यान निघाले ‌‘मामा’च्या गावाला!

मंजिरी ढेरे

चंद्राला मायेच्या नात्यामध्ये गुंफण्याचा एक काळ आणि आजचा थेट चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन स्थिती अभ्यासण्याचा तसेच तिथे मानवी वस्तीची शक्यता तपासण्याचा एक काळ… या दोन्ही बाबी मानवी भावनांची तरलता आणि त्याने निर्माण केलेल्या यंत्र-तंत्रांची सज्जता दाखवून देणाऱ्या आहेत. आंतरराष्ट्रीय चंद्रमा दिवसाच्या आधीच भारताचे ‌‘चांद्रयान-3′ चांदोमामाच्या दिशेने झेपावणे हाही दुग्धशर्करा योग म्हणता येईल.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकत चंद्रावर चांद्रयान-3 मोहीम प्रक्षेपित करणे ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब म्हणावी लागेल. योगायोगाची बाब म्हणजे 20 जुलै रोजी जग आंतरराष्ट्रीय चंद्रमा दिवस साजरा करण्याच्या तयारीत असताना चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने त्याच्या दिशेने घेतलेली मोठी उडी दुधात साखरेसारखी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. इस्रोच्या सुरुवातीच्या दोन
मोहिमांनंतरचा हा तिसरा प्रयत्न असून त्याकडे चांद्रयान-2 चे फॉलो-अप मिशन म्हणून पाहिले जात आहे. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला जाणार असून आत्तापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी इथे आपली पावले टाकली आहेत. असे असताना इस्त्रोच्या चांद्रयान-3 मोहिमेचे महत्त्व नेमके किती मोठे आहे आणि त्याचा देशासाठी काय अर्थ आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी 28 जून 2023 रोजी आपण चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी तयार असल्याची माहिती दिली. चांद्रयान-3 अंतराळयान पूर्णपणे सिद्ध असून त्याच्या आवश्यक त्या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले आणि तेव्हाच या योजनेचा बिगुल वाजला. चाचणी पूर्ण केली आहे. त्यानंतर ठरलेल्या योजनेनुसार आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 अंतराळयान एलएमव्ही 3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले गेले.
चांद्रयान-3 मागे देशाची काही उद्दिष्टे आहेत. या मोहिमेचे एकूण बजेट सुमारे 615 कोटी रुपये असून चांद्रयान-3 लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. नंतर त्याचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर चालेल आणि तेथील अनेक वैज्ञानिक चाचण्या पूर्ण करेल. चांद्रयान-2 प्रमाणेच चांद्रयान-3 मध्ये लँडर (चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग वाहन) आणि रोव्हर (चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारे आंतरग्रहीय वाहन) आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुढील एका चंद्र दिवसासाठी म्हणजेच 14 पृथ्वी दिवसांसाठी सक्रिय केले जातील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग हा इस्रोच्या चांद्र मोहिमेचा उद्देश आहे.
यापूर्वी इस्रोने सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान-2 चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्याचे ‌‘विक्रम’ लँडर खराब झाले. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रम लँडरच्या थर्मल प्रतिमा घेतल्या आहेत. ऑर्बिटरच्या या छायाचित्रांवरून दिसते की, विक्रम लँडरने चंद्रावर हार्ड लँडिंग केले. त्यामुळे ते नादुरुस्त झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की लँडिंग दोन प्रकारे केले जाऊ शकते. एक म्हणजे सॉफ्ट लँडिंग, ज्यामध्ये वाहनाचा वेग कमी होतो आणि ते हळूहळू यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरते. हार्ड लँडिंगमध्ये अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उसळते आणि कोसळते. हे लक्षात घेऊन आता सॉफ्ट लँडिंगचे प्रयत्न केले जाणार आहेत. ही मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक घटक आणि माती, पाण्याचे कण यासारख्या नैसर्गिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करेल. या मिशनमुळे चंद्राविषयीच्या अन्य विषयांसंबंधीच्या आपल्या ज्ञानात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. वैज्ञानिक चाचणीसाठी, अंतराळयानाने चंद्रावरील भूकंप मोजण्यासाठी सिस्मोमीटरसह अनेक उपकरणे घेतली आहेत. अशा चाचण्यांद्वारे शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि त्याच्या वातावरणातील इतर घटकांची माहिती मिळू शकते. चांद्रयान-3 मध्ये ‌‘स्पेक्ट्रो-पोलारोमेट्री ऑफ व्हिजिबल प्लॅनेट अर्थ’देखील आहे, जे आपल्या शास्त्रज्ञांना चंद्राभोवती फिरणाऱ्या किरकोळ ग्रहांची आणि आपल्या सौरमालेबाहेरील इतर ग्रहांची माहिती गोळा करण्यास सक्षम करेल. म्हणूनच आपली ही मोहीम केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगाच्या वैज्ञानिक समुदायासाठी महत्त्वाची आहे, असे म्हटले जात आहे. या मोहिमेबाबतची  दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हे लँडर अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नसलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर जाणार आहे. म्हणूनच या मोहिमेमुळे आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असणाऱ्या चंद्राच्या माहितीत आणखी वाढ होणार, हे निश्चित आहे. या कारणाने भविष्यातील अंतराळ संशोधनाची क्षमता चंद्रावरच नाही तर इतर ग्रहांबाबतही विकसित होईल. चांद्रयान-3 ही चंद्रासंबंधी इस्रोची तिसरी अंतराळ मोहीम आहे, हेदेखील आपण लक्षात घ्यायला हवे. याला ‌‘भारतीय चंद्र अन्वेषण कार्यक्रम’ असेही संबोधले जाते. भारताने 2008 मध्ये आपली पहिली चंद्र मोहीम चांद्रयान-1 प्रक्षेपित केली. त्यावर ऑर्बिटर आणि इम्पॅक्ट प्रोबदेखील होते परंतु ते शॅकलेटॉन क्रेटरजवळ क्रॅश झाले. पुढे या जागेला ‌‘जवाहर पॉइंट’ असे नाव देण्यात आले. पण यामुळे चंद्रावर ध्वज फडकवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. त्याआधी अमेरिका, रशिया आणि जपानने हे यश मिळवले. प्रक्षेपणानंतर 312 दिवसांनी त्याचा पृथ्वीशी संपर्क पूर्णपणे तुटला. मात्र त्यापूर्वीच या मोहिमेचे 95 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले. तेव्हा मिळालेले संमिश्र यश भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक मोठे पाऊल मानले जाते. चंद्रावर पाण्याचे कण शोधण्यातही या मोहिमेने महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढे साधारणत: 10 वर्षांनंतर 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान-2 हे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसह प्रक्षेपित करण्यात आले. परंतु 6 सप्टेंबर 2019 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा विक्रमचा लँडरशी संपर्क तुटला. पुढे तीन महिन्यांनंतर नासाच्या एका उपग्रहाला त्याचे अवशेष सापडले आणि त्याचे चित्रही प्रसिद्ध केले गेले. कदाचित विक्रम लँडर अयशस्वी झाला असेल परंतु ऑर्बिटरने चंद्र आणि त्याच्या वातावरणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करणे सुरूच ठेवले. यानंतर आता भारत आपली ‌‘चांद्रयान-3′ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असले तरी चंद्र अभियानासारख्या कार्यक्रमावर काम करणारा भारत हा एकमेव देश नाही. आपल्याबरोबरच आणखी काही देश यावर काम करत आहेत. ‌‘नासा’च्या आर्टेमिस कराराबद्दल वाचकांनी कदाचित ऐकले असेल. या कार्यक्रमांतर्गत ‌‘आर्टेमिस-1′ हे यान गेल्या वर्षी चंद्रावरुन परतले होते. भविष्यातील आर्टेमिस मिशनअंतर्गत, नासा 2025 पर्यंत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या योजनेवर काम करत आहे. जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया हे देशदेखील आपापल्या चंद्र मोहिमांवर काम करत आहेत. त्यापैकी काहींना युरोपियन युनियनकडून मदतदेखील मिळाली आहे.
नासा आणि यूएस स्टेट डिपार्टमेंटने विविध देशांच्या चंद्र मोहिमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‌‘आर्टेमिस करारा’ची स्थापना केली आहे. ही एक बहुपक्षीय नॉन-बाइंडिंग व्यवस्था आहे, जी चंद्र, मंगळ आणि इतर खगोलीय पिंडांच्या नागरी शोध आणि शांततापूर्ण वापरातील सहकार्यासाठी एक फ्रेमवर्क निश्चित करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडेच पार झालेल्या अमेरिका दौऱ्यात भारत या आर्टेमिस करारात अधिकृतपणे सामील झाला. अशा प्रकारे भारतासह बरेचसे देश
चांद्रमोहिमेवर मोठा खर्च करत असल्यामुळे काहीजण याला नव्या युगाची ‌‘स्पेस रेस’ म्हणत आहेत तर काहीजण ही आपली तांत्रिक क्षमता दाखवण्याची संधी असल्याचे सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केल्यास चीनशी आपली स्पर्धा नाकारता येत नाही. भारताच्या या शेजारी देशाने चांग-ए-6, चांग-ए-7 आणि चांग-ए-8 मोहिमांना मान्यता दिली असून रशियासोबत चंद्रावर संशोधन केंद्र बांधण्याचीही त्यांची योजना आहे. पण अंतराळ शर्यतीव्यतिरिक्तही अशा सर्व मोहिमा भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मंगळ मोहिमेसंदर्भातही या मोहिमांना विशेष महत्त्व आहे. पृथ्वीपासून दूर अंतराळात जाण्यापेक्षा चंद्रावर जाण्यासाठी कमी इंधन लागते. खेरीज भविष्यातील काही मोहिमांमध्ये अशा महत्त्वाच्या गोष्टीही चंद्रावर पाठवल्या जातील, जेणेकरून या दशकात मानव तेथे दीर्घकाळ राहू शकतील. त्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरते.
नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे चांद्रयान-3 ही भारताची या वर्षातील एकमेव मोठी अंतराळ मोहीम नाही तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत या वर्षी अंतराळ मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे. ‌‘आदित्य-एल1′ ही भारताची पहिली सौर मोहीम असली तरी या मोहिमेवर पाठवलेले अंतराळयान सूर्याकडे जाणार नसून पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावरून आपल्या जवळच्या ताऱ्याचा अभ्यास करेल. ‌‘लाँग रेंज पॉईंट’ ही पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधली जागा आहे. इथून सूर्यग्रहणाचा कोणताही अडथळा न येता हे यान आपले काम करु शकेल.

Exit mobile version