अजय तिवारी
जोशीमठला धार्मिक पुस्तकांमध्ये ‘ज्योतिर्मठ’ असेही म्हटले जाते. हिमालयाचा सपाट भाग हा नेहमीच अध्यात्माचा गड म्हणून ओळखला जातो. जोशी मठ आदिशंकराचार्यांनी देशात स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक आहे. सध्या मात्र इथली परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. जमीन खचत आहे. शेकडो घरांना तडे जाण्याइतपत हे प्रकरण मर्यादित नाही. येथे पाणी गळत आहे. हा भाग केव्हाही कोसळण्याची भीती आहे.
गेल्या आठवड्यात हिमालयाच्या कुशीत झालेल्या भूस्खलनामुळे संताप व्यक्त होत आहे. त्याचे कारण हे भूस्खलन नैसर्गिक नसून नियोजनशून्य विकासामुळे घडत आहे. पाण्याचा निचरा आणि अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता निसर्गाच्या कुशीत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या जंगलाचा हा परिणाम आहे. येथील परिस्थितीबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये संताप आहे. त्यांनी अलिकडेच बद्रीनाथ महामार्गावर चक्का जाम केला. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. जोशीमठला धार्मिक पुस्तकांमध्ये ‘ज्योतिर्मठ’ असेही म्हणतात. जोशी मठ आदिशंकराचार्यांनी देशात स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक आहे. या स्थानाला अध्यात्मासोबतच धार्मिक महत्त्वही आहे. इथे विष्णूचे मंदिर आहे. स्थानिक लोक सांगतात की हिवाळ्यात बद्रीनाथचे दरवाजे बंद केले जातात. त्या वेळी या मंदिरात भगवान बद्रीची पूजा केली जाते. याशिवाय नरसिंह, नवदुर्गा आणि वासुदेव मंदिरं आहेत. जोशीमठ चमोली जिल्ह्यात येतो. सातव्या ते अकराव्या शतकापर्यंत हा भाग कात्युरी राजवटीत होता. त्या घराण्यातील लोकांनी ही आपली राजधानी मानली. जोशीमठच्या नरसिंह मंदिरातील नरसिंहाच्या मूर्तीचा डावा हात हळूहळू कुजून पडतो, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. नर आणि नारायण नावाचे दोन पर्वत परस्परांना भिडले तर बद्रीनाथचा मार्ग कायमचा बंद होईल, असा प्रवाद इथे आढळतो.
जोशीमठ परिसर एका मोठ्या घटनेशी संबंधित आहे. ती इतिहासात एक लोकप्रिय घटना म्हणून नोंदली गेली आहे. जोशी मठापासून पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेले राणी गाव सुप्रसिध्द आहे. चिपको आंदोलनाची सुरुवात मार्च 1974 मध्ये येथून झाली. तेव्हा या गावात राहणार्या गौरा देवी काही महिलांसह जंगलात पोहोचल्या आणि झाडांना चिकटल्या. ही झाडे तोडायची असतील तर आधी आमच्यावर गोळी झाडा, असा इशारा त्यांनी झाडे तोडणार्यांना दिला. त्यातूनच ‘चिपको आंदोलन’ सुरू झाले आणि सरकारला माघार घ्यावी लागली. जोशी मठाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिकच नव्हे, तर भौगोलिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे. आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत आहेत. येथे अफाट निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते; मात्र सध्या या परिसरात आंदोलकांचा आवाज घुमत आहे. इथे अचानक आपत्ती आली असे अजिबात नाही. 1976 मध्ये जोशीमठवरील वाढत्या धोक्याबाबत मिश्रा आयोगाचा अहवाल आला होता. या अहवालात वाढत्या लोकसंख्येमुळे इमारतींच्या बांधकामामुळे दरड कोसळण्याच्या आणि रस्त्याला भेगा पडल्याच्या तक्रारींचा उल्लेख करण्यात आला होता. अहवालानुसार, जोशीमठ भूस्खलनाच्या क्षेत्रात आहे. हा भाग डोंगरावरील माती आणि ढिगार्यावर उभा आहे. त्यामुळेच त्याचा पाया कमकुवत आहे.
डेहराडूनच्या ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे, की जोशीमठचा रविग्राम दर वर्षी 85 मिलीमीटर खचतो आहे. उत्तराखंडच्या चार हजार 677 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या सुमारे सहाशे कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुमारे पाच हजार लोक भीतीच्या छायेत आहेत. आपले घर कधीही कोसळण्याची भीती त्यांना आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरातील रविग्राम, गांधीनगर आणि सुनील वॉर्डात झाला आहे. 13 वर्षांपूर्वी जोशीमठच्या घरांमध्ये भेगा पडू लागल्या होत्या. आताही तसेच काही घडत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर या परिसरात सुरु असलेले ‘एनटीपीसी पॉवर प्रोजेक्ट’ आणि चार धाम ऑल वेदर रोडवरील काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले. ब्लास्टिंग आणि बोगद्यांमुळे डोंगर कोसळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ते त्वरित थांबवले नाही तर शहर उद्ध्वस्त होऊ शकते. जोशीमठमध्ये जमीन सतत खचत आहे. घरांपासून रस्त्यापर्यंत सर्वत्र जाड भेगा दिसत आहेत. हिमालयाच्या ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’मध्ये स्थित जोशीमठ हे बद्रीनाथ, हेमकुंड आणि फुलांच्या खोर्यात प्रवेश करण्याचे ठिकाण मानले जाते. अशा परिस्थितीत जोशीमठमधील परिस्थिती संवेदनशील का आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
जोशीमठच्या भूगर्भीय स्थानावर प्रसिद्ध झालेले अहवाल हे शहर इतके अस्थिर का आहे, हे स्पष्ट करतात. ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी’ने आपल्या संशोधनात म्हटले आहे की बहुतेक गावं हिमनदीच्या साहित्यावर स्थिरावली आहेत. या हिमनद्यांवर लाखो टन खडक आणि माती साचली आहे. लाखो वर्षांनंतर हिमनदीचा बर्फ वितळतो आणि मातीचा डोंगर बनतो. 1976 मध्ये गढवालचे तत्कालीन आयुक्त एम. सी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सांगितले होते की, जोशीमठचा परिसर प्राचीन भूस्खलन क्षेत्रात येतो. हे शहर डोंगरावरून खाली आलेल्या खडकाच्या आणि मातीच्या ढिगार्यावर उभे राहिले आहे, जे अतिशय अस्थिर आहे. या भागातील उतारावर खोदकाम करून किंवा ब्लास्टिंग करून मोठा दगड न काढण्याची शिफारस समितीने केली होती. जोशीमठच्या पाच किलोमीटर परिसरात कोणतेही बांधकाम साहित्य टाकू नये, असेही समितीने म्हटले होते. हिमालयाच्या प्रदेशात जोशीमठ स्थित असलेल्या उंचीवरील परिसराला ‘पॅरा ग्लेशियर झोन’ म्हणतात. याचा अर्थ या ठिकाणी एके काळी हिमनद्या होत्या; पण नंतर हिमनद्या वितळल्या आणि त्यांचा ढिगारा तसाच राहिला. त्यापासून बनलेल्या पर्वताला ‘मोरेन’ म्हणतात. वैज्ञानिक भाषेत अशा जागेला असंतुलन म्हणतात. याचा अर्थ अशी जागा जिथे जमीन स्थिर नाही आणि जिचे संतुलन स्थापित केले गेलेले नाही.
जोशीमठ हिवाळ्यातील बर्फाच्या रेषेच्या उंचीपेक्षा अधिक उंचीवर आहे. हिवाळ्यात बर्फ किती प्रमाणात राहतो हे सांगणारी रेषा म्हणजे हिवाळ्यातील बर्फाची रेषा. अशा परिस्थितीतही बर्फावर कचरा साचत राहिल्यास ‘मोरेन’ तयार होते. शहराची लोकसंख्या वाढल्याने येथील वनक्षेत्र दोन हजार फुटांनी घटले. मिश्रा समितीने आपल्या अहवालात विकासामुळे जोशीमठ परिसरात असलेली जंगले नष्ट झाल्याचे म्हटले होते. इथले पर्वतांचे खडकाळ उतार उघडे आणि झाडे नसलेले आहेत. जोशीमठ सुमारे सहा हजार फूट उंचीवर वसले आहे; परंतु वस्ती वाढल्यामुळे जंगलाचे आच्छादन आठ हजार फुटांपर्यंत सरकले आहे. झाडांअभावी इथे धूप आणि दरडी कोसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या दरम्यान, मोठे दगड रोखण्यासाठी एकही जंगल शिल्लक नाही. ‘वाडिया इन्स्टिट्यूट’ने आपल्या अहवालात मोरेन पर्वताचे सरकणे ठराविक वेळेनंतर निश्चित केले असल्याचे आढळून आले होते; मात्र अंदाधुंद भूसुरुंग आणि बेशिस्त बांधकामामुळे त्याचा वेग वाढला आहे. त्याच वेळी तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, जोशीमठ शहराच्या खाली एका बाजूला धौली गंगा आणि दुसर्या बाजूला अलकनंदा नदी आहे. दोन्ही नद्यांनी डोंगराची धूप केल्याने डोंगरही कमकुवत झाला आहे.
भूस्खलनामुळे जोशीमठच्या रस्त्यांना तडे दिसत आहेत. ‘एनटीपीसी’च्या जलविद्युत प्रकल्पाचा 16 किलोमीटर लांबीचा बोगदा जोशीमठमधून जात आहे. मलबा आत गेल्यानंतर हा बोगदा बंद करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, बोगद्यात वायू तयार झाल्यामुळे निर्माण झालेला दाब मातीला अस्थिर करत आहे. त्यामुळे जमीन खचत आहे. परिस्थिती चिघळली तेव्हा सरकारने ‘एनटीपीसी’च्या जलविद्युत प्रकल्प आणि चार धाम ऑल-वेदर रोड (हेलंग-मारवाडी बायपास) या बोगद्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते; मात्र हे काम कागदावरच थांबले आहे. जागेवर मोठमोठी मशिन्स सुरूच आहेत. डोंगर खोदला जात आहे. परिस्थिती तातडीने आटोक्यात आणली न गेल्यास जोशीमठचे अस्तित्व नाहीसे होऊ शकते. जोशीमठ अलकनंदा नदीच्या दिशेने सरकत असल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यात आर्मी ब्रिगेड, गढवाल स्काउट्स आणि ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांची बटालियनदेखील आहे. ताबडतोब प्रभावी पावले उचलली न गेल्यास इथे मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.