सडेतोड आणि परखड मंगलाताई

डॉ.प्रो.शमसुद्दीन तांबोळी

नारळीकर सर फारसे बोलायचे नाहीत, मात्र मंगलाताई भरपूर बोलायच्या. त्यामुळे काही दिवसांमध्येच आमची ओळख, परिचय वाढला. मी मुस्लीम सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता असल्याचे कळल्यानंतर तर आमचे नाते अधिक जवळचे झाले. मंगलाताई माझ्याकडून मुस्लीम महिलांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या. काही प्रश्‍न विचारायच्या. आता मात्र फक्त आठवणी उरल्या आहेत.

ख्यातनाम गणितज्ञ मंगला नारळीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेषकारक आहे. त्यांच्या रुपाने एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञाने पत्नी आणि सख्खी मैत्रीण गमावली. समाजाने फार मोठी गणितज्ञ गमावली तर माझ्यासारख्या माणसाने खूप चांगली शेजारीण गमावली. मंगलाताई गणित विषयातील द्विपदवीधर होत्या. बीएला तर त्या विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. गणित शिकवण्याबरोबरच त्यांना लेखनाचीही विलक्षण आवड होती. म्हणूनच लेखनातले त्यांचे योगदानही कधीच विसरण्यासारखे नाही. त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणित कसे शिकवले पाहिजे, याबाबत अत्यंत मोलाचे विचार मांडले होते. बालभारतीकडून काढल्या जाणार्‍या पुस्तकांच्या अभ्यास मंडळावर पुस्तकनिर्मितीच्या गटामध्ये त्या होत्या. आज त्यांच्या मतांवरुन एक वाद झाल्याचे वाचकांना आठवत असेल. त्यावेळी मंगलाताईंनी गणिताविषयी वेगळे मत मांडले होते, ते म्हणजे आपण बावीस अथवा यासारखा एखादा आकडा म्हणतो त्याऐवजी वीस दोन वा तीस एक वा वीस नऊ अशा तर्‍हेने आकडे म्हणावे असे मत मांडले होते. अशी पद्धत रुढ झाल्यास गणितातील क्लिष्ट संकल्पना अधिक सोप्या स्पष्ट होतील, असे त्यांचे म्हणणे होते. एकदा मुले या पद्धतीने सराव करु लागली आणि त्यांच्या बोलीभाषेतही त्याच पद्धतीने आकडे येऊ लागले की त्याचा गणिताच्या आकलनासाठी वेगळा उपयोग होऊ शकेल, असे त्यांना वाटत होते. मुलांमधील गणिताची भीड चेपावी आणि त्यांना हा विषय सोप्या पद्धतीने शिकता यावा, या हेतूने त्यांनी बरेच प्रयोग केले होते.
गणिताकडे बघण्याची ही वेगळी दृष्टी सगळ्यांनाच पटली नसल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. लोकांनी त्यांचे विचार उधळून लावले. मात्र मंगलाताई नाराज झाल्या नाहीत. उलट, लेखांद्वारे यावरची आपली ठोस भूमिका मांडली. गणिताबरोबरच त्यांनी इतर अनेक विषयांवरही लेखन केले. भटकंती, भेटलेली माणसे या संदर्भातील त्यांचे लेख वाचनिय आहेतच; खेरीज मध्यंतरी त्यांनी जातीयतेवर लिहिलेले लेखही विचारप्रवर्तक आणि आशयघन आहेत. जाती-धर्मापलीकडचा विचार करत आपण माणूस म्हणून का जगू शकत नाही, असा त्यांचा खडा सवाल प्रत्येक सुजाण माणसाला पटणारा आहे. म्हणजेच त्यांनी गणितज्ज्ञ म्हणून काम केलेले मात्र कधीच त्याची शेखी मिरवत स्वत:ला इतरांपासून वेगळे समजले नाही. मोठेपणाचे, बुद्धीजीवी वा विज्ञानवादी असल्याचे कोणतेही वलय वा अभिनिवेश न ठेवता त्या समाजात अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागत राहिल्या. प्रत्येक नाते आणि त्या अनुषंगाने येणार्‍या जबाबदार्‍या पेलत राहिल्या. सध्या समाजात अशी फार कमी माणसे बघायला मिळतात. म्हणूनच मंगला नारळीकर यांच्या रुपाने त्यातील एक माणूस गेल्याचे दु:ख मोठे  आहे.
शालेय वयात असतानाच डॉ. जयंत नारळीकर यांच्याविषयी माझ्या मनात आकर्षण होते. त्यांनी लिहिलेल्या वैज्ञानिक कथा वाचनात आल्यामुळे भेटण्याची इच्छा होती. पुढे मी शिकण्यास पुण्यात आल्यानंतर काही कार्यक्रमांमध्ये त्यांची भाषणे ऐकण्याची संधीही मिळाली. योगायोगाची बाब म्हणजे ‘पंचवटी’ या पाषाण रोडवरील भागात राहायला आलो तेव्हा समोरच ‘खगोल’ नामक इमारतीचे काम सुरू झाले. ही बारा मजली इमारत ‘आयुका’तील शास्त्रज्ञांची असून त्यात 11 शास्त्रज्ञ तर एक तत्वज्ञ यांचा निवास असणार होता. त्यात जयंत नारळीकर आणि मंगलाताईंचे घर होते. अशा प्रकारे हे विख्यात जोडपे आमच्या घरापासून अगदी जवळ रहायला आले आणि इमारतीजवळच्या ओपन जीममध्ये जाता-येता आमची भेट झाली. सकाळी वा सायंकाळी फिरुन झाल्यावर आम्ही बाकावर बसायचो. नारळीकर सर फारसे बोलायचे नाहीत, मात्र मंगलाताई भरपूर बोलायच्या. त्यामुळे काही दिवसांमध्येच आमची ओळख, परिचय वाढला. मी मुस्लीम सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता असल्याचे कळल्यानंतर तर आमचे नाते अधिक जवळचे झाले. मंगलाताई माझ्याकडून मुस्लीम महिलांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या, प्रश्‍न विचारायच्या. यातूनच आमच्या भेटीगाठी वाढल्या.
मंगलाताई पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटीच्या आझम कॅम्पसमध्ये अध्यापनासाठी जात असत. तिथे त्या गणित शिकवायच्या. अबेदा इनामदार कला, वाणिज्य, विज्ञान कॉलेजमधील विज्ञान विभागात अध्यापनाचे काम करत असतानाच त्या तेथील मुलींशी त्यांच्या समस्यांबद्दलही बोलायच्या आणि त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करायच्या. अशा प्रकारे संवाद साधत असताना विज्ञान शाखेच्या असूनही त्यांच्यावर धर्माचा पगडा खूप मोठा असल्याचे त्यांच्या लक्षात यायचे आणि याविषयी त्या मुलींशी चर्चाही करायच्या. हमीद दलवाईंविषयी नारळीकर दांपत्याला आकर्षण होते. हमीद दलवाईंचे मुस्लीम महिलांच्या प्रश्‍नावरील काम आणि प्रबोधन तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन हा यामागील एक मोठा दुवा होता. मुख्य म्हणजे नारळीकर दांपत्य आगरकरवादी. कारण मुस्लीम समाजात जन्म घेऊनही हमीद दलवाई मुस्लीम धर्माची चिकित्सा करुन त्यात सुधारणा करायचे. म्हणजेच प्रसंगी आपल्या समाजाचा रोषही स्विकारायचे. अशीच काहीशी भूमिका नारळीकर दांपत्याची होती. बरेच सुधारक आपल्या समाजातील लोकांबद्दल बोलणे टाळतात. परकीयांविरुद्ध लढा देणार्‍यांना स्वकियांचा पाठिंबा मिळतोच. मात्र स्वकियांना सुधारण्यासाठी काम करणारा एखादा पुढे येतो तेव्हा मात्र त्याला विरोध पत्करण्याची तयारीही ठेवावी लागते. नारळीकर दांपत्याने ती ठेवली होती. आगरकरवादी, विवेकवादी, सुधारणावादी, परिवर्तनवादी असल्यामुळे त्यांनी कधीच आपल्या विरोधाकडे फारसे लक्ष दिले नाही.
यात भूमिकेतून त्यांनी पुणे विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राच्या विषयाला मान्यता देण्याच्या आणि इथे त्याचे अभ्यासवर्ग सुरू करण्याच्या योजनेला विरोध दर्शवला. हा विषय समोर येताच या दोघांनीही वृत्तपत्रांमध्ये लिहून ज्योतिषशास्त्र हे शास्त्र कसे असू शकते, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. वैज्ञानिकतेला लागणार्‍या कसोट्या या विषयाला लागू शकत नाहीत, असे त्यांचे प्रतिपादन होते तर ज्योतिषाला शास्त्र म्हणणे चुकीचे असल्याचे पडखड मत होते. विद्यापीठात याचे शिक्षण देण्याची कल्पना त्यांना अजिबात आवडली नव्हती. म्हणूनच त्यांनी खड्या आवाजात विरोध नोंदवला होता. ही घटना त्यांच्या खंबीर विचारांचे दर्शन घडवणारी ठरली.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचा हमीद दलवाई स्टडी सर्कल नावाचा एक मंच आहे. कार्यकर्ते आणि युवकांसाठी बौद्धिक चर्चा करणे, अभ्यास करणे आणि त्यातून कार्यकर्ते तयार करणे यासारखे काम इथे केले जाते. त्या अनुषंगाने हमीद दलवाई यांच्या जयंतीदिनी आम्ही नारळीकर दांपत्याला इथे आमंत्रित केले होते. तेव्हा नारळीकर सर एक तास बोलले तर मंगलाताईही एक तास बोलल्या. त्यानंतर तासभर प्रश्‍न-उत्तरे झाली. अशा प्रकारे या दोघांनी तीन तास कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग घेतला होता. तेव्हा त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान यातला फरक सांगितला होता. वैज्ञानिक वेगळा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वेगळा, असे मत त्यांनी यावेळी मांडले होते आणि असा वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करणे माणसाच्या प्रगतीसाठी, उत्क्रांतीसाठी कसे उपयोगाचे ठरते, हेदेखील सांगितले होते. अशा कार्यक्रमांनी माझा या जोडीशी संवाद वाढत गेला. दुसरी एक आठवण म्हणजे माझ्या परिचयातील एका स्पेशल पण अतिशय हुशार मुलाला नारळीकर दांपत्याला भेटण्याची इच्छा होती. मी हे दोघांना सांगताच त्यांनी त्याच्यासाठी वेळ दिला आणि ‘आयुका’मध्ये भेटण्यास बोलावले. तिथे त्यांनी या मुलाच्या पातळीवर येऊन त्याच्याशी गप्पा मारल्या आणि लहानसहान शंकांचे निरसन केले. ती हृद्य भेट आजही स्मरणात आहे.
सर्वात मोठी बाब म्हणजे इतके मोठे असूनही मंगलाताईंच्या वागण्यात अतिशय साधेपणा होता. त्यांच्यातील गृहिणी कायम सजग असायची. बेंचवर बसल्यानंतर नारळीकर सरांच्या गुडघ्यांना त्रास होतो हे जाणून त्यांनी खास प्रकारची उशी तयार करुन घेतली होती. फिरायला बाहेर पडताना त्या ती उशी शबनममध्ये टाकून आणायच्या आणि बसू त्या ठिकाणी सरांना द्यायच्या. उशीच्या उंचीमुळे त्यांना बेंचवर बसणे सोपे जायचे. वाचकांचा विश्‍वास बसणार नाही पण हे दांपत्य स्वत: गिरणीत जाऊन दळण आणायचे. दळण होईपर्यंत आजूबाजूला बसायचे आणि नंतर पिशव्या घेऊन घरी परतायचे. आजच्या दिखाव्याच्या चकचकीत जगात अशी ज्येष्ठ आणि सर्वार्थाने श्रेष्ठ माणसे बघायला मिळणे विरळाच… म्हणून त्यांच्यापैकी काही जातात तेव्हा व्यक्तीबरोबरच विचार गेल्याचेही दु:ख फार मोठे असते. मंगलाताई असेच दु:ख देऊन गेल्या आहेत. त्यांना विनम्र आदरांजली.


Exit mobile version