लोकनेते भाई गणपतराव देशमुख

प्रा.डॉ. सुनील पवार

महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या वाढ व विकासामध्ये महत्त्वाचे योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनेते मा. आ. भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे होत. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये तब्बल अकरा वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विश्‍वविक्रम करणारे, राजकारणातील भीष्माचार्य, गरीब, शेतकरी, मजूर, कष्टकरी यांचे कैवारी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. पंढरपूर मोहोळ रस्त्यावरचे पेनरू हे त्यांचे गाव होय. बालपणापासूनच त्यांनी ग्रामीण जीवन अनुभवलेले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर मॅट्रिक शिक्षण पंढरपूर तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील एस पी कॉलेजमध्ये झाले. पुणे येथेच त्यांचे वकिलीचे शिक्षण झाले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा राजकारणाकडे ओढा होता. तत्कालिन पुढारी असलेले तुळशीदास जाधव, शंकरराव मोरे, नाना पाटील यांच्या मीटिंग पुणे येथे चालत असत. तेथे आबासाहेब स्वयंसेवक म्हणून हजर असत. आप्पासाहेब पवार यांचे सानिध्य त्यांना काही काळ लाभले होते. त्यावेळी शंकरराव मोरे, कमलाताई भागवत मार्क्सवादाचा अभ्यासवर्ग घेत होते या अभ्यास वर्गाला ते नियमितपणे आठवड्यातील चार-पाच दिवस जात होते. यातूनच ग्रंथांचे विश्‍लेषण करताना त्यांच्या मनाची धारणा झाली की आपण कष्टकर्‍यांसाठी काम केले पाहिजे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजात परिवर्तन होणे आवश्यक होते परंतु तसे झाले नसल्यानेच या परिवर्तनाच्या उद्देशाने शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. या काळात जगामध्ये डावी चळवळ प्रभावी होती त्याचाही पगडा तरुणांवर पडला होता.
शेतकरी कामगार पक्षाने मार्क्सवाद स्वीकारला होता. या काळात समाज विभागणी गरीब-श्रीमंत तसेच जातीव्यवस्थेचा प्रभाव असलेली होती. डाव्या चळवळीने तिची दखल घेतली शेकाप पक्षानेही त्याची दखल घेतली. परंतु त्यामध्ये म्हणावे तेवढे यश आले नाही अशी खंत शेवटपर्यंत आबासाहेबांना लागून राहिली होती. तत्कालिन पुढारी असलेले दाजीबा देसाई, उद्धवराव पाटील, भाऊसाहेब राऊत यांच्याबरोबर त्यांनी राजकारणात पाय रोवले. समाज परिवर्तन करणे व देशासाठी त्याग करणे हा निर्धार त्यांचा होता. त्यावेळी अनेक पुढारी इतर पक्षांमध्ये गेले परंतु आबासाहेब कष्टकरी गरीब यांच्यासाठी कार्य करणे या ध्येयापोटीच शेकाप पक्षात राहिले. देशात असलेला भ्रष्टाचार, गरिबी अशा समस्या आहेत त्या समस्या बाबत त्यांचे असे मत होते की मानवजातीचा इतिहास हा बदलत असतो तेव्हा ही परिस्थिती ही बदलेल. अशा मानव जातीच्या तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा होती. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत निवडून देण्याचे त्यांचे रहस्य म्हणजे लोकांचे त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व त्यांचा आशीर्वाद या बरोबरच त्यांची क्षमता व कुवत ओळखून केवळ आपल्या मतदारसंघा पुरते मर्यादित रहावयाचे असे ठरवल्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्‍वास वाढला होता. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर ते आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावाला न चुकता भेट देत असत. म्हणजेच प्रत्येक गावाला दोन वेळा त्यांची भेट होत असे. शासनाची जी धोरणे आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 1973 मध्ये 55 लाख लोक काम करत होते. त्यातून रोजगार हमीचा कायदा झाला. या कायद्याची अंमलबजावणी करून रोजगार मिळवून देणे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. पंधरा दिवसात तरी पगार झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. त्या काळात सांगोला सारख्या दुष्काळी भागात परिस्थिती भयानक होती. या भागातील शेतकर्‍याला त्यामुळे रोजगार मिळत गेला व त्यांची परिस्थिती सुधारू लागली. 1991 मध्ये रोजगार हमीच्या माध्यमातून फळबाग लागवडीचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला व सांगोला सारख्या भागामध्ये कमी पाण्यावर येणारे डाळिंब व बोराची लागवडीस प्रोत्साहन दिले. आज साधारणपणे 10 ते 15 हजार एकरावर डाळिंब शेती उभी असलेली दिसून येते. या शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यास त्यांनी सांगितले व तसा प्रचार-प्रसार केला.
सरकारच्या कर्जमाफी धोरणाबाबत त्यांचे मत असे होते की सरकारने लोकांना अर्ज भरायला लावून जे पात्र असतील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. तसेच जे कायदे केले आहेत त्यांची त्यांना माहिती करून देणे आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीत शेतकरी, मजूर कामगारांचा विकास झाला पाहिजे हे कार्य त्यांनी मनाशी पक्के बांधले होते. त्यापासून ते शेवटपर्यंत विचलित झाले नाहीत.
सुरुवातीला त्यांनी वकिली व्यवसाय सुरु केला होता. त्यांची वकिली त्या भागांमध्ये चांगली चाललीही. ही वकिली करताना ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या, प्रश्‍न यांचा त्यांना अनुभव आला व अशा लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांचे मत बनले होते. त्यांचा राजकारणाकडे ओढा वाढला. विधानसभेचा सदस्य व वकिली हे काम एकाच वेळी जमणार नव्हते त्यामुळे त्यांनी वकिली सोडली. तसेच यामागे त्यांचे ध्येय होते ते म्हणजे समाज परिवर्तन करणे. त्यांनी एकूण 13 निवडणूका लढविल्या या पैकी दोन निवडणुकांत अपयश आले. पाणी समस्येवर उपाय म्हणून सन 2000 मध्ये 81 गावांसाठी फिल्टर वॉटर अशी नाविन्यपूर्ण योजना त्यांनी राबविली. याचा फायदा जवळजवळ 85 गावांना झाला पाण्याचे महत्त्व लोकांना त्यांनी समजावून सांगितल्याने वसुलीही 90 ते 95 टक्के होऊ लागली. शेतकर्‍यांना न्याय द्यायचा असेल तर शेतीच्या पाण्याची व्यवस्था प्रथम केली पाहिजे. दुष्काळ, बेकारी हटवायचे असेल तर अशा भागात पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते. त्याचबरोबर दर हेक्टरी उत्पन्न वाढवणे आवश्यक आहे परंतु अद्याप ते वाढले नाही असे मत त्यांनी मांडले. क्रांतिसिंह नाना पाटील यांना सांगोल्याला बोलावून त्यांनी एक परिषद भरवली. त्यामध्ये ज्या भागात पाणी आहे तेथून ते पाणी आपल्या दुष्काळी भागात आणावयाचा विचार त्यांनी बोलून दाखवला. त्यातूनच टेंभू- म्हैसाळ सारख्या योजना झाल्या. पाणी आडवा पाणी जिरवा हा विचार वसंतदादांनी मांडला व तो पुढे आला असेही त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या उत्कृष्ट शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व विशद करताना ते म्हणतात की विद्यार्थिदशेपासूनच शरीराची काळजी मी घेतली. दररोज एक तास तरी फिरावयास जाणे एवढे तत्त्व ते पाळत होते. तसेच योगासनाला महत्त्व दिले होते. अशा प्रकारे सतत समाज विकासाचा ध्यास घेतलेल्या व देशाच्या कल्याणासाठी कायम कार्य केलेल्या लोक नेत्याला व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.

Exit mobile version