ना.ना.पाटील -कुळ कायद्याचे निर्माते 

संजीव मोरे

 संघर्ष हाच रायगडच्या भूमीचा गुण.त्या गुणाला अनुसरुनच ज्या ज्यावेळी संघर्षाची वेळ आली तेव्हा प्रस्थापितांच्याविरोधात आवाज उठविण्यात आला.मग तो संघर्ष शेतकर्‍यांच्या विरोधात होणार्‍या अन्यायाच्या विरोधात असो वा सरकारच्या विरोधात.प्रत्येकवेळी संघर्ष करुनच येथील जनतेला न्याय मिळत राहिला आहे.पंचाहत्तर वर्षापूर्वी चरीला जो शेतकर्‍यांनी संप केला होता तो सुद्धा तत्कालीन खोतांच्या विरोधात केलेला एक संघर्षच होता.त्या संघर्षाचे प्रणेते होते शेतकर्‍यांचे नेते नाना पाटील.आज पंचाहत्तर वर्षानंतर खोत पद्धत बंद झाली पण राज्यकर्त्यांच्या रुपाने नवे खोत निर्माण होत राहिलेत त्यांच्या विरोधातही सातत्याने आवाज उठविला जात आहे.या मागची खरी प्रेरणा ही आप्पासाहेब हे आहेत.सोमवारी या लढवय्या नेत्याची जयंती.त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

रायगड जिल्हातील  एका महापुरुषाची जयंती. ते म्हणजे खोतांचा कर्दनकाळआप्पासाहेब नारायण नागू पाटील. आप्पासाहेबांचा जन्म 29 ऑगस्ट 1892 रोजी एका शेतकरी कुटुंबात अलिबाग तालुक्यातील धेरंड या एका लहान खेड्यात झाला. कोणतीही राजकिय अथवा सामाजिक कार्यकरण्याची पार्श्‍वभूमी नसताना आप्पासाहेबांनी एक वैचारीक उंची गाठून समाजसुधारणांच्या कार्याला सुरुवात केली. शिक्षकी पेशा स्वीकारल्यामुळे त्या अनुषंगीक खेड्यापाड्यांशी जवळचा संबंध आला. तेथील सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे आकलन होत गेले. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांची दु:खे त्यांनी जवळून पाहिली. त्या दु:खाची कारणे समजून घेतली. शिक्षणाच्या अभावामुळे समाज कशा पद्धतीने रसातळाला जातो हे प्रत्यक्ष पाहिले. या सर्व परिस्थितीचा आप्पासाहेबांवर मोठा परिणाम होऊन या विरोधात उभे राहण्याचे बळ त्यांना मिळाले. एक सक्षम असा सामाजिक विचारवंत त्यांच्या रुपाने रायगड जिल्हाला मिळाला. आप्पासाहेबांनी सामाजिक समतेच्या दिशेने लढा उभारायला सुरुवात केली त्यावेळी या जिल्ह्यात व आसपास एक अमानुष पद्धत अस्तित्वात होती ती म्हणजे ‘खोतीपद्धत’.
19 व्या शतकांमध्ये महाराष्ट्रात कोकण प्रांतात जमीनदार, सावकार, उच्चवर्णीय अशी एक अन्यायकर्ती व्यवस्था अस्तित्वात होती. या व्यवस्थेच्या विरोधात अर्थात खोतीपद्धतीच्या विरोधात रायगडचे सुपुत्र लोकनेते आप्पासाहेब नारायण नागु पाटील यांनी आपल्या शिक्षकी पेशाला लाथ मारुन अलिबाग, वडखळ, पेण, पनवेल, उरण, रोहा, माणगांव, तळा, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपुर, खेड, चिपळुण, रत्नागिरी येथील कुळांना एकत्र करुन त्यांच्या भेटी घेऊन या अमानवी पद्धतीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले. ही गुलामगिरी, अनिष्ट कायदे संपवण्यासाठी आप्पासाहेबंनी एका अनोख्या युद्धाचे रणशिंग फुंकले. अज्ञान, अशिक्षित मजुरांना, कुळांना आप्पासाहेबांनी संघर्ष करण्यासाठी प्रेरित केले. त्यामुळे खोतांच्या विरोधात शेतकरी संघटीत होऊ लागले. शेतकर्‍यांंना, कुळांना फक्त नेतृत्वाची गरज होती. ते नेतृत्व आप्पासाहेबांच्या रुपाने शेतमजुर कुळांना मिळाले आणि दि. 27/10/1933 रोजी शेतकर्‍यांचा पहिला संप अलिबाग तालुक्यातील चरी येथे सुरु झाला. हा संप जवळपास 7 वर्षे चालला आणि बघता- बघता चरीच्या संपाची बातमी संपूर्ण भारतभर गाजली. रायगड जिल्हातील चरी आणि आसपासच्या 30 गावांचा संप दीर्घकाळ टिकला आणि तो सर्वार्थाने यशस्वी झाला. पुढे याच संपाचा परिणाम असा झाला की, 15 ऑगस्ट 1947 नंतर शेतकर्‍यांंच्या ज्वलंत प्रश्‍नाचा विचार सरकारला करणे भाग पडले. लोकनेते आप्पासाहेब व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सरकारला 1948 चा नवा कुळकायदा करावा लागला. या कायद्यामुळे कुळांची नावे 7/12 च्या उतार्‍यात नोंदली गेली व कुळांना जमिनी कसण्याचा कायदेशीर हक्क मिळाला. मुंबई खोती कायद्याची अंमलबजावणी 1 मे 1949 रोजी झाली व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन हा कायदा 1957 मध्ये संमत झाला. याचा फायदा केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील सर्व शेतमजुरांना, कुळांना झाला. या कायद्याचे जनक आप्पासाहेब आहेत, म्हणून ते रायगडचे महापुरुषच आहेत. तसेच संपूर्ण भारतातील शेतकर्‍यांंचे प्रेरणाशक्ती आहेत. ही क्रांती चरीच्या एकमेव संपानेच झाली. त्यामुळे आप्पासाहेब ना. ना. पाटील या रायगड जिल्हातील सामान्य माणसांचे नेते होते. सामान्यांच्या हाती त्यांच्याच मुक्तीचे हत्यार देणारे मुक्तीदाते होते, हेच सर्वांनी समजून घेतले पाहिजे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्याचेे श्रेेय जाते. आप्पासाहेबांनी खोतीपद्धतीच्या विरोधात असंघटीत शेतमजुरांना एका विचारावर संघटीत केले व संघर्षासाठी तयार केले, तर डॉ. आंबेडकरांनी कायद्यांची बाजू समर्थपणे मांडून न्यायालयीन लढाई लढले व यशस्वी झाले. हा इतिहास समाजाने, शेतकर्‍यांंनी समजून घेतला पाहिजे. तरच या महामानवाचे कष्ट समाजाला कळतील. त्यांनी त्या काळी उभ्या केलेल्या संघर्षाची जाणीव होईल.
आप्पासाहेबांनी समाजात खोलवर रुजलेली शेकडो वर्षार्ंची सामाजिक गुलामगिरी व जाती व्यवस्था निर्मूलनासाठी स्वत:ला समाजाच्या प्रती वाहून घेतले. त्याग आणि समर्पण हा समाजसुधारणेचा मंत्र आहे, याची पूर्णपणे जाणीव असल्याने दलित, बहुजनांच्या उद्धारासाठी त्यांनी दिवसरात्र एक केले. म. जोतीबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या महान विचारांचा त्याच्यावर मोठा पगडा होता. सत्यशोधक समाजाचे आंदोलन त्यांना माहित होते. जोतीबा फुले यांनी लिहिलेले ग्रंथ गुलामगिरी, शेतकर्‍यांंचा आसूड, ब्राम्हणांचे कसब हे ग्रंथ त्यांनी अभ्यासलेले होते त्यामध्ये नमूद केल्यानुसार दलित – बहुजन इतर आठरापगड जाती वर्णवर्चस्ववाद्यांच्या अन्यायाला कसे बळी पडतात याची जाणीव त्यांना प्रकर्षाने झालेली होती. आप्पासाहेब सामाजिक सुधारणांवर काम करत असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक कार्य केल्याचे दिसून येते. डॉ. आंबेडकरांनी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून मंदिर सत्याग्रह केले तसेच सत्याग्रह आप्पासाहेबांनी केल्याचे दिसून येते. अलिबाग तालुक्यातील चौल येथील प्रसिद्ध शंकराचे मंदिर अत्यंत जागृत असे देवस्थान मानले जात असे. परंतु त्या मंदिरात उच्चवर्णीयांनाच प्रवेश होता, इतरांना प्रवेश दिला जात नव्हता. या विषमतेच्या विरोधात आप्पासाहेबांनी सत्याग्रह केला. वर्णवर्चस्ववाद्यांच्या विरोधात  जनआंदोलन केले. हे करत असताना सवर्ण मंडळीकडून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या जीवीताला देखील धोका निर्माण झाला. परंतु त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी समाजविघातक विकृतींचा पराजय झाला आणि दलित, बहुजन, बारा बलुतेदार यांना मंदिरप्रवेश मिळाला. त्या कालखंडात असा संघर्ष करणे, त्यात यशस्वी होणे ही बाब साधी निश्‍चित नव्हती. त्यांनी केलेले हे काम निश्‍चितपणे ऐतिहासिक होते. ती एक समाज क्रांतीच होती. सामाजिक समतेची ती पहाट होती.
समता बंधुता आणि न्यायावर आधारीत समाज आणि राष्ट्राची निर्मिती हा त्यांचा मूळ उद्देश होता. त्याच उद्देशानुसार त्यांनी भयंकर अस्पृश्यता असताना देखील व स्वत:ला मूल असतानाही अस्पृश्यता निर्मूलनासाठी अस्पृश समाजातील भालचंद्र गायकवाड या मुलास दत्तक घेऊन समाजप्रबोधनाला चालना देणाचे काम त्यांनी केले. ही बाब पहाता आप्पासाहेब सामाजिक सुधारणांच्या बाबतीत किती कटिबद्ध होते याची प्रकर्षाने जाणीव होते. व हे देखील लक्षात येते की, त्यांनी आपले संपूर्ण जीवन  विषमतेचे मूळ शोधण्यातच खर्ची घातले. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव होती त्यापैकी एक आप्पासाहेब होते. समाजात रुतून बसलेल्या अनिष्ठ अशा चालीरीती, प्रथा यांच्यावर हल्ला चढवण्यासाठी ज्यांनी आपले तन, मन, धन, बहाल केले, अपमानाची पर्वा न करता एकसारखा संघर्ष करत राहिले. अशा महामानवांच्या संघर्षाचा विचार करायला आज कोणाकडेही वेळ नाही ही बाब समाजहिताच्या दृष्टीने घातक आहे. आपल्या महामानवांनी जे विचार दिलेत त्यांच्या ऋणात आपण राहिले पाहिजे व त्यांच्या जयंत्या किंवा पुण्यतिथ्या या त्यांच्या विचारांवर पुनर्विचार दिवस म्हणून साजर्‍या झाल्या पाहिजेत. कारण आपण कितीही आधुनिक झालो तरी ते विचार समाज एकात्मतेसाठी मोलाचे आहेत. त्यांना पर्याय नाही. शेवटी आप्पासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला अभिवादन!

Exit mobile version