‘प्रवासी’ राजकारण

परदेशातील भारतीयांचा संमेलन दर दोन वर्षांनी भरवण्यात येत. त्याला हिंदीत प्रवासी भारतीय दिवस म्हणतात. यंदा तो इंदूरमध्ये भरला होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 2003 मध्ये पहिलं संमेलन भरवण्यात आलं होतं. नंतर मनमोहनसिंगांच्या काळात ते चालू राहिलं. पण भाजपने आणि मोदींनी यामधूनही राजकीय फायदा कसा उठवता येऊ शकतो ते सर्वांना दाखवून दिलं. सध्या विविध देशांमध्ये मिळून सुमारे पाच कोटी मूळ भारतीय लोक राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतीय स्थलांतरितांची संख्या इतर कोणत्याही देशातून इतरत्र गेलेल्या स्थलांतरितांपेक्षा अधिक आहे. चीन, कोरिया, दक्षिण अमेरिकेतले देश इत्यादींमधून बाहेर जाणार्‍यांची संख्या त्या खालोखाल आहे. संसदेत गेल्या वर्षी दिल्या गेलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत मूळ भारतीय असलेले 44 लाख लोक राहतात. त्याखालोखाल, संयुक्त अरब अमिरातींमध्ये 34 लाख, सौदी अरेबियामध्ये 26 लाख मलेशियामध्ये सुमारे तीस लाख असे लोक राहतात. इंग्लंडची लोकसंख्या अमेरिकेच्या एकपंचमांश आहे. पण तेथील भारतीयांचं प्रमाण मोठं म्हणजे सतरा लाख आहे. तीच स्थिती आणि कॅनडाची (सतरा लाख) आहे. भारतात जो प्रवासी दिवस सोहळा आयोजित केला जातो त्यात मात्र युरोप-अमेरिकेतल्या लोकांनाच अधिक भाव दिला जातो. त्यात डॉक्टर्स, इंजिनिअर्स वा उद्योजक इत्यादींचा भरणा असतो. त्यामुळे हा सर्व उच्चभ्रूंचा मामला असतो. वास्तविक आखाती देशांमध्ये असणार्‍या भारतीयांचं प्रमाण आणि ते मायदेशी पाठवत असलेल्या रकमा कितीतरी अधिक आहेत. पण ते गरीब व मजूर दर्जाचे असल्याने त्यांना विशेष महत्व दिलं जात नाही. त्यातही विशेष नोंदण्यासारखी बाब म्हणजे आखातात जाणार्‍यांमध्ये केरळ, तमिळनाडू व आंध्र या दक्षिणेकडील राज्यांमधील लोकांचा व त्यातही अधिक करून मुस्लिमांचा समावेश अधिक आहे. हे लोक पारंपरिकरीत्या भाजपचे मतदार नाहीत. त्यामुळे ते आले न आले तरी सारखेच असे धोरण असते. याउलट श्रीमंत देशांमधून येणार्‍या भारतीयांसाठी मात्र पायघड्या घातल्या जातात. काळाच्या ओघात यातील बरेच भारतीय अमेरिका, कॅनडा वा इंग्लंडचे नागरिक झाले आहेत. तेथील राजकारणावर प्रभाव टाकू लागले आहेत. इंग्लड वा आयर्लंडचे पंतप्रधान सध्याचे भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे या श्रीमंत भारतीयांमध्ये भाजपचा प्रचार रुजवणं आणि त्यांच्यामार्फत त्या त्या देशांमध्ये तो वाढवणं यासाठी या संमेलनाचा उपयोग करून घेण्यात येतो आहे. मोदी परदेशात गेले की त्यांच्या नावाचा जयघोष करीत त्यांचे स्वागत करणारे हेच ते लोक असतात. त्यामुळे मोदी जगामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत अशी प्रतिमा गेल्या काही वर्षात तयार झाली आहे. या मंडळींनी अमेरिकन किंवा अन्य कोणतंही नागरिकत्व घेतलं तरी त्यांच्या हृदयात भारत असावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी सोमवारी व्यक्त केली. गंमत अशी आहे की, भारतात राहणारे भारतीय नागरिक मोदीविरोधक असले तर त्यांना मात्र उठसूठ देशद्रोही ठरवलं जात असतं.  

Exit mobile version