संक्रमण शुभ होवो…

वैष्णवी कुलकर्णी

वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरक्षणाचे प्रमाण साठ ते 77 टक्क्यांपर्यंत वाढले. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आक्षेप घेतला जात नाही, तोपर्यंत मागास घटकांना दिलेले आरक्षण टिकते. अलिकडेच उत्तर प्रदेश सरकारने इतर मागासांना दिलेले वाढीव आरक्षण उच्च न्यायालयाने अयोग्य ठरवले. 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला मागासवर्गीयांचा पूर्ण पाठिंबा हवा आहे; मात्र न्यायालयीन निकालाने यात आडकाठी आणली.

धांगडधिंगा आणि उन्मादानिशी साजर्‍या झालेल्या इंग्रजी वर्षारंभानंतर साजरी होणारी संक्रांत ही अस्सल भारतीय मातीतली आणि मुशीतली… खरं सांगायचं तर आपल्याकडील कोणताही सण निर्हेतूक नाही हे प्रामुख्यानं लक्षात घ्यायला हवं. हेतूसह साजर्‍या होत असल्यामुळे आपल्या प्रत्येक सणाला ठराविक ओळख आहे, त्यामागे एक प्रयोजन आहे आणि त्या साजरीकरणाची परिणतीदेखील सांगितली आहे. हुल्लडबाजीमध्येही आनंद मिळवण्याचाच हेतू असतो, त्यातही साजरीकरणच असतं. पण ते सात्विक नसतं, त्यातून मिळणारं सुख निर्लेप आणि निर्व्याज नसतं. त्याला विचारांची डूब नसते आणि निसर्गाशी तादात्म्य पावण्याची मूलभूत प्रेरणाही नसते. म्हणूनच अवघ्या काही दिवसांमध्ये दोन महत्त्वाचे दिवस साजरे होत असले तरी त्यामध्ये महद् अंतर दिसतं. संपूर्ण मानवजातीवर आलेली संक्रात नष्ट होत असल्याची चिन्हं दिसणं हे यंदाच्या संक्रातीच्या सणाचं विशेष. दरम्यानचा दोन-अडीच वर्षांचा काळ सर्वार्थाने संक्रमणाचा होता. मात्र संक्रांत हे स्थित्यंतराचं पर्व असल्यामुळे आता  अधोगतीला नेणारं संक्रमण थांबत असल्याबद्दल आनंद व्यक्त करणं गरजेचं आहे. सूर्याच्या मकर राशीतल्या प्रवेशाने लखलखीत होणारं हे प्रकाशपर्व सृष्टीबरोबरच सर्वसामान्यांच्या आयुष्यातही तेजाचा प्रकाश घेऊन येईल, अशी आशा करतच आपण यंदाची संक्रात साजरी करत आहोत.
देशातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये संक्रांतीनिमित्त खास पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं. गुजरातमध्ये संक्रांतीला ‘उत्तरायण’ म्हटलं जातं. या दिवशी गुजरातमधल्या प्रत्येक शहरातलं आकाश पतंगांनी भरून जातं. उंधियो आणि तिळाची वडी हे पदार्थ खास संक्रांतीसाठी केले जातात. तिथे डिसेंबरपासूनच लोक या दिवसाची वाट पहात असतात. आसाममध्ये संक्रांतीला ‘माघ बिहूू’ म्हटलं जातं. तिथे हा उत्सव आठवडाभर सुरू राहतो. लहान मुलं, तरूण मंडळी अत्यंत उत्साहाने ‘बिहू’ साजरा करतात. शेतामध्ये नवीन पिकाची कापणी होत असल्याने मोठ्या आनंदात हा सण साजरा होतो.  पंजाबमध्ये ‘माघी’ आणि ‘लोहरी’ या नावाने संक्रांत साजरी होते. या दिवशी लवकर उठून नदीत आंघोळ केली जाते. लोक शेकोटी पेटवून त्याभोवती भांगडा करतात. खिचडी, गूळ आणि खीर खाऊन हा सण साजरा केला जातो.  तमिळनाडूत ‘पोंगल’ या नावाने संक्रांत साजरी होते. तिथे हा एक मोठा सण असतो. या दिवशी घरं स्वच्छ केली जातात. ‘पायसम’ हे पोंगलनिमित्त केलं जाणारं खास पक्वान्नं. तामिळ महिन्याच्या ‘थाई’ या पहिल्या दिवशी पोंगल साजरा होतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा, केरळ, दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्येही या सुमारास पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संक्रांत साजरी होते.
अशा प्रकारे देशातील विविध भागांमधल्या साजरीकरणात विविधता असली तरी त्यामागील विचारात समानता आहे. माणसा-माणसातील संबंधांमधला गोडवा कायम रहावा, वृत्तीतली ऋजुता आणि माधुर्य टिकून रहावं आणि कोणत्याही कारणास्तव आलेला दुरावा दूर करुन जनांनी एकत्र येत समाजजीवन निरामय ठेवावं या मौलिक आणि मार्मिक विचारांची पार्श्‍वभूमी या साजरीकरणामागे आहे. संक्रांतीच्या दिवशी तीळगुळ देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. हे करताना हलव्याचे दाणे वा तिळाची वडी अथवा लाडूच हाती पडत नाही तर त्याद्वारे स्नेह्याप्रती आपल्या मनात असलेलं ममत्त्व, सद्विचार, शुभचिंतन या सगळ्याचं वहन होतं. शुभगती आणि शुभमतीने होणारं हे अभिष्टचिंतन परस्परांमधील नात्यातल्या गोडीवर आणखी एक वर्ख चढवून जातात. या सणानिमित्त आवर्जून एकत्र येणं, एकत्र भोजनाचा आनंद लुटणं, महिलांनी एकमेकींना वाण देणं, हळदीकुंकवाचे कार्यक्रम आयोजित करणं, छोट्या बाळाचं, नवीन सुनेचं वा जावयाचं कौतुक करत त्यांना तिळाच्या दागिन्यांनी अलंकृत करणं या सगळ्याच प्रथा तिपेडी वेणीसारखी नात्यांची गुंफण करतात आणि  ऋणानुबंध हलके हलके फुलत राहतात.
या दिवशी उच्चारल्या जाणार्‍या ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ या वाक्यामध्ये एक प्रकारचं आवाहन आहे. हा स्नेह व्यक्तींपुरता अथवा पिढीपुरता मर्यादित न राहता पुढच्या पिढ्यांमध्येही पाझरायला हवा. म्हणूनच घरात सामील झालेल्या नव्या सदस्यांना यात सामावून घेतलं जातं. नवी नवरीही प्रथम शेजारी-पाजारी संक्रांतीचं वाण ठेवते. ओला हरबरा, उसाचे किरवे, मटार, बोरं, गव्हाच्या ओंब्या, गाजराचे तुकडे यांनी परिपूर्ण ओटी देवापाशी ठेवते. हळद-कुंकू, बांगड्या, जोडवी, काळी पोतं आदी सौभाग्यवाण लुटते.  चंद्रकळा नेसलेली ही ललना तिळाच्या दागिन्यांच्या साजामुळे नक्षत्रासारखी सुंदर दिसते. नुकतंच लग्न झालेल्या युवकांचाही हलव्याच्या दागिन्यांनी सत्कार होतो. या सगळ्या प्रथा नव्या सदस्यांना, कुटुंबाशी, सग्या सोयर्‍यांशी, शेजार्‍यांशी जोडणार्‍या आहेत. घरातल्या छोट्याशा नव्या पाहुण्याला बोर नहाण घातलं जातं तेही याच कारणाने. त्यानिमित्त नव्या पिढीची एकमेकांना ओळख होते. स्पर्श, शब्द, नजरानजर, हास्य याद्वारे स्नेह जुळतो आणि वृद्धिंगत होतो. तुम्ही तुमच्या घरात आणि आम्ही आमच्या घरात, ही निती अनुसरली तर ही स्नेहमाला गुंफावी कशी? या स्नेहाच्या गाठी जुळत गेल्या तरच छानशी साखरमाळ तयार होईल. संक्रांतीच्या निमित्ताने नेमकं हेच साधलं जावं.
पूर्वी हलवा घरी तयार केला जायचा. तीळ, खसखस अथवा साबुदाण्यावर साखरेचा पाक हलके हलके पेरत काटेदार हलवा फुलायचा. अर्थात यासाठी सुगरणीचाच हात  हवा. ती मंद आचेवर हलक्या हाताने जोजवत तीळावर साखरपेरणी करायची. हे नजाकतीचं आणि संयमाची सीमा पाहणारं काम. पण अनुभवाने हे कसब अंगी बाणवलेली स्त्री चाळणीभर हलवा करायची आणि त्यातील काही दाणे केशरी रंगात माखून अनोखी रंगसंगती साधायची. हलवा करण्याची ही प्रक्रियाही स्नेह जुळवण्याची वाट दाखवून जाते. स्नेहही असाच जुळतो. नाती हलके-हलके, आस्ते-आस्ते हळवेपणाने हाताळावी लागतात आणि तशीच जपावी लागतात. परिचयाला अवधी द्यावा लागतो. तरच मैत्र जुळतं, मैत्री स्थिरावते आणि स्नेह पाझरतो. केवळ मुखी मिठास वाणी आणि वागण्यात नाटकी आवेश आणला म्हणजे माणसं जोडली जातात असं नव्हे. हा फुलोरा फुलण्यासाठी आणखीही काही हवं. हलव्याचं हेच सांगणं आहे.
स्थित्यंतराच्या या काळात आहारविहाराची पथ्य पाळली, स्नेह्या-सोबत्यांची साथ घेतली तर प्रवास सुखकर होतो. बदलांशी जुळवून घेण्याची शक्ती आणि प्रेरणा मिळते. म्हणूनच दरवर्षी हा स्नेहमेळा भरत असावा. पण सध्या हे स्थित्यंतर सततच अनुभवायला मिळतंय. प्रत्येक क्षण याची अनुभूती देतोय. समाजाची विचारधारा बदलत आहे. जीवनशैली बदलत आहे. कार्यपद्धती बदलतेय. नवी पिढी या सर्वाला सरावत असली तरी मागची पिढी पुरती बावचळून गेलेली दिसतेय. जगण्याचे नवे मापदंड जाणून घेताना तिची दमछाक होतीये. अगदी पन्नास पंच्चावनचे लोकही हा काळ आपला नाही अशी धारणा करून घेत निराश होताना दिसतात. म्हणूनच या गोड सणाच्या निमित्तानं त्यांना आपल्यासवे येऊन चालण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. तीळगूळ देणार्‍या या अशक्त हातांना आता सशक्त हातांचा आधार हवा आहे. नव्या युगात वावरण्यासाठी त्यांची मदत हवी आहे. पैसा पुरवणार्‍या या पिढीकडून त्यांना भावनिक ओलाव्याची गरज आहे. ही गरज भागली तरच त्यांच्या आयुष्यात अवीट गोडी भरून राहील. उसाच्या पेरापेरात गोडी असते, तशीच प्रत्येक क्षणात गोडी असते. फक्त ती शोधण्याची आणि संचयित करण्याची वृत्ती हवी. संक्रांतीच्या निमित्तानं स्नेहवृद्धि करताना प्रत्येकानं स्वतःच्या आयुष्यात हे माधुर्य निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. मधमाशी एखाद्या काटेरी झुडूपातील फुलामध्येही मकरंद शोधते आणि आपल्या पोळ्यात साठवते तसं कौशल्य मिळवलं तर काय बहर येईल! कणाकणानं ज्ञान साठतं, वृद्धिंगत होतं आणि सरतेशेवटी हा संचयच आपल्याला समृद्ध करतो. यंदाची संक्रातही आपल्याला अशीच समृद्ध करो ही सदिच्छा…

Exit mobile version