‘भारत जोडो आणि काँग्रेस छोडो!

 भागा वरखडे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसरी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. ते भारत जोडायला निघाले असताना काँग्रेसच्या नेत्यांची मात्र ‘काँग्रेस छोडो’ मोहिम सुरू आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील ‘तू तू मै मै’ सुरू असताना काँग्रेसचे किरणकुमार रेड्डी, अनिल अँटनी आणि इतर काही महत्त्वाचे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. देशात पुन्हा ‘काँग्रेस छोडो’ का पहायला मिळत आहे?

भारतीय जनता पक्ष दक्षिण दिग्विजयाला निघाला  आहे. कर्नाटकमध्ये त्यांना पहिला विजय मिळाला. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये भाजपला अजूनही आपला पाया मजबूत करण्यात यश आलेले नाही. असे असले, तरी भाजपने प्रयत्न सोडलेले नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी आणि संयुक्त आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री आणि चार वेळा आमदार राहिलेले एन. किरणकुमार रेड्डी तसेच भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू सी. आर. केशवन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अनिल अँटनी हे माजी मुख्यमंत्री आणि माजी सरंक्षणमंत्री ए. के. अँटनी यांचे चिरंजीव आहेत. अनिल उच्चशिक्षित आहेत. ए. के. अँटोनी यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश हिंदुत्वाच्या जोरावर नाही तर राष्ट्रवाद, विचार, देशाची दिशा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्‍वास याच्या जोरावर शक्य झाला आहे. नवी पिढी काँग्रेसच्या नेतृत्वाला कंटाळली आहे. लोकांचा कल भाजपकडे असणे स्वाभाविक आहे. बुडत्या जहाजातून उंदीर उड्या मारून बाहेर पडतात, तसे काँग्रेसमध्ये राहून उज्ज्वल भविष्य नाही, असे अनेकांना वाटते. त्यातच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना मुख्यमंत्री पदासह अनेक महत्त्वाची पदे मिळतात, हा अनुभव आहे. दक्षिण भारतात भाजपचा विस्तार एका ध्येयाने होत असल्याच्या चर्चेला या पक्षांतरामुळे बळकटी मिळत आहे.  भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू सी. आर. केशवन यांनी अलिकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केशवन यांनी महिनाभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना त्यांनी पक्षात सुरू असलेल्या राजकारणावर आपण खूश नसल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, ‘पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसवर भाष्य करावे असे मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये केले जाणारे राजकारण मला पटत नाही आणि पक्ष सोडणे हा योग्य निर्णय आहे. आज मी तेच केले.’ केशवन यांचे नाव फार मोठे आहे आणि त्यांचे कर्तृत्व फार उंचीचे आहे, असे नाही; परंतु त्यांचे राजगोपालाचारी यांच्या कुटुंबातील असणे फार महत्त्वाचे आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये पक्षाकडून काहीही मिळाले नाही, याची नाराजी त्यांच्याकडून पक्ष सोडताना स्पष्ट दिसत होती. सी. आर. केशवन यांनी 2001 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या दरम्यान त्यांनी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेचे उपाध्यक्षपदही भूषवले. सी. राजगोपालाचारी भारतातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. ते भारताचे पहिले गव्हर्नर-जनरल होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रमुख, पश्‍चिम बंगालचे राज्यपाल, भारतीय संघराज्याचे गृहमंत्री आणि मद्रास राज्याचे मुख्यमंत्री अशी पदे भूषवली. राजगोपालाचारी हे ‘भारतरत्न’ सन्मान प्राप्त करणारे पहिले मानकरी होते. त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापनाही केली.
दक्षिणेच्या राजकारणात पाय पसरण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला सरत्या आठवड्यामध्ये अवघ्या तीन दिवसांमध्ये मोठे यश मिळाले. अनिल अँटनी यांनी भाजपच्या स्थापनादिनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसर्‍याच दिवशी म्हणजे सात एप्रिलला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रेड्डी यांनी 12 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलंगणा दौर्‍याच्या एक दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे विशेष महत्त्वाचे मानले गेले. भाजपमध्ये प्रवेश करताना किरणकुमार रेड्डी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. कोणत्या नेत्याला कोणत्या पातळीवर कोणती जबाबदारी द्यावी, हे काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला समजत नसल्याचे ते म्हणाले. त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून काँग्रेसशी संबंधित आहे; मात्र त्यांच्यासारख्या नेत्यांकडे पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे पक्ष सतत कमकुवत होत चालला आहे. किरणकुमार रेड्डी रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळले आहेत. त्यांच्या रुपाने भाजपला आंध्र प्रदेशमध्ये राजकीय फलंदाजी करायला एक चांगला उमेदवार मिळाला आहे. आंध्र प्रदेशच्या विभाजनाला त्यांचा विरोध होता. त्यांचा विरोध डावलून आंध्र प्रदेशचे विभाजन केले होते. त्यामुळे आंध्र आणि तेलंगणामधून काँग्रेस संपली.
2014 मध्ये तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आंध्र प्रदेशचे आंध्र आणि तेलंगणामध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा किरणकुमार रेड्डी यांनी विरोध केला होता. त्यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘जय समैक्य आंध्र’ हा पक्ष स्थापन केला होता; मात्र 2018 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरणकुमार रेड्डी म्हणाले की काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्ष एकापाठोपाठ एक राज्य गमावून बसत आहे. ‘माझा राजा खूप हुशार आहे. तो स्वतःचाही विचार करत नाही आणि इतरांच्या सूचनाही ऐकत नाही अशी एक जुनी कथा आहे, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य बनवले. अर्थात ते आणि अनिल अँटनी गेल्या दोन महिन्यांपासून भाजपच्या वाटेवर होते. आता प्रत्यक्षात त्यांचा पक्षप्रवेश झाला इतकेच. या दोघांसह केशवन यांच्या भाजपप्रवेशाने लगेच आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या तीन राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळेलच, असे नाही; परंतु पूरक वातावरणनिर्मिती करण्यात भाजपला यश मिळेल. वेगवेगळ्या समाजघटकांमध्ये शिरकाव करण्याची संधीही भाजपला मिळणार आहे.  
अनिल अँटनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वडील ए. के. अँटनी दुखावले असले तरी मुलगा एका पक्षात, वडील दुसर्‍या पक्षात, अशी स्थिती आढळणे ही आजची बाब नाही. आई एका पक्षात आणि मुलगा दुसर्‍या पक्षात हे भाजपच्या बाबतीत घडले आहे. विजयाराजे शिंदे, माधवराव शिंदे हे त्याचे उदाहरण. महाराष्ट्रात तर आता अशी अनेक उदाहरणे पहायला मिळत आहेत. गजानन कीर्तीकर, सुभाष देसाई यांच्याबाबतीत तर हे अगदी अलीकडे घडले आहे. के. अँटनी यांची गणना काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते. ते केरळचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिले आहेत; पण मुलगा अनिल अँटनी बराच काळ भाजपच्या संपर्कात होता. ‘बीबीसी’ने काढलेल्या गुजरात डॉक्युमेंटरीला सरकारने विरोध केला होता. तिच्यावर बंदी आणली. काँग्रेसने मात्र ही डॉक्युमेंटरी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अनिल अँटनी काँग्रेसवर नाराज झाले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भलामण केली. अनिल यांच्या या कृतीवर पक्षातून टीका व्हायला लागली. त्यामुळे ते आणखी दुखावले. त्यातच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून अनिल यांचा भाजपकडे प्रवास सुरू होता. केरळमध्ये भाजप दीर्घ काळापासून कार्यरत आहे; मात्र या राज्यात भाजपला आतापर्यंत फारसे यश मिळवता आलेले नाही. भाजपला विधानसभेत पूर्वी एक जागा मिळाली होती. गेल्या विधानसभेत तर भाजपचा एकही आमदार नाही. 2021 मधल्या केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने 140 पैकी 115 जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यांना 11 टक्क्यांहून अधिक मते मिळाली; पण एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या निवडणुकीच्या अगोदर कोकण रेल्वे आणि ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळख असलेल्या ई. श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करण्यात आले. त्यांना 35 टक्क्यांहून अधिक मते मिळाली; परंतु काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला. केरळमध्ये ख्रिश्‍चन आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असणे ही भाजपची अडचण आहे.

Exit mobile version