी यांची आणखी एक जवळची सहकारी मोनालिसा दास हिच्या घरातून, शांतीनिकेतन आणि कोलकातासह अनेक ठिकाणी फ्लॅट आणि जमिनीची कागदपत्रं मिळाली आहेत. मोनालिसा काझी नजरुल इस्लाम विद्यापीठात शिकवते. त्याचबरोबर पश्‍चिम बंगाल सरकारचे आणखी एक मंत्री परेश अधिकारी यांचीही या प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांच्या कूचबिहार इथल्या घराचीही झडती घेण्यात आली. शालेय शिक्षण आयोगाच्या इतर अनेक उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले. अर्पिताच्या घरातून एवढी मोठी रोकड सापडली की मोजणीसाठी नोटा मोजण्याचं मशीन मागवण्यात आलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सातत्याने कमकुवत होत चाललेल्या भाजपला या धाडीतून बळ मिळालं आहे. ‘ईडी’च्या या कारवाईने एक प्रकारे सुवेंदू अधिकारी यांच्या हातात आयतं कोलित आलं आहे. ममता सरकारमधल्या एक ज्येष्ठ मंत्री जाळ्यात अडकल्याने येत्या पंचायत निवडणुकीत भाजपला थोडंफार यश मिळेल, असं त्यांना वाटतं.
‘ईडी’च्या या कारवायांमुळे ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेवर किती परिणाम होतो, हे सांगता येणार नाही. त्याचं कारण पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीही भाजपने ‘ईडी’ला हाताशी धरून अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं होतं. ममतादीदींनी त्याचंच भांडवल करून भाजपवर बाजी उलटवली होती. 21 जुलै रोजी झालेल्या रॅलीत ममतांना ऐकण्यासाठी कोलकाता इथलं मैदान खचाखच भरलं होतं. सध्या ममतांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. ‘मनी लाँड्रिंग’मध्ये पार्थ यांचा हात असल्याचं सिद्ध झालं तर बंगाली जनतेवर नक्कीच परिणाम होईल. अशा स्थितीत तृणमूल काँग्रेसमध्येही भीतीचं वातावरण आहे. बंगाली लोक पैशांचा गैरवापर माफ करत नाहीत. तृणमूल काँग्रेस अर्पितासोबतचे संबंध नाकारत आहे. आत्तापर्यंत ममता यांची प्रतिमा प्रामाणिक आणि साध्या नेत्या अशी होती; मात्र या तपास आणि खुलाशांमुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होणार आहे. असं असलं तरी पार्थ त्यांच्या जवळच्या मंत्र्यांपैकी एक आहे. आता ममता सरकारपुढील अडचण अशी आहे की पुढच्या वर्षी पंचायत निवडणुका आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आहे. ‘ईडी’ आधीच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी करत आहे. तरीही अधीर रंजन चौधरी यांनी मौन तोडत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
गैरव्यवहाराची सूत्रं थेट तृणमूल पक्षश्रेष्ठींकडे जाऊ शकतात, असं म्हणताना त्यांचा अंगुलीनिर्देश ममतांकडे होता. हा पैसा कुठून आला हे उलगडून सांगताना ते म्हणाले की, बदली आणि भरतीमध्ये पैशांचा खेळ सुरू होता. त्याचाच हा परिपाक असावा. सीपीआय(एम)चे मोहम्मद सलीम म्हणाले की तृणमूलचे मंत्री मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेले असणं ही पश्‍चिम बंगाल सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. वास्तविक, पश्‍चिम बंगालमध्ये माकपची स्वतःची कोअर व्होट बँक आहे. त्यांनी पश्‍चिम बंगालवर 34 वर्षं राज्य केलं. या राजवटीत अशी प्रकरणं कधीच घडली नाहीत; पण अडचण अशी आहे की ममता बॅनर्जी सत्तेवर आल्यानं सीपीआय (एम) चं मूळ मत बदललं आहे. पार्थ चॅटर्जी सतत अर्पिताशी संबंध असल्याचं नाकारत आहेत; पण सुवेंदू अधिकारी यांनी शेअर केलेले फोटो या मुद्द्यांचं खंडन करतात. शिक्षक भरती घोटाळ्याबाबत आता ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे बोटं दाखवली जात होती; पण त्यानंतरही जनतेने ममता यांना ‘क्लीन चिट’ दिली होती; पण आता शिक्षण विभागातल्या नोकरभरती घोटाळ्याचा तपास थेट त्यांच्या सरकारशी जोडला गेल्याने त्या पश्‍चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि माकपच्या निशाण्यावर राहणार असून भाजप त्यांच्यासाठी मोठं संकट निर्माण करेल.
खरं तर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलपाठोपाठ भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. तर याआधी पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचं खातंही उघडलं नव्हतं. तिथे भाजपने 77 जागा जिंकल्या होत्या. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाला होता. अशा स्थितीत ममता यांना 294 पैकी 211 जागा मिळाल्या असतील; परंतु शक्तिशाली विरोधी पक्ष हा नेहमीच धोका असतो. विशेषत: केंद्रात भाजपचं सरकार असताना… त्यामुळेच अर्पिताच्या घरी सापडलेली रोकड बाहेर काढण्यासाठी तृणमूल सतत प्रयत्न करत आहे.
एनडीए-2 सरकारशी संबंध तोडणं असो किंवा अन्य मुद्दे; पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या निर्णयांनी लोकांना चकीत करत आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं आणि आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अगोदर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि अलिकडे तर त्या ज्यांच्याशी सतत संघर्ष केला, त्या राज्यपाल जगदीप धनखड यांना मतदान करण्याची भूमिका घेण्याच्या विचारापर्यंत आल्या. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मुद्द्यावर काहीही बोलत नाहीत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी ममता यांची बंडखोर वृत्ती समोर आली होती आणि त्यांनी केंद्रातल्या सत्ताधारी भाजप सरकारविरोधात उघडपणे आघाडी उघडून विरोधी पक्षांना विरोध केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपाध्यक्षपदासाठी समान उमेदवार ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला तृणमूल काँग्रेसतर्फे कोणीही उपस्थित राहिलं नाही. संसद भवनात मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधी, शरद पवार, सीताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते; मात्र ममता यांचे खासदार पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहूनही तिकडे फिरकले नाहीत. केंद्राच्या राजकारणात विरोधकांची जागा बळकावण्याची स्पर्धा लागली आहे. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांपासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय पातळीवर पक्षविस्ताराचं धोरण आखलं आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेससह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. काँग्रेस, आप आणि तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय राजकारणात विरोधकांचं स्थान बळकावण्याच्या शर्यतीत आमने-सामने आहेत. दार्जिलिंगमध्ये धनखर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना पाठिंबा दिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. किंबहुना, तृणमूल काँग्रेसचे नेते असे संकेत देत आहेत. धनखड उपराष्ट्रपती झाले तरच आपल्याला राज्यात चांगला कारभार करता येईल, अशी ममतादीदींची मानसिकता आहे.

Exit mobile version