अनिकेत जोशी
शिवसेना आणि वंचित आघाडीदरम्यान युतीची चर्चा असली तरी महाविकास आघाडीत राहून शिवसेनेला मिळणार्या जागांपैकी किती जागा प्रकाश आंबेडकर पदरात पाडून घेऊ शकतात, हा खरा प्रश्न आहे. या स्थितीमधून पुढचा प्रवास अत्यंत सामंजस्याने करुन महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी कितपत ‘फिट’ बसू शकते, याचा संपूर्ण ताळेबंद मांडल्यानंतरच पुढचा हिशेब करता येईल, अशी आजची परिस्थिती आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार का आणि आल्याच तर महाराष्ट्राच्या राजकरणात त्याचे कसे पडसाद उमटतील, यासंबंधीची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. वारे कोणत्या दिशेने वाहताहेत याचे आडाखे उच्चपदस्थ नेत्यांच्या भेटी-गाठींमधून बांधले जात आहेत. प्रत्यक्षात काय घडेल हे येत्या काळात बघायला मिळेलच, मात्र तत्पुर्वी या विषयाची पार्श्वभूमी जाणून घेणेही गरजेचे आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा फंडा 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी रामदास आठवले यांनी सर्वप्रथम राबवला. आठवले एकदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जमत नव्हते. दिल्लीतून जणू त्यांना बाहेर काढले गेले होते. त्यामुळे ते संतापले होते आणि पर्यायाच्या शोधात होते. अशा स्थितीत बाळासाहेबांनी त्यांना बोलावून चर्चा केली. प्रबोधनकार आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री होती, विद्यापीठांच्या नामांकनासंदर्भात आपल्याविषयी निष्कारण गैरसमज पसरवले गेले असून आपली आंबेडकरांवर भक्ती आहे, असे त्या भेटीत बाळासाहेब म्हणाले होते. इतकं बोलल्यानंतर त्यांनी रामदास आठलेंना आपल्याबरोबर येण्याचे आवाहन केले. त्यानंतर रामदास आठवले यांनी राज्यभरात दौरे केले आणि दलित विचारांचे व दलित वर्गातले पत्रकार, लेखक, विचारवंत या सगळ्यांशी संपर्क साधला. त्यातील बहुतेकांनी सांगितलं की, राजकीय शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला कोणाबरोबर जाण्याची गरज आहे. अनेकांकडून हा अभिप्राय ऐकल्यानंतर गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांची एकत्र पत्रकार परिषद झाली. ही आघाडी घडवण्यामध्ये मुंडेंचा मोठा वाटा होता.
आज आठवते आहे की भारतीय जनता पक्षाने प्रकाश जावडेकर यांना मागे ठेवून रामदास आठवले यांना राज्यसभेवर पाठवले. ही घटना 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीची. यामुळे मोठा वर्ग आपल्याकडे वळवण्यात हिंदुत्ववादी पक्षांना यश मिळाले. अर्थातच याचा मोठा फायदाही झाला. नंतर रामदास आठवले यांना मंत्रीपदही दिले गेले. म्हणजेच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा हा प्रयोग आत्ताचा नसून आधीपासून सुरू आहे, हे समजून घ्यायला हवं. शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणून आम्ही एकत्रच आहोत, असे आता रामदास आठवले यांचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्याबरोबर आपली आघाडी असून सर्व दलित समाज आपल्याबरोबर असल्याचा त्यांचा दावा आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वंचित शक्ती आहे, हे ही ते सांगतात. रिपब्लिकन पक्षाची अनेक वेळा शकलं झाली हे आपण जाणतो. त्यात शरद पवार, निळूभाऊ खाडीलकर यांच्यासारख्या नेत्यांनी अनेकदा मध्यस्थी केली. एका निवडणुकीपुरते ते सगळे खरोखर एकत्र आले होते. त्यावेळी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा. सू. गवई आणि जोगेंद्र कवाडे हे चौघेही राखीव नसलेल्या मतदारसंघातून प्रथमच लोकसभेवर निवडून गेले होते. आत्तापर्यंत असे एकदाच घडले. पण त्या निवडणुकीनंतर राज्यात कोणी आणि कसे सत्तेत सहभागी व्हायचे या मुद्द्यावरुन त्यांच्यात फाटाफूट झाली. आपण भाजपाबरोबरच जावे असे तेव्हा आंबेडकरांचे म्हणणे होते तर रामदास आठवले आणि गवई काँग्रेसच्या बरोबर जाण्यास उत्सुक होते. या मतमतांतराचा परिणाम म्हणून पुढील काळात रिपब्लिकन विचारांच्या गटांची शकले होत राहिली.
पुढील काळात रामदास आठवले यांच्याकडे रिपब्लिकन हे नाव राहिलं आणि अन्य नेत्यांनी वेगवेगळी नावे घेतली. रिपब्लिकन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनंतर स्थापन झाला. ते असताना तो उभा राहू शकला नव्हता. त्यानंतर त्यांच्या पठिराख्यांनी तो स्थापन केला. त्यात गवई होते. पण कालांतराने त्यांच्यामागेही कोणी उरले नाही, बहुतेक सगळे रामदास आठवलेंकडे गेले. रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये गंमत अशी की, दोघेही वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रात ताकद राखून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यामध्ये रामदास आठवलेंचे समर्धक जास्त आहेत तर विदर्भातले समर्थक आंबेडकरांना मानणारे आहेत. पूर्वी एकदा रामदासजींनी आंबेडकरांना एकत्रित पक्षाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले होते. अध्यक्षपद स्विकारुन तुम्ही पक्षाला दिशा द्या, मी मागे थांबतो असे म्हणत आपण एकत्र एक ताकद निर्माण करू आणि अधिक जागा पदरात पाडून घेऊ, असे त्यांचे म्हणणे होते. पण अद्यापही हे होऊ शकले नाही. प्रकाश आंबेडकर यांनीही महाराष्ट्रातली राजकीय समिकरणे आजमावत वेगवेगळे प्रयोग केले. मागील एका निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि डावे पक्ष यांनी डावी लोकशाही आघाडी काढली होती. त्यावेळी ते पूर्ण ताकदीने निवडणूक लढले होते, पण त्यात कोणालाही यश मिळाले नव्हते. आजपर्यंत आंबेडकरांचे तीन ते चार आमदार निवडून आले आहेत. आत्ताच्या सभागृहात त्यांचा एकही आमदार नसला तरी आधी काही आमदार होते. त्यातले काही काँग्रेसकडे गेल्याने बरीच फाटाफूट झाली.
एकदा निवडून आलेला आमदार टिकत नाही, असे रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर या दोघांबाबतही पहायला मिळाले. विधानसभेत रामदास आठवलेंपेक्षा प्रकाश आंबेडकरांची शक्ती अधिक असल्याचे दिसले होते. पण त्याला बर्याच मर्यादा असल्याचे कालौघात स्पष्ट झाले. आंबेडकरांनी त्यातल्या त्यात अकोला जिल्हा परिषद राखण्यात यश मिळवले. त्यातल्या काही भागात आजही त्यांचे वर्चस्व आहे. पण ते लोकसभा निवडणुकीमध्ये तिथून निवडून येऊ शकले नाहीत. थोडक्यात, हे दोघे एकत्र आले तर नक्कीच चमत्कार घडू शकतो, पण प्रखर आत्माभिमान असल्याने ते एकत्र येत नाहीत, हा इतिहास आहे. आता तर प्रकाश आंबेडकर रामदास आठवले यांच्याशी बोलण्यासदेखील तयार नसतात. राजकीय तडजोड करुन सतत सत्तेत कसे रहायचे, हेच ते बघत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.
दुसर्या बाजुने पाहता हे रामदासजींचे कौशल्य आहे, असेही म्हणता येईल. कारण हा सातत्याने सत्तेत राहिलेला माणूस आहे. आपण ज्यांच्याबरोबर जातो ते लोक सत्तेत येतात, असा त्यांचा दावा असून असे तीन ते चार वेळा घडलेदेखील आहे. राष्ट्रवादीबरोबर युती केली तेव्हा ते जिंकले, भाजप-शिवसेना सत्तेत असतानाही तेच घडले. असे गणित असल्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर यांच्या आघाडीत किती ताकद आहे, हे येणारा काळच दाखवेल. दलित नेत्यांना शिवसेनेची मते मिळत नाहीत, पण शिवसेना आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांना मात्र रिपब्लिकन जनतेची मते मिळतात. प्रकाश आंबेडकरांनी सांगितल्यावर त्यांचीही मते दुसरीकडे येऊ शकतात.
प्रकाश आंबेडकर ‘हार्ड बार्गेनर’ आहेत. या माणसाला राजकारण बरोबर कळते. या ताकदीचा अंदाज वा आवाका इतरांनाही माहीत असल्यामुळे त्यांना जास्त जागा सोडण्यास कोणी तयार होत नाही आणि जास्त जागा मिळत नसल्यामुळे आघाडीची चर्चा फिसकटते, हे आत्तापर्यंत दिसून आले आहे. या सगळ्यात शिवसेनेबरोबर आघाडी केल्यास आंबेडकरांना किती जागा सोडता येतील, हा प्रश्न आहे. त्यातही ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की नाहीत, हादेखील विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. यात अनेक किंतू-परंतू आहेत. मुळात महाविकास आघाडीत राहिल्यास उध्दव ठाकरे यांना विधानसभेच्या निम्म्या जागाही लढायला मिळणार नाहीत.त्यामुळेच ते आपल्याला मिळणार्या जागांपैकी किती जागा प्रकाश आंबेडकर यांना देऊ शकतील हा प्रश्न आहे. येत्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागा ठेवायच्या, असं गणित आहे. भाजप वा अन्य पक्षाने जिंकलेल्या जागा ते एकमेकांमध्ये वाटून घेणार आहेत. त्यात आंबेडकरांच्या वाट्याला किती जागा येतील हे बघावं लागेल.
मुंबई महानगरपालिकेत ते प्रकाश आंबेडकरांना जागा देऊ शकणार नाहीत, कारण मुंबईत त्यांची दखलपात्र ताकद नाही, पण त्यांनी मुंबईमध्ये जागांची मागणी केल्यास शिवसेनेचे मोठे नुकसान होईल. थोडक्यात, कशात काय अन फाटक्यात पाय… अशी सध्याची स्थिती आहे. या स्थितीमधून पुढचा प्रवास अत्यंत सामंजस्याने करुन महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडी कितपत ‘फिट’ बसू शकते, याचा संपूर्ण ताळेबंद मांडल्यानंतरच पुढचा हिशेब करता येईल, अशी आजची परिस्थिती आहे.