बिहारमध्ये जोरदार राजकीय करामती

शिवशरण यादव

संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होण्याची आणि तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू असताना ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ने रेल्वेतील ‘नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्या’प्रकरणी चौकशी सुरु केल्याने राष्ट्रीय जनता दलाची कोंडी झाली आहे. त्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी काढलेल्या यात्रेमुळे ढवळून निघालेले वातावरण बिहारमध्ये महत्वपुर्ण राजकीय तरंग उमटवत आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नवी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नऊ तास चौकशी करण्यात आली. पुन्हा दुसर्‍या फेरीची चौकशी सुरू झाली. बंद खोलीत निवडक सीबीआय अधिकार्‍यांच्या पथकाने त्यांना अनेक प्रश्‍न विचारले आणि त्यांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे रीतसर नोंदवली गेली, जी या प्रकरणात कागदोपत्री पुरावा म्हणून वापरली जातील. या प्रकरणात थेट सहभागी असलेल्या निवडक सीबीआय अधिकार्‍यांनाच चौकशीसाठी परवानगी देण्यात आली होती. चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यांच्याकडून या घोटाळ्याशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्याकडून ‘मेसर्स एबी एक्सपोर्ट लि.’ आणि ‘मेसर्स एके इन्फोसिस्टीम प्रा. लि.’ यासारख्या कंपन्यांमधील मालकी हक्कांबद्दल माहिती मागवण्यात आली होती. या कंपन्यांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. एबी एक्सपोर्ट या कंपनीची उलाढाल कागदोपत्री फक्त चार लाख रुपये आहे; पण दिल्लीच्या पॉश न्यू फ्रेंड कॉलनी भागात 150 कोटी रुपयांच्या बंगल्यात त्याचे कार्यालय आहे. रेल्वे घोटाळ्याचे पैसे या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर झाले होते, असा तपासी यंत्रणांचा आक्षेप आहे.
या प्रकरणी ‘सीबीआय’ने दिल्ली उच्च न्यायालयाला तेजस्वी यादव यांना अटक करणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. 2004 ते 2009 या काळात तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यांच्या कार्यकाळात मोठ्या संख्येने लोकांना बेकायदेशीरपणे रेल्वेत सामावून घेण्यात आले. ‘सीबीआय’ने या प्रकरणी स्वतंत्र फिर्याद नोंदवून तपास सुरू केला आहे. या फिर्यादीनुसार, नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी ‘राइट ऑफ’ करण्यात आल्या. या जमिनी लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आल्या. या प्रकरणी यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री राबडी देवी यांचीही पाटणा येथील शासकीय निवासस्थानी चौकशी करण्यात आली होती. चौकशी संपल्यानंतर तेजस्वी यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणताही घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. अलिकडे झालेल्या मॅरेथॉन चौकशीमध्ये तेजस्वी यादव यांना नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रश्‍न विचारण्यात आले.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी या प्रकरणावर राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल या दोन्ही पक्षांना घेरले आहे. ज्या लोकांनी या घोटाळ्याशी संबंधित पुरावे ‘सीबीआय’ला दिले तेच आता या संपूर्ण प्रकरणावर राजकारण करत असल्याचे सुशीलकुमार मोदी म्हणाले. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दलात मतभेदाची दरी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लालूप्रसाद यांचे कुटुंबीय ‘सीबीआय’ला सत्य सांगायला का घाबरतात, असा सवाल ते करतात. आपण दिल्लीच्या फ्रेंड्स कॉलनीतील 150 कोटी रुपयांच्या घराचा मालक कसे बनलो हे तेजस्वी यांनी सांगावे, असे सुशीलुकमार मोदी म्हणाले. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष लल्लन सिंग यांनीच ‘सीबीआय’ला ठोस पुरावे दिले होते, असा आरोप त्यांनी केला. संयुक्त जनता दलाचे शरद यादव आणि लल्लन सिंग यांनी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना निवेदन सादर करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. पुढे नितीशकुमार यांच्या सांगण्यावरून लल्लन सिंग यांनी सीबीआयला भक्कम पुरावे दिले. आता संयुक्त जनता दल या मुद्द्यावर राजकारण करत आहे. राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने भ्रष्टाचारासारख्या गंभीर विषयाला राजकीय मुद्दा बनवले आहे; मात्र या घोटाळ्याचे सत्य बाहेर येईल, असे ते म्हणतात.
लल्लन सिंह यांनी हा भाजपच्या अस्वस्थतेचा आणि रोषाचा परिणाम असल्याचे म्हटले होते. गेल्या अनेक वर्षांपासून घोटाळ्याची फाईल बंद होती; मात्र नितीशकुमार महाआघाडीत सामील होताच ‘सीबीआय’ला दिव्य ज्ञान मिळाले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी स्वतः सीबीआयला आव्हान दिले होते.  त्यांची चौकशी करून काहीही सापडणार नाही. रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात एक चतुर्थांश जमीन द्यायचे एका व्यक्तीच्या भावाकडून लिहून घेतल्या किंवा भेट दिल्याप्रकरणी लालू-राबडी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी होणार आहे. सीबीआयने गेल्या वर्षी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. रेल्वेमंत्री असताना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन लिहून घेतल्याचे लालू यादव यांच्या कुटुंबीयांवर सात आरोप आहेत. या प्रकरणात लालू-राबडी यांच्यासह कुटुंबातील सातजण अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि ‘सीबीआय’च्या रडारवर असने, हा योगायोग आहे. लालू यादव, राबडी देवी, मीसा भारती, रागिणी यादव, चंदा यादव, हेमा यादव आणि तेजस्वी यादव यांची या प्रकरणी चौकशी होणार आहेत.  
‘सीबीआय’ने राबडी देवी आणि लालू यादव यांची चौकशी केल्यानंतर ‘ईडी’ने दहा मार्च रोजी देशभरात 24 ठिकाणी छापे टाकले. छाप्यांनंतर ‘ईडी’च्या सूत्रांनी दावा केला होता की त्यांच्याकडून 70 लाख रुपये रोख आणि दोन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. पाटणाच्या हजारी राय यांनी 2007 मध्ये एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला 9527 चौरस फूट जमीन फक्त 10.83 लाख रुपयांना विकली. हजारी राय यांचे पुतणे प्रेमचंद कुमार आणि दिलचंद कुमार यांना रेल्वेत नोकर्‍या मिळाल्याचा आरोप आहे. 2014 मध्ये राबडी देवी आणि मिसा भारती यांनी सर्व शेअर्स खरेदी करुन एका आस्थापनेचे नाव एके इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवले. तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील ज्या घरावर ‘ईडी’ने छापा टाकला ते देखील या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. पाटण्याच्या किशुनदेव राय यांनी आपली 3375 चौरस फूट जमीन राबडी देवींच्या नावे केली. हा सौदा अवघ्या 3.75 लाख रुपयांमध्ये झाला होता. किशनदेव राय यांच्या कुटुंबातील राज कुमार, मिथिलेश कुमार आणि अजय कुमार या तीन मुलांची मुंबईत रेल्वेत भरती झाल्याचा आरोप आहे. पाटणा येथील संजय राय यांनी 2008 मध्ये राबडी देवी यांना 3375 चौरस फूट जमीन 3.75 लाख रुपयांना विकली. या बदल्यात संजय राय यांच्या कुटुंबातील दोनजणांना रेल्वेत नोकर्‍या दिल्याचा आरोप आहे.
बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला घेरण्याची तयारी सुरू असताना बिहार महाआघाडीतही सर्व काही सुरळीत नाही. नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि इतर पक्षांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार यांची पावले महाआघाडीतील इतर पक्षांपेक्षा वेगळी पडत असल्याचे दिसत आहे. भाजप नेत्यांशीही त्यांची जवळीक वाढू लागली आहे. अलिकडेच नितीशकुमार अचानक भाजप आमदाराच्या घरी पोहोचले आणि प्रसाद घेतला. चैती छठ उत्सवानिमित्त मुख्यमंत्री नितीशकुमार पाटणा येथील भाजप आमदार संजय मयुख यांच्या घरी गेले होते. ती एक शिष्टाचार भेट असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंहही संजय मयुख यांच्या घरी गेले होते; मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे नितीश यांच्या भाजप नेत्याच्या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
महाआघाडीत सर्व काही सुरळीत नाही. ‘लँड फॉर जॉब’ घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’कडून कारवाई करण्यात येत आहे. यामुळे राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संयुक्त जनता दलावर दबाव टाकणे बंद केले आहे. दुसरीकडे, राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द होण्याच्या तसेच शिक्षेच्या मुद्द्यावर महाआघाडीतील सर्व पक्ष एकवटले असले तरी मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र मौन बाळगून आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारवर जोरदार टीका करणार्‍या नितीश यांनी यावर अद्याप भाष्य केलेले नाही.

Exit mobile version