यश अक्षय्य रहावे

मंजिरी ढेरे

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाणपोया सुरू करण्याची प्रथा काही भागांमध्ये पहायला मिळते. या दिवशी नद्यांच्या संगमावर नद्यांच्या पूजनाचे कार्यक्रम पार पाडतात. कुंभजलाची पूजा केली जाते. प्रत्येक सजीवाला जिवंत ठेवणारा हा ठेवा अक्षय्य रहावा, हीच यामागील भावना असते. म्हणूनच एकीकडे हा सणाचा, दुसरीकडे पितरांचे श्राद्धविधी करण्याचा तर तिसरीकडे मंगल खरेदीने साजरा करण्याचा आगळा मुहूर्त ठरतो.पाणी हा जगण्यासाठी तसेच जगवण्यासाठी अनिवार्य घटक आहे. म्हणूनच ही प्राथमिक गरज भागवणारे पाणवठे, पिण्यायोग्य पाण्याचा संचय करतो ती सर्व प्रकारची भांडी, कुंभ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. उन्हाळ्यात त्याचे महात्म्य प्रकर्षाने जाणवते आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने वंदन करुन त्या प्रती श्रद्धाभाव तसेच कृतज्ञता व्यक्तही केली जाते. त्यामुळे साडे तीन मुहूर्तापैकी एक असणार्‍या अक्षय्य तृतीयेला कुंभपूजनाचे महत्त्व आहे. आता घरांमध्ये अभावानेच मातीचे कुंभ बघायला मिळतात. पूर्वी ते घरोघरी असायचे. घरात तसेच बाहेरच्या बाजूला भल्या मोठ्या रांजणांमध्ये पाणी भरुन ठेवले जायचे. वाटसरुंसाठी रस्त्यावर रांजण भरुन ठेवण्याची पद्धत होती. या पाणपोया आल्या-गेल्यांची तहान भागवायच्या. आताही उन्हाळ्यात काही भागांंमध्ये पाणपोयांची सोय केली जाते. गल्लोगल्ली पाण्याच्या बाटल्या विकत मिळत असल्यामुळे आता त्यांची तेवढी गरज भासत नाही, हा भाग वेगळा… पण सामाजिक बांधिलकी म्हणून हा निश्‍चितच चांगला उपक्रम आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अशा पाणपोया सुरू करण्याची प्रथा काही भागांमध्ये पहायला मिळते. या दिवशी नद्यांच्या संगमावर नद्यांच्या पूजनाचे कार्यक्रम पार पाडतात. कुंभजलाची पूजा केली जाते. प्रत्येक सजीवाला जिवंत ठेवणारा हा ठेवा अक्षय्य रहावा, हीच यामागील भावना असते. म्हणूनच एकीकडे हा सणाचा, दुसरीकडे पितरांचे श्राद्धविधी करण्याचा तर सुवर्णखरेदीसारख्या मंगल खरेदीने साजरा करण्याचा आगळा मुहूर्त ठरतो.
अक्षय्य तृतीयेला कृतयुगाचा आरंभ दिन मानतात. या दिवशी होणार्‍या उत्सवात प्राधान्याने विष्णूची पूजा करतात. जगन्नाथ पुरी येथे मदनमोहनाची मूर्ती पालखीतून मिरवतात. तिला वाजत-गाजत नरेंद्र तलावाकडे नेतात. मूर्तीला चंदन लावून स्नान घालतात. महाराष्ट्रापुरते सांगायचे तर चिपळूण येथे परशुरामाची मोठी जत्रा भरते कारण अक्षय्य तृतीया हा परशुरामाचा जन्मदिन आहे. परशुरामाने सज्जनाचे रक्षण केले आणि दुर्जनांचा संहार केला. म्हणून परशुरामाचे महत्त्व आजही अधोरेखित होते. अक्षय्य तृतीयेला महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी केली जाते. बसवेश्‍वरांनी समतेचे तत्व जनमानसात रुजवले. देवाच्या दरबारात आपण सगळे एक आहोत हे तत्त्व त्यांनी समाजात प्रस्थापित केले. म्हणूनच या निमित्ताने त्यांच्या शिकवणीची उजळणी व्हायला हवी.
 आधी उल्लेख केल्याप्रमाणे या दिवसापासून अनेक सेवाभावी संस्था पाणपोया घालतात. पहिला पाऊस पडेपर्यंत पाणपोया सुरू ठेवायच्या असतात. सगळ्या लोकांना पाणी मिळायला हवे, यात्रेकरु-वाटसरूंना पाणी मिळावे ही त्यामागील भावना असते. ठराविक लोक पाणी पुरवण्याची जबाबदारी घेतात. पाण्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. कारण पाणी जीवन आहे तसेच तो सृष्टीमध्ये नवरस निर्माण करणारा घटक आहे. मध्यंतरी पंढरपूरला चंद्रभागेच्या काठी सारा परिसर स्वच्छ करुन झाडे लावली गेली. ही सारी झाडे सावली देणारी आहेत. त्यातला हेतू हेाच की वारकरी झाडाखाली विश्रांत व्हावा आणि त्याने चंद्रभागेत घाण न करता आपल्या पूजेतील निर्माल्य कुंभात टाकावे. ही दक्षता घेतली गेली तर आरोग्याचा प्रश्‍न सुटेल. पर्यावरण संतुलन साधले जाईल. लोकांना पाण्याची किंमत कळेल. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हाती घेतले जाणारे हे सगळे उपक्रम उपयुक्त म्हणावे लागतील.
पाण्याबरोबरच सृष्टीची पूजा करताना आंबाच्या फळाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आंब्याला अमृतवृक्ष म्हणतात. हे केवळ रसापुरते फळ नाही तर तपश्‍चर्येचा वृक्ष आहे. ज्ञानाच्या संवादाचा वृक्ष आहे. पूर्वीच्या गुरुकुलातल्या चर्चा याच आम्रवृक्षाखाली होत असत. आजही मंगल कार्यात आंब्याच्या डहाळीचे प्रथम पूजन होते. आंब्याचे तोरण बांधल्याशिवाय मंगल कार्य पुढे जात नाही. या सार्‍या गोष्टींचा अर्थ एकच. आपण ज्या झाडाची फळे खातो ते हयातीत लावलेच पाहिजे. पूर्वी गुरुकुलात हा नियमच होता. झाड लावल्याशिवाय तुम्हाला फळ खायचा अधिकार नाही असे मानले जात असे. ही भावना आपल्या जगण्यातही महत्त्वाची आहे. या दिवशीचा नैवेद्य सामुदायिक असतो. तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचा असतो. सृष्टीच्या पूजेला सगळ्यांना बोलवायचे असते. या सगळ्या प्रथा-परंपरांमधून आपल्याला व्यापक होण्याचा संदेश मिळतो. संकुचितपणा नाहिसा करणे आणि व्यापक मनाने वर्तमानाला सामोरे जाणे म्हणजे अक्षय्य तृतीया होय.
नकारात्मक गोष्टींचा त्याग करुन सगळ्यांना उदात्त प्रेरणेने घेऊन पुढे जाणे म्हणजे ही तृतीया साजरी करणे. ‘मी माझ्यापुरते’ न पाहता हा ‘मी’ ‘आम्ही’ कसा होईल याचा विचार या दिवशी करायचा असतो. अक्षय्य तृतीया हा चैत्र गौरीच्या हळदीकुंकवाच्या समाप्तीचा दिवस असतो. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया या काळात चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. यामागे एक विशिष्ट सामाजिक हेतू आहे.  सर्व थरातल्या स्त्रियांनी एकत्र यावे, एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, स्त्रियांना ज्ञानसंपन्न करावे यासाठी गौरीचे पूजन करतात. गौरी म्हणजे पार्वती आणि गौरी म्हणजेच लक्ष्मी. पार्वतीमध्ये तप आहे तर लक्ष्मीमध्ये ऐश्‍वर्य आहे. या दोन मूल्यांशिवाय माणसाचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत नाही, हेच यातून सुचवायचे आहे. अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने मानवी जीवनाचा प्रवास तपातून झाला पाहिजे आणि त्या तपाला ऐश्‍वर्याची फळे लागली पाहिजेत हा विचार दिसतो. म्हणूनच या मुहूर्तावर सोने खरेदी करतात. या मुहूर्तावर सोनेखरेदी शुभ समजली जाते. अर्थात सोने खरेदी करणे म्हणजे प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोने खरेदी करणे असा अर्थ नाही तर कष्टातून आपले ऐश्‍वर्य वाढवणे यालाही जीवनाचे सोने करणे म्हणतात. आपल्याला साध्य करायचे आहे ते मनापासून करत, सतत सकारात्मक वृत्तीने पुढे जाणे हा अक्षय्य तृतीयेचा खरा ठेवा आहे. ही भावना जाणून घेतली तरच आपल्याला या सणाचे महत्त्व सहज लक्षात येईल.
परशुरामाचा जन्मदिन म्हणूनही हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. परशुरामाचे पराक्रमीपण महत्त्वाचे होते. परशुरामाने कोकण प्रांताला अभय दिले. पुरुरव्याच्या वंशात ऋचिक नावाचा ब्राह्मण होता. त्याचा विवाह गाधी नावाच्या क्षत्रिय मुलीशी झाला. तिने जमदग्नी या ऋषीला जन्म दिला. जमदग्नी हा ब्रह्मज्ञानी होता परंतु अत्यंत तापट स्वभावाचा होता. त्याच्या पोटी हा परशुराम आला. परशुरामाने पराक्रमाबरोबर ज्ञानालाही महत्त्व दिले. म्हणून कोकणात मोठ्या प्रमाणात परशुरामाचे पूजन केले जाते. पुढे परशुरामाचे पराक्रमी वैभव अनेक क्षत्रिय राजांना प्रेरणा देणारे ठरले. ज्ञानाला पराक्रमाची जोड असेल तर ते ज्ञान टिकते. म्हणून परशुरामाने पराक्रम आणि ज्ञान यांची योग्य रितीने सांगड घालून मानवी जीवनाला एक वेगळा आदर्श दिला. पुढे अनेकांनी या आदर्शाचे आचरण केले. महात्मा बसवेश्‍वरांनी समतेतून आणि बंधुतेतून लोककल्याणाचा मार्ग जातो हा विचार दिला. माणसाच्या जीवनाला शक्तीची गरज आहे. शक्ती नसेल तर माणसे दुबळी होतात. म्हणूनच समाजात शक्तीपूजेचे सामर्थ्य निर्माण होण्यासाठी अक्षय तृतीयेच्या काळात विविध शक्तिपीठांची पूजा करण्याची प्रथा आहे. देवीच्या सप्तशती पाठात एक महत्त्वाचा श्‍लोक आहे. त्याचा अर्थ असा की, ‘हे भगवती, तू आम्हाला सामर्थ्य दे. तू आम्हाला शक्ती दिलीस तर आम्ही या सृष्टीत राहू शकू.’ याचे वर्णन समर्थ रामदासांनी नेमकेपणाने केले आहे. ते म्हणतात,
शक्तीने मिळती राज्ये
युक्तीने सर्व होतसे ।
शक्ती-युक्ती जये ठायी
तेथे श्रीमंत नांदती ॥
आदीमातेची शक्ती आणि ज्ञानाची युक्ती यांच्या मिलापातून आपण समृद्ध होतो. सृष्टीही ही समृध्दी आपलीशी करते. आपण सृष्टीला सुस्थितीत ठेवले तर समृध्दी आजही अनुभवायला मिळेल. हे जगण्याचे एक महत्त्वाचे सूत्र या संस्कारातून मिळते. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने हे विचारमंथन महत्त्वाचे ठरते.

Exit mobile version