हिवाळ्यात आरोग्याची काळजी

मंजिरी ढेरे

हिवाळ्यातले सध्याचे दिवस कडाक्याच्या थंडीचे असल्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्यांची शक्यता वाढते. त्यातच गेल्या अडीच-तीन वर्षांचा अभ्यास करता थंडीमध्ये कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सध्या लहान मुलांना गोवर हा संसर्गजन्य रोग त्रासदायक ठरत आहे. ताप, सर्दी, खोकला यासारख्या साध्या त्रासापासूनच याची लक्षणं दिसतात. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करु नये. 

माणसाच्या आरोग्याप्रती सजग होण्याचा हा काळ असून विशेषत: थंडीतले आजार वाढत असल्यामुळे या दिवसांमध्ये काळजी घेण्याची गरज अधोरेखित होते. गेले बरेच महिने आपण कोरोनाच्या दाट भयाखाली काढले. मधला काही काळ बरा गेल्यानंतर आता पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर कोरोनाचं संकट घोंघावू लागलं आहे. त्यातच थंडीमध्ये या जीवघेण्या संसर्गाचा वेग आणि धोका बळावत असल्याचं सत्य संशोधकांनी समोर मांडलं आहे. चीनमध्ये कोरोनाची दाट छाया पसरली असून जगातील अन्य देशही त्याच्या प्रभावाखाली येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारतानेही याची दखल घेतली असून आता आपल्यालाही काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेष म्हणजे थंडीच्या काळात जाणवणार्‍या सर्दी, अंगदुखी, ताप, खोकला याच सामान्य लक्षणाच्या बुरख्याआड हा घातक संसर्ग वाढत असल्यामुळे आता त्याकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. त्यामुळे एकीकडे थंडीचा आनंद लुटत असताना दुसरीकडे वातावरणातील या बदलांचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात याकडे लक्ष ठेवणं आणि कोणताही धोका न पत्करता गरज असल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणं हाच या बदलत्या काळाचा सांगावा आहे, हे आपण समजून घ्यायला हवं.
कोरोनाबरोबरच सध्या गोवरच्या साथीचा फैलावही धडकी भरवणारा ठरतो आहे. एरवी सामान्य आजार भासणार्‍या या रोगाचा प्रचारही अत्यंत वेगाने आणि जीवघेण्या स्वरुपाचा होत असल्यामुळे काळजीत भर पडली आहे. खेरीज एक-दोन वस्त्यांपुरती सीमित असणारी याची कक्षा आता विस्तारत असल्यामुळे काळजी करण्याजोगी परिस्थिती उद्भवली आहे. या सगळ्यात ताप, सर्दी, खोकला आणि अंगावर उठणारे पुरळ यासारख्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं ठरत आहे. त्यामुळे वर्षअखेरच्या वातावरणातील उल्हास अनुभवताना, भटकंतीचे बेत प्रत्यक्षात साकारताना दुसरीकडे साध्या आजारांकडे आणि अस्वास्थ्याकडे गांभीर्याने पाहत दक्ष राहण्याचं सूचित करणारा हा काळ आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. ऋतुबदलाच्या दरम्यान शरीर पहिल्यांदा व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया सर्दीच्या स्वरूपात असते. त्याच्या जोडीला खोकला सुरू होतो आणि जिवाणू किंवा विषाणूंच्या गंभीर संसर्गामुळे आणखी गंभीर समस्या निर्माण होतात.
इन्फ्ल्यूएंझा किंवा शीतज्वर हा अशाच प्रकारचा ताप आहे. मात्र या तापाविषयी आणि एकूणच सर्दीच्या त्रासाविषयी अनेक प्रकारचे गैरसमज पसरल्याचं दिसतं तर आधुनिक संशोधनातून काही समज पूर्ण खरे असल्याचंही स्पष्ट होतं. फ्ल्यूची लस घेतल्यामुळे इन्फ्ल्यूएंझा होतो, असा मोठा गैरसमज पसरल्याचं दिसतं. प्रत्यक्षात मात्र ही काळजी निराधार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. कारण या लसींमध्ये निष्क्रिय बनवण्यात आलेले फ्ल्यूचे विषाणू असतात. त्यांच्यामुळे तापाचा त्रास होत नाही. उलटपक्षी, तापाचा त्रास होऊ नये म्हणून या लसी उपयुक्त असतात आणि तापाला प्रतिरोध करण्याचा तो महत्त्वाचा उपाय असतो. काही वेळा लोक थंड हवेत फिरत नाहीत किंवा सर्दी होण्याजोग्या परिस्थितीशी त्यांचा संपर्क येत नाही. परंतु सर्दी किंवा इन्फ्ल्यूएंझा झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना हा त्रास होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने दर वर्षी इन्फ्ल्यूएंझा प्रतिबंधक लस टोचून घ्यावी, असा सल्ला दिला जातो.
खोकला आणि शिंका यामधून सर्दी होऊ शकते, ही सर्वज्ञात आणि सर्वमान्य गोष्ट आहे. मात्र तरीही दरवाजाचं हँडल किंवा चहाचा नॅपकिन किंवा बसमध्ये चढण्यासाठी धरलं गेलेलं हँडल यांच्या स्पर्शातून याहूनही अधिक मोठ्या प्रमाणात हा संसर्ग होत असतो, हे सत्य समोर आलं आहे. याविषयी बहुतेकांना कल्पनाही नसते. या ठिकाणी विषाणूंचं साम्राज्य पसरलेलं असतं आणि तिथे स्पर्श केल्याने ते सहजगत्या शरीरात घुसतात. हस्तांदोलन केल्यानेही जंतुंचा संसर्ग होतो. बोटांना संसर्ग झाल्यावर डोळ्यांना किंवा नाकाला स्पर्श केला की जंतू शरीरात शिरतात. त्यामुळे हस्तांदोलनाची पद्धत कितीही चांगली वाटली तरी नमस्कार करणं, मान तुकवून आदर व्यक्त करणं किंवा फक्त स्मित करणं अधिक चांगलं, असं जगभर मानलं जात आहे. अर्थातच फ्ल्यू होण्यासाठी व्यक्ती शिंकांच्या किंवा खोकल्यांच्या द्रवकणांच्या संपर्कात यावी लागते. हे द्रवकण शिंकांमुळे किंवा खोकल्यातून हवेत पसरलेले असतात.
हिरवा कफ हे छातीत संसर्ग झाल्याचं लक्षण असतं, असा गैरसमज पसरल्याचं दिसून येतं. प्रत्यक्षात ते शरीराची रोगप्रतिकारयंत्रणा कामाला लागल्याचं लक्षण असतं. संसर्गाशी लढणार्‍या पांढर्‍या रक्तपेशींच्या प्रकारामुळे हा रंग आलेला असतो. सर्दी किंवा फ्ल्यूबरोबर सुरुवातीला पांढरा, स्वच्छ कफ दिसू लागतो आणि त्यानंतर तो काळसर किंवा जाडसर होऊ लागतो. कफ स्वच्छ रंगाचा, पिवळसर किंवा अगदी हिरवट असणं हे विषाणुजन्य कफाचं सर्वसामान्य लक्षण आहे. कफ दुय्यम संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला तरच अँटिबायोटिक्स लिहून दिली जातात. यात ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया यांचा समावेश असतो. काही वेळा फुफ्फुसात पाणी होण्याची शक्यता निर्माण होते किंवा इतर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. अशा वेळी अँटिबायोटिक्सना पर्याय नसतो. ताप, धाप लागणं किंवा खूपच गडद रंगाचा कफ पडणं अशी लक्षणं सात ते दहा दिवसांपर्यंत टिकली तर डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे, असं डॉक्टर सांगतात.
प्रौढ व्यक्तींना जास्त प्रमाणात सर्दी होते हा आणखी एक गैरसमज. प्रत्यक्षात वस्तुस्थिती याच्या अगदी विरुद्ध असते. मुलांना प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत तिप्पट प्रमाणात सर्दीचा त्रास होतो आणि पन्नाशी उलटून गेलेल्या प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत किशोरवयीन मुला-मुलींना दुप्पट त्रास होतो. याचं कारण म्हणजे प्रौढ व्यक्तींचा त्यांच्या आयुष्यात थंड हवेशी अधिक संपर्क आलेला असतो. त्यामुळे लहान व्यक्तींच्या तुलनेत त्यांच्या शरीरात सर्वसामान्य सर्दी आणि खोकल्याचा प्रतिकार करणार्‍या अँटीबॉडीज अधिक प्रमाणात असतात. सर्वसामान्यपणे 200 हून अधिक विषाणूंमुळे सर्दीचा त्रास होत असला तरी एकाच प्रकारच्या विषाणूमुळे दोनदा सर्दी होत नाही. सहसा हिवाळ्यात शरीराला किमान दोन विषाणूंचा संसर्ग होतो. परंतु एकदा सर्दी संपली की शरीरात त्या प्रकारच्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्यामुळे पुन्हा त्याच प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाला तरी सर्दी होत नाही.
ओल्या केसांनी बाहेर गेल्याने सर्दीचा किंवा तापाचा त्रास होतो का, हा आणखी एक प्रश्‍न असतो. कारण शरीरातली उष्णता डोक्यातून बाहेर पडते असा लोकांचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात हातातून किंवा पायातून जेवढ्या प्रमाणात उष्णता बाहेर उत्सर्जित होते, तितक्याच प्रमाणात ती डोक्यातूनही होते. मात्र सर्दी असली तर इतर काही आजारांना आपोआपच निमंत्रण मिळतं. आपण थंडीने कुडकुडतो त्यावेळी शरीरात तणाव निर्माण होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती दडपली जाते. त्यामुळे ओल्या केसांनी बाहेर जाण्याचा सर्दीशी संबंध नसतो. विमानातून प्रवास केलेल्या दर पाचपैकी एका व्यक्तीला या प्रवासानंतर सर्दीचा किंवा फ्ल्यूचा त्रास होतो असं एका अभ्यासावरून दिसून आलं आहे. या प्रवासात सुमारे 200 किंवा त्याहून अधिक विषाणूंमुळे सर्दीची लागण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर सुमारे 18 तासांपर्यंत ते संसर्ग करू शकतात. फ्ल्यूचे विषाणू एखाद्याच्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर आठ तासांपर्यंत दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग करू शकतात. विमानात अनेक ठिकाणी जंतू असू शकतात. सीट, मासिकं, सीटवर हात टेकवण्याच्या जागा, स्वच्छतागृहं यांच्याबरोबरच हवेतही असे सूक्ष्म जीव भिरभिरत राहतात. त्यामुळे विमान प्रवासादरम्यान सर्दी किंवा तापाचा संसर्ग होण्याची शक्यता नक्कीच असते.
नेहमीच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक उष्मांक घेतले तर सर्दीशी लढा देणं सुकर होतं असं मानलं जातं. परंतु हा मोठा गैरसमज आहे. सर्दी झाल्यानंतर फारसं काही खाऊ नये. कमी प्रमाणात खाल्लं तर पचनासाठी लागणारी ताकदही सर्दीच्या विषाणूंच्या नाशाकडे वळवली जाते आणि सर्दी लवकर आटोक्यात येते. अधिक खाल्लं तर बरोबर उलटा परिणाम होतो आणि सर्दीत वाढ होते. दारू, विशेषतः ब्रँडी घेतल्याने सर्दी बरी होते असा एक गैरसमज पसरला आहे. परंतु खरं तर अल्कोहोलमुळे रोगप्रतिकारशक्तीवर प्रतिकूल परिणाम होतो. ती दडपली जाते. त्यामुळे व्यक्तीला अधिक प्रमाणात विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. इतर काही वैद्यकीय संशोधनांनुसार पुरुषांना सर्दीच्या संसर्गातून बरं होण्यासाठी अधिक कालावधी लागतो. 

Exit mobile version