गुंत्यांची उकल म्हणजे विज्ञान 

उत्पल वबा

विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरू होते असे उद्गार इस्त्रांच्या वैज्ञानिकाने अलीकउेच पुण्यात काढले होते. पण खरे तर विज्ञान हे अथांग आहे आणि त्याचा कोठेही व कधीच अंत होत नसतो. ‘जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं’ या एका चांगल्यापैकी प्रचलित विधानावर आज एक मीम केलं होतं. पण या विधानाच्या संदर्भाने थोडं लिहावं असं वाटतं.  विज्ञान ‘संपणं’ आणि अध्यात्म ‘सुरु होणं’ या मांडणीत मुळातच एक महान गडबड आहे हे आपल्या लक्षात यायला काहीच हरकत नाही. पण विज्ञान एका ठिकाणावर येऊन ‘संपतं’ असा एक घट्ट समज करून दिला गेला आहे आणि त्यामुळे अनेकांना ते खरं आहे, योग्य आहे असं वाटत असतं. अध्यात्माची महती सांगताना विज्ञान शेवटी कुठेतरी ‘संपतं’ हे वारंवार ठसवून सांगितलं जातं आणि विज्ञान शेवटी एकदाचं ‘संपत’ असल्याने कडवे धार्मिक-श्रद्धाळू लोक सुटकेचा निश्‍वास टाकत असतात. एकूणातच आपल्याकडील सामाजिक डिस्कोर्समध्ये विज्ञानाच्या पलिकडे काही आहे, ते आपल्याला कळणार नाही, शेवटी अध्यात्म महत्त्वाचंच, हे विज्ञानवाले स्वतःला फार शहाणे समजतात ही गृहीतके स्पष्ट-अस्पष्टपणे नांदत असतात. (काही वर्षांपूर्वी आलेला ‘देऊळबंद’ हा चित्रपट याचं एक चांगलं उदाहरण आहे). मीममध्ये ‘विज्ञान संपल्यानंतर’ असं म्हटलेलं असलं तरी तो विनोदाचा भाग आहे हे लक्षात घेऊया. विज्ञान (किंवा अध्यात्मही) असं ‘संपत’ नसतं. विज्ञान म्हणजे काय? विज्ञानाची व्याख्या कशी करायची यावर पुष्कळ मटेरियल उपलब्ध आहे. ते वाचता येऊ शकेल. ते इथे सांगत नाही. मला जे आकलन होतं, जे जाणवतं ते सांगतो. विज्ञान याचा अर्थ ‘घटितांमागच्या कारण-परिणामांच्या साखळीची उकल’ असा करता येईल. ‘जे आहे’ ते तसं का आहे, ‘जे आहे’ त्याचं स्वरूप नक्की काय आहे याचा विज्ञान हा शोध आहे. पण सृष्टीत ज्या हजारो घडामोडी होतात त्यातील काहींची उकल होत नसेल तर त्या ‘विज्ञानाच्या कक्षेबाहेर’ आहेत असं जेव्हा कुणी म्हणतं तेव्हा साध्या भाषेत सांगायचं तर ते ‘हात टेकणं’ असतं. हात टेकायला काहीच हरकत नाही. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळू शकत नाहीच. पण टेकलेले हात लगेच वर उचलून अध्यात्माचा जयघोष करण्याची जी घाई होते ती गंमतशीर आहे! आपण गूढाच्या प्रांतात फार झटकन जातो. विशेषतः भारतीयांना तर या प्रांतात रमायला फार आवडतं. (आणि गूढाच्या प्रांतात जाऊन उकल होते असंही नाही. तिथे असतं फक्त कुठल्यातरी अज्ञात शक्तीचं वर्चस्व मान्य केल्याचं समाधान. ‘अरे पण गच्चीचा काय?’ या प्रश्‍नाचं उत्तर कुणी देत नाही. गच्ची ही कशी माया आहे असं काहीतरी सांगत बसतात). मला वाटतं सगळा घोळ तिथे आहे. विज्ञान नावाची वेगळी काढून दाखवण्याजोगी वस्तू नाही. तो एक अप्रोच आहे. विचारपद्धती, ‘उकलपद्धती’ आहे. प्रचंड गुंतागुंतीच्या सृष्टीची उकल करायची झाली तर तिथे प्रचंड दमाने थांबायला लागेल (जे शास्त्रज्ञ करतात). सृष्टी ही एक प्रचंड गुंतागुंतीची व्यवस्था आहे. अगदी जैव सृष्टीपासून मानवनिर्मित व्यवस्थांपर्यंत. म्हणजे माणसाच्या गुणसूत्रांच्या रचनेचा अभ्यास करणारी विद्याशाखा असो की अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा अभ्यास करणारी विद्याशाखा असो- जी काही गुंतागुंत आहे ती समजून घ्यायचा आटोकाट प्रयत्न ज्या ‘पद्धती’मार्फत होत असतो त्याला ‘विज्ञान’ हे नाव देता येईल. गुंतागुंत अस्तित्वात आहे म्हणजे त्याची उकल अस्तित्वात असलीच पाहिजे. प्रश्‍न फक्त त्या उकलीपर्यंत पोचण्याचा आहे. आणि विज्ञान ही ’पद्धती’ किमान तसा प्रयत्न तरी करत असते. त्यात किती यश येतं हा पुढचा मुद्दा. नरहर कुरुंदकरांनी ’शिवरात्र’मधील एका प्रकरणात गांधी आणि फाळणीबद्दल लिहिताना गांधींना फाळणी थांबवण्यात अपयश आलं हे कबूल पण त्यांनी तसा आटोकाट प्रयत्न केला, ते लढले आणि जे युद्धात उतरलेच नाहीत त्या हिंदुत्ववाद्यांनी मात्र गांधींना नावं ठेवण्यापलीकडे काही केलं नाही अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. यात गांधींच्या जागी विज्ञानाला, फाळणीच्या जागी सृष्टीच्या गुंतागुंतीला आणि हिंदुत्ववाद्यांच्या जागी विज्ञान ‘संपल्या’वर बरं वाटणार्‍यांना ठेवलं की मुद्दा पुरेसा स्पष्ट होतो! माणसाच्या अनुभूतीच्या कक्षेत व्यक्त-अव्यक्त अशा बर्‍याच गोष्टी येतात. माणसाचं मन हे भावना-विचारांची निर्मिती करणारं ‘यंत्र’ आहे आणि काहीजणांना जी अनुभूती येते ती एका वेगळ्या प्रतीची असते, ती माणसं इतरांपेक्षा काही वेगळी असू शकतात/भासू शकतात हे मान्य आहे. त्यामुळे अध्यात्माबाबत बोलायचं झालं तर माणसाच्या जाणिवेचं ते एक क्षेत्र आहे, त्याचं आपलं असं एक स्थान आहे, सतत कार्यरत असलेल्या मनाच्या ‘यंत्रा’ला विसावा मिळेल, दिशा मिळेल, उभारी मिळेल असं ते एक क्षेत्र आहे हे नाकारण्यात काहीच मतलब नाही. पण म्हणून जड जगाची – भौतिक द्रव्यांनी बनलेल्या जगाची उत्तरे – या आध्यात्मिक क्षेत्रातून कशी मिळतील? तिथे मिळालीच तर संकल्पनात्मक उत्तरं मिळू शकतील. ’सत्य’ उत्तरं मिळतील का हा मोठाच प्रश्‍न आहे. अध्यात्म ही खरं तर एक ’बिलीफ सिस्टीम’ आहे असं मी म्हणेन. त्याला मनाची आवश्यकता म्हणता येईल; पण अगदी मनाच्यादेखील स्वरूपाची ’भौतिक उकल’ करण्याची पद्धत अखेरीस विज्ञान हीच आहे. (वर ’माया’चा उल्लेख केला आहे म्हणून नोंदवतो. शंकराचार्यांचा मायावाद किंवा भारतीय आणि पाश्‍चिमात्त्य तत्वज्ञानातील इतर दर्शने मला स्वतःला अतिशय आकर्षित करतात. पण तो माझ्या ‘फिलॉसॉफिकल क्वेस्ट’चा प्रांत आहे. माझा ‘वर्ल्ड व्ह्यू’ तयार होण्याचा प्रांत आहे. आपल्या असण्याला मी माझ्या विचारांनी आकार देईन, माझी नैतिक दृष्टी तयार करेन हा त्यामागील ध्यास आहे. माझ्या स्वतःच्या आणि जड सृष्टीच्याही भौतिक स्वरूपाबाबत अंतिम विधान मी तिथे करणार नाही. किंबहुना ते उत्तर मला तिथे मिळेल असं मी मनात धरलेलंच नाही). थोडक्यात ‘जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं’ या चमकदार वाक्यामुळे आपली दिशाभूल करून घेऊ नये. सायंटिफिक टेम्परामेंट नावाचा इसम आपल्याकडे आधीच दारिद्य्ररेषेखाली आहे. अशी चमकदार वाक्यं त्या बिचार्‍याला ती रेषा कधीच ओलांडू देणार नाहीत!
भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी ’राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद’ आणि ’विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या’ अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली 28 फेब्रुवारी.

Exit mobile version