युगदृष्टा अभियंता

अमित कोल्हे

वीट, लोखंड आणि सिमेंटचा वापर करून इमारत बांधणार्‍याला अभियंता म्हटलं जातं. तांत्रिक कौशल्यं तसंच सामाजिक भान असल्यास तो उत्कृष्ट अभियंता होतो. गुलामगिरीच्या युगात आपल्या कर्तृत्वाने भारताच्या विकासात योगदान देणारे सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या हे असेच एक युगदृष्टी असलेले अभियंता होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं घेतलेला त्यांच्या जीवनाचा वेध.

शालेय जीवनात असताना सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांच्याबद्दल एक धडा होता. त्यामुळे त्यांचा थोडासा परिचय झाला होता. पुढे अभियंत्याचं प्रशिक्षण घेताना त्यांना अधिक जवळून अभ्यासता आलं. काम पाहून त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवत गेलो. त्यानंतर दर वर्षी आमच्या शिक्षण संस्थेत विश्‍वेश्‍वरय्या यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी नामवंतांची व्याख्यानं घ्यायला लागलो. त्यांचं इंजिनिअरींगमधलं ज्ञान आणि त्यातली सूक्ष्मता एका उदाहरणावरून लक्षात यायला हरकत नाही. अर्थातच ही घटना स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे. एकदा सर मोक्षगुंडम ट्रेनमधून प्रवास करत होते. अतिशय साध्या वेषातल्या विश्‍वेश्‍वरय्या यांच्याकडे डब्यातले लोक कुचेष्टेने पाहत होते. अचानक उठून त्यांनी साखळी ओढली. त्यामुळे ट्रेन थांबली. प्रवासी त्यांना उलट सुलट बोलायला लागले. थोड्या वेळानं गार्डही आला. त्याला उत्तर देताना पुढील काही अंतरावर रेल्वे रुळ उखडला असल्याने आपण साखळी ओढल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकून सर्व उपस्थितांना आश्‍चर्य वाटलं. ट्रेनमध्ये बसलेल्या या व्यक्तीला पुढे रुळ तुटले असल्याचं कसं कळलं, हे त्यांना उमगेना. सर मोक्षगुंडम यांनी सांगितलं की, ट्रेनचा वेग बदलल्यामुळे ट्रॅक तुटल्याचा अंदाज आला होता. अखेर तपासात ही बाब खरी असल्याचं निष्पन्न झालं. एका ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे सांधे प्रत्यक्षात उखडलेले होते. हे पाहून लोकांनी त्यांची चौकशी सुरु केली. तेव्हा त्यांनी आपला परिचय दिला.
पुण्याजवळील खडकवासला धरणाची उंची न वाढवता त्यांनी पाणी साठवण क्षमता वाढवली. विश्‍वेश्‍वरय्या यांना त्यामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली. धरणांचा पाणीसाठा वाढवण्यासाठी विश्‍वेश्‍वरय्या यांनी सर्वप्रथम खडकवासला धरणावरील स्वयंचलित जलद्वारांचा वापर करून पुण्यातून वाहणार्‍या मुठा कालव्याचा पूर आटोक्यात आणला. त्यांनी या ‘वॉटर गेट्स’चं स्वतःच्या नावावर पेटंट घेतलं होतं. 1883 मध्ये अभियांत्रिकी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या यांचा सिव्हिल इंजिनीअरिंग हा आवडता विषय होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, विजापूर, अहमदाबाद आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये पाणीपुरवठा प्रकल्पांवर भरपूर काम केलं होतं. विश्‍वेश्‍वरय्या हे कार्यक्षम प्रशासकही होते. 1909 मध्ये त्यांची म्हैसूर राज्याचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती झाली. यासोबतच ते रेल्वे सचिवही होते. कृष्णराजा सागर धरणाच्या बांधकामामुळे विश्‍वेश्‍वरय्या यांचं नाव संपूर्ण जगात चर्चिलं गेलं. स्वातंत्र्याअगोदर सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ते बांधलं गेले. आज कृष्णराजा सागर धरणातला 45 किलोमीटर लांबीचा विश्‍वेश्‍वरय्या कालवा आणि या धरणातले इतर कालवे मंड्या, मालवली, नागमंडला, कुनिगल आणि चंद्रपट्टणा तहसीलव्यतिरिक्त कर्नाटकमधल्या रामनगरम आणि कनकापुरा इथल्या सुमारे सव्वा लाख एकर जमिनीचं सिंचन करतात.
म्हैसूर आणि बंगळुरुसारख्या शहरांना वीजनिर्मिती तसंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारं कृष्णराजा सागर धरण विश्‍वेश्‍वरय्या यांच्या तांत्रिक कौशल्याची आणि प्रशासकीय नियोजनाची यशोगाथा सांगतं. महाकाय धरणांसारख्या संरचनेची तत्त्वं तोपर्यंत फारशी समजली नव्हती. म्हणून कृष्णराजा सागर धरणाच्या बांधकामाबाबत कावेरी नदीचं पाणी हायड्रॉलिक अभियांत्रिकीच्या तत्कालीन बाबी लक्षात घेऊन कसं अडवायचं ही त्यांची सर्वात मोठी चिंता होती. सिमेंटशिवाय धरण बांधणं हे विश्‍वेश्‍वरय्या यांच्यासमोरचं मोठं आव्हान होतं. कारण देशातली सिमेंटनिर्मिती तेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर होती आणि खूप जास्त किंमत देऊन आयात करावी लागत होती. या समस्येवरही त्यांनी उपाय शोधला. जलाशयातलं पाणी नियंत्रित करण्यासाठी त्यांनी विशेष तंत्र वापरलं. धरणाच्या भिंतीच्या दुसर्‍या बाजूला त्यांनी विशेष गोलाकार संरचनांच्या विहिरी बांधल्या. त्यांना स्वयंचलित दरवाजे जोडले होते. हे दरवाजे धरणाच्या भिंतीच्या आत बसवण्यात आले होते. धरणाच्या 171 दरवाजांमध्ये 48 स्वयंचलित दरवाजे विश्‍वेश्‍वरय्या यांनी विकसित केले आहेत. सर्व 48 स्वयंचलित दरवाजे कास्ट आयर्नचे बनले होते. ते भद्रावती इथल्या ‘म्हैसूर आयर्न अँड स्टील प्लांट’मध्ये तयार करण्यात आले होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे प्रत्येक दरवाजावर दहा टनांचा भार असतानाही ते आपोआप उघडायचे आणि बंद व्हायचे.
जलाशयातलं पाणी कमाल पातळीवर असताना पाणी विहिरीत पडायचं. त्यामुळे विहिरीतलं तरंगणं वाढायचं आणि शिल्लक भार खाली पडायचा. यामुळे सर्व दरवाजे वर जायचे. धरणातून अतिरिक्त पाणी वाहून जायचं. जलाशयाची पातळी कमी असताना विहिरी रिकाम्या होत्या. त्यामुळे शिल्लक भार वाढायचा आणि दरवाजे पुन्हा बंद व्हायचे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबायचा. अशा प्रकारचं तंत्रज्ञान संपूर्ण जगात प्रथमच वापरलं गेलं. नंतर त्यांचं तंत्र युरोपसह जगातल्या इतर देशांनी स्वीकारलं. धरण बांधणीबरोबरच औद्योगिक विकासातही विश्‍वेश्‍वरय्या यांचं योगदान कमी नाही. कावेरीवर धरण बांधण्याबरोबरच त्या भागात गिरण्या, कारखाने उभारले जात होते. वीज आल्याने नवीन यंत्रं वेगाने काम करू लागली. सर मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या हे औद्योगिक विकासाचे समर्थक होते. बंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये मेटलर्जी, एरोनॉटिक्स, इंडस्ट्रियल कम्बशन आणि इंजिनिअरिंग असे अनेक नवे विभाग सुरू करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. म्हैसूर राज्यातली निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, रोगराई इत्यादी मूलभूत समस्यांबाबतही ते चिंतित होते. कारखान्यांचा अभाव, सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणं आणि शेतीच्या पारंपरिक साधनांचा वापर यामुळे विकास होत नव्हता. या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे म्हैसूरमध्ये प्राथमिक शिक्षण अनिवार्य करण्यात आलं आणि मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यामुळे सर विश्‍वेश्‍वरय्या यांना कर्नाटकचा भगीरथ असं संबोधलं जातं. 1955 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी देण्यात आली नाही. किंग जॉर्ज पंचम यांनी सार्वजनिक जीवनातल्या योगदानाबद्दल ‘ब्रिटिश इंडियन एम्पायर’च्या ‘नाइट कमांडर’ या सन्मानाने त्यांचा गौरव केला. त्यांनी उभारलेल्या कृष्णराजा सागर हा धरणाच्या बांधकामाचं विशेष कौतुक केलं जातं.
हैदराबाद शहराला पुरापासून वाचवण्यासाठी त्यांनी एक यंत्रणाही दिली होती. विश्‍वेश्‍वरय्या यांचे वडील संस्कृतचे पंडित होते. वडिलांचं निधन झालं तेव्हा ते बारा वर्षांचे होते. चिकबल्लापूर इथे प्रारंभिक शिक्षण घेतल्यानंतर ते बंगळूरला आले. तिथून त्यांनी 1881 मध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पुण्याला आले आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतलं. त्यांनी मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागात काम केलं. त्यानंतर ते भारतीय सिंचन आयोगाकडे गेले. दक्षिण भारतातलं म्हैसूर शहर विकसित करण्यात आणि तो प्रदेश समृद्ध बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कृष्णराजा सागर धरण, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल ऑइल अँड सोप फॅक्टरी, युनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूर, बँक ऑफ म्हैसूर यासह अनेक संस्था त्यांच्या प्रयत्नांमधून उभ्या राहिल्या. 32 वर्षांचे असताना त्यांनी सिंधू नदीचं पाणी सागर शहराला पाठवण्याची योजना तयार केली. ती सर्व अभियंत्यांना आवडली. सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्याअंतर्गत त्यांनी नवी ब्लॉक प्रणाली तयार केली. पोलादी दरवाजे बनवले. ब्रिटिश अधिकार्‍यांनीही त्यांच्या यंत्रणेचं कौतुक केलं.
मुसी आणि इसी नावाच्या दोन नद्यांचं पाणी अडवण्याची योजनाही त्यांनी केली. त्यांनी जपान आणि इटलीतल्या तज्ज्ञांच्या मदतीने रेशीम, चंदन, धातू, पोलाद इत्यादी पूर्वीपासून अस्तित्वात असलेले उद्योग पुढे विकसित केले. त्यांनी ‘बँक ऑफ म्हैसूर’ उघडली आणि त्यातून मिळणारा पैसा उद्योग वाढवण्यासाठी वापरला. हैदराबाद शहरासाठी पूर संरक्षण प्रणालीचे ते मुख्य डिझायनर होते. त्या वेळी राज्याची अवस्था अत्यंत बिकट होती. विश्‍वेश्‍वरय्या यांना निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, रोगराई इत्यादी मूलभूत समस्यांबद्दलही काळजी होती. कारखाने नसणं, सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणं आणि शेतीच्या पारंपरिक साधनांचा वापर यामुळे शेतकर्‍यांच्या समस्या कायम होत्या.
या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, त्यांनी आर्थिक परिषदेच्या स्थापनेची सूचना केली. 1912 मध्ये म्हैसूरच्या महाराजांनी त्यांची दिवाण किंवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली. ते 1918 मध्ये दिवाण पदावरून निवृत्त झाले. त्यांचा जन्मदिवस भारतात ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

Exit mobile version