प्रा. नंदकुमार गोरे
जगात भासणार्या सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा प्रतिकूल परिणाम मोबाईल, वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारावर झाला. जगाला आज सेमीकंडक्टरसाठी तैवान आणि चीनवर अवलंबून रहावं लागतं. चीन-तैवान संघर्षानंतर तर सेमीकंडक्टर बनवणार्या कंपन्यांनी आपल्या देशात गुंतवणूक करावी, यावरून भारतातच नाही तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्येही स्पर्धा लागली आहे. त्याचा हा आढावा.
चीन आणि तैवान जगाला सेमीकंडक्टर (अर्धवाहक)चा पुरवठा करतात. कोरोनासंसर्ग काळाच्या आधीपासून जगभरात सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे. त्याचा फटका इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योगाला बसला आहे. युद्ध आणि आर्थिक मंदीमुळेही पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यावर आता जगातील अनेक देशांनी मार्ग काढायला सुरुवात केली आहे. तैवान आणि चीनची सेमीकंडक्टर उत्पादनातील मक्तेदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न जगभर सुरू झाला आहे. भारतात तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने वेदांता उद्योगसमूहाशी सेमीकंडक्टर उत्पादनाचा सामंजस्य करार केला. हा उद्योग गुजरातमध्ये सुरू होत आहे. तसंच जगातील अनेक कंपन्या आता तैवानच्या कंपन्यांशी सेमीकंडक्टर उत्पादनाबाबत करार करु पहात आहेत. चीन-अमेरिका व्यापारी युद्धानंतर अमेरिकने चीनी कंपन्यांच्या उत्पादनांवर अनेक बंधनं आणली. सेमीकंडक्टरच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनीही सेमीकंडक्टर उत्पादनाला पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने जगातल्या सर्वात मोठ्या टेक कंपन्यांना देशात कारखाने सुरू करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचं प्रोत्साहन देऊ केले आहे. युरोपला आता आपल्याकडील उद्योग अमेरिकेत जातात, की काय अशी भीती वाटायला लागली आहे. जर्मनीमध्ये ‘इनफिनॉन’ ही कंपनी तर अमेरिकन चिप निर्माता इंटेल मॅग्डेबर्गमध्ये नवीन कारखाना सुरू करण्याच्या विचारात आहे. यासोबतच तैवानची कंपनी ‘टीएसएमसी’ जर्मनीमध्ये नवीन प्लांट उभारण्याच्या विचारात असल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वीच ‘टीएसएमसी’ आणि सॅमसंग यांना अमेरिकेत सेमीकंडक्टर अर्थात चीपनिर्मितीचे कारखाने सुरू करण्यासाठी आकर्षित केलं आहे. या दोन्ही कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्च करून अमेरिकेत नवीन चिप प्लांट उभारत आहेत.
‘इंटेल कॉर्पोरेशन’ अमेरिकेकडे आकर्षित होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे सबसिडी. बायडेन प्रशासनाच्या महागाई कमी करण्याच्या कायद्यांतर्गत 370 अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय चिप आणि विज्ञान कायद्यांतर्गत 280 अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आहे. अमेरिकेला सेमीकंडक्टर क्षेत्रात मजबूत करणे, संशोधन आणि विकासाला चालना देणे आणि स्थानिक उच्च-तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणे हा त्याचा उद्देश आहे. अशा परिस्थितीत युरोपमधल्या तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकन अनुदानाच्या लालसेपासून फार काळ दूर राहू शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. या अब्जावधी युरोच्या मदतीने 2030 पर्यंत चिप उत्पादन दुप्पट करून जागतिक स्तरावर त्याचा वाटा 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आशा युरोपला आहे. घोषणा करण्यात युरोप जगज्जेता आहे; परंतु त्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात मागे आहे, असे ऑस्ट्रियन तंत्रज्ञान समूह ‘एटी अँड एस’चे प्रमुख आंद्रियास ग्यास्टेन्माया यांनी नमूद केले आहे. जर्मनी चीनला चिप कंपन्यांची विक्री करणार नाही. युरोपला चिप बनवण्याचा जुना अनुभव आहे. अनेक मोठ्या कंपन्या युरोपीय संघ सोडून अमेरिकेत जातील, अशी भीती युरोपमध्ये आधीच आहे.
युरोप जागतिक स्तरावर केवळ दहा टक्के चिप्सचं उत्पादन करतो, अशी टीका केली जाते; परंतु युरोप खंडात चिप उत्पादनाची अधिक चांगली समज आणि अधिक प्रशिक्षित कार्यबल आहे, हे लक्षात घेतलं जात नाही. युरोप किंवा अमेरिकेत कुठेही चिप कारखाना सुरू करता येणं शक्य आहे; परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा आणि कुशल कामगारांचा पुरवठा होतो की नाही, हे पाहणे अतिशय महत्वाचे आहे. युरोप बर्याच काळापासून सेमीकंडक्टर्स तयार करत आहे; परंतु त्याला अजूनही तैवान किंवा चीनचे स्थान घेता आलेले नाही.
या संदर्भातल्या तांत्रिक ज्ञानासाठी आणि मार्गदर्शनासाठी बेल्जियममधील ल्युवेन इथल्या ‘इंटर युनिव्हर्सिटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक सेंटर’मध्ये अनेक देशांमधील कंपन्या मदत घेतात. इथे तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या मिळून संशोधन करतात. त्याचप्रमाणे, म्युनिकच्या आसपास, ड्रेस्डेनजवळच्या तथाकथित सिलिकॉन सॅक्सनीमध्ये आणि फ्रान्सचे विद्यापीठ शहर म्हणून ओळखल्या जाणार्या ग्रेनोबलमध्येही सेमीकंडक्टर संशोधन आणि उत्पादन होते. इथल्या शेकडो कंपन्या सेमीकंडक्टर व्यवसायात गुंतलेल्या आहेत. युरोपमध्ये केवळ ‘ईयू चिप्स’ कायदाच नाही तर युरोपीयन रिकव्हरी फंडदेखील आहे. त्याने ‘यूएस इन्फ्लेशन रिडक्शन’ कायद्याप्रमाणेच उद्दिष्टं निश्चित केली आहेत. या अंतर्गत, युरोपीय संघाने 2030 पर्यंत वित्तपुरवठा करण्यासाठी 19 ट्रिलियन युरोची व्यवस्था केली आहे. युरोपीय संघाने चिप बनवण्यासाठी अब्जावधी युरो खर्च करण्याची तरतूद केली आहे.
युरोपीयन संघातील अधिकारी आणि तज्ज्ञांनी उच्च-गुणवत्तेच्या चिप्स आणि सुपरकॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात स्वतःची स्थापना करण्यासाठी प्रचार सुरु केला आहे. असं असलं तरी पुरवठा साखळी सुरक्षित करण्यापेक्षा डिजिटल सार्वभौमत्व प्राप्त करणे आजघडीला अधिक महत्त्वाचे आहे. जगातील चार सर्वात शक्तिशाली सुपरकॉम्प्युटरपैकी दोन आधीच युरोपमध्ये आहेत. एक इटलीतील बोलोग्ना इथे आहे तर दुसरे फिनलंडमध्ये आहे. एक हजारपेक्षा जास्त पेटाफ्लॉप असलेल्या या सुपरकॉम्प्युटरला ज्युपिटर असे नाव देण्यात आले आहे. या एका संगणकाची कार्यक्षमता 50 लाख नोटबुक एवढी असेल. म्युनिक आणि स्टुटगार्टमध्ये इतर एक्सास्केल सुपरकॉम्प्युटर उभारले जातील. छोट्या चिपच्या कमतरतेमुळे अलिकडच्या काळात जग हादरले होते.
त्यासाठी केवळ रोख अनुदान पुरेसे नाही तर चिप बनवण्यासाठी कच्चा माल आणि संशोधनही आवश्यक आहे. तसंच अनेक कंपन्यांचे नेटवर्क कामी आणून हा संपूर्ण उद्योग चालवला जातो. मोठ्या टेक कंपन्यांमधल्या उच्च प्रशिक्षित कामगारांना युरोप, चीन आणि अमेरिकेत समान वेतन मिळते. या लोकांना टिकवून ठेवण्यासाठी अधिक चांगले कार्यालयीन वातावरण प्रदान करणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचार्यांसाठी युरोपमध्ये इतर पर्याय असणे खूप अर्थपूर्ण आहे. कामाशी संबंधित बाबींमध्येही संशोधन महत्त्वाचे असते. या क्षेत्रात युरोप अजूनही आघाडीवर आहे.
जर्मनीतील फ्रॉनहोफर आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी इंडस्ट्री 4.0 च्या विकासाची गती निश्चित केली, तर ‘लीबनिझ इन्स्टिट्यूट’ आणि ‘फर्डिनांड ब्राउन इन्स्टिट्यूट’ याही संशोधनाला चालना देणार्या उत्तम संस्था आहेत. सेमीकंडक्टर बनवणार्या कंपन्यांचा विचार केला जातो, तेव्हा जर्मनीचे नाव समोर येते. ड्रेस्डेनच्या आसपास असलेल्या सिलिकॉन सॅक्सनी, मायक्रोचिप क्लस्टरमध्ये, सेमीकंडक्टर व्यवसायात सुमारे दोनशे कंपन्या आहेत. पुरवठादारांसाठी या पायाभूत सुविधांचा अर्थ असा आहे की ते आपल्या गरजा दिवसांऐवजी काही मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतात. सेमीकंडक्टर कारखान्याच्या विलंबामुळे कंपन्यांचे कोट्यवधी युरोचे नुकसान होऊ शकते. युरोपचा सेमीकंडक्टर उद्योग कुशल कामगार, अत्याधुनिक संशोधन आणि सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नेटवर्कने बनलेला आहे. नेदरलँड्समधील ‘एएसएमएल’, ‘सीस’ ही जर्मन लेन्स कंपनी किंवा मशीन टूल आणि लेझर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज ट्रम्फ यासारख्या उत्तम पुरवठादार कंपन्यादेखील युरोपमध्ये आहेत.
युरोप-अमेरिकेत सेमीकंडक्टर चिप बनवणार्या कंपन्या आपल्या खर्चात कपात करीत आहेत. कोरोना महामारीतून सावरलेल्या जगात चिपची मागणी झपाट्याने वाढत होती. प्रमुख चिप निर्माते इंटेल आणि तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ‘टीएसएमसी’ने या वर्षाच्या सुरुवातीला नवीन कारखाने स्थापन करण्याची, अधिक कर्मचारी नियुक्त करण्याची आणि अधिक उत्पादन उपकरणे खरेदी करण्याची योजना जाहीर केली. आता दोन्ही कंपन्यांनी त्या योजना बंद करण्याची घोषणा केली आहे.
सेमीकंडक्टर इंडस्ट्री बॉडी(सेमी)ने एप्रिलमध्ये अंदाज वर्तवला होता की या वर्षी जगभरातल्या चिप कंपन्या 165.5 अब्ज डॉलर भांडवल गुंतवतील. चीन आणि तैवानमधल्या परिस्थितीमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे चीनमधल्या अर्धसंवाहक उद्योगाशी संबंधित जवळजवळ सर्व प्रमुख संस्थांना लक्ष्य करण्यात आले आहे. सेमीकंडक्टर उद्योग सध्या 5 ट्रिलियन डॉलरची उलाढाल करतो.
2030 पर्यंत तो दहा ट्रिलियन डॉलरचा आकडा ओलांडण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत, सेमीकंडक्टरच्या उद्योगाने अवघं जग प्रभावित केलं असून नजिकच्या भविष्यात हाच घटक आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक जीवनात प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.