आनंद कोळगावकर
आणि पीए वाघमोडेचा फोन आला, भाईंनी ताबडतोब बोलावलंय. काकू गेल्यापासून भाईंना तसंही भेटलो नव्हतो. म्हणून मी हातातले काम टाकून तसाच निघालो. एरवी भाई लोकांच्या गर्दीत पण आज मात्र आम्ही दोघंच…भरपूर गप्पा झाल्या, अगदी बॅकलॉग भरून निघाला. गप्पांच्या ओघात गेल्या निवडणुकांचा विषय निघाला. तसा मला काही राजकारणात विशेष इंटरेस्ट नसतोच. पण तरीही भाईंकडे मी माझी ठाम मते मांडतो. त्यावेळीही मांडली, आत्ताही मांडली. भाई, आपण त्यांंच्यासोबत जायला नको होतं….त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको होता. त्यावर भाई अगदी निर्धाराने बोलले, कोळगावकर, राजकारणात युत्या आघाड्या होतच असतात परंतु आजवरच्या राजकारणात आपण दिलेला शब्द कधीही मोडला नाही. ज्यांच्या बाजूने शब्द दिला त्यांच्या बाजूने अगदी तन-मन-धनाने उभा राहिलो. त्यामुळेच कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, कोणीही, कितीही दगाफटका केला तरी आपण आपल्या विचारधारेवरच टिकून आहोत…..कधीही परिणामाची तमा बाळगली नाही. जयपराजय होतच राहतील, पण आपण कधीही दिलेल्या वचनाशी, शब्दाशी बेईमानी केली नाही. लोकं सारं जाणतात. भाईंच्या शब्दात चीड होतीच पण डोळ्यात मात्र वेगळाच निर्धार दिसला. भाई, तुमच्या याच खंबीरपणावर, खमकेपणावर, आम्ही सारे जीव ओवाळून टाकतो हो !
भाईंनी ओघाओघात शेकापच्या राजकारणाचे सूत्रच सांगितले जणू ! वचनावरची प्रखर निष्ठा, कणखर धेय्यवाद आणि याबरोबरच कमालीची जिद्द यावरच शेकाप राजकारणात अजून आपली खास स्पेस टिकवून आहे हेच खरं!
शेकाप हा तसा छोटा पक्ष. गरीब, पदलितांसाठी कायम संघर्ष करीतच वाटचाल. सत्ता कुणाचीही असो, अन्याय दिसला तर घणाघाती वार करणारच. त्यामुळे साहजिकच सत्तेच्या फायद्यापासून कायमच वंचित. पण भाई जयंत पाटील यांच्यासारखा जिद्दी नेता असल्याने, अशाही परीस्थितीत पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले आहे हे मात्र खरे! भाईंच्या याच जिद्दी स्वभावामुळेच हजारो कार्यकर्ते आणि सामान्य जनता, त्यांच्यावर अपार प्रेम करतात.
अलिबाग हे कोकणातील नाट्यवेडं शहर. आदरणीय भाऊ सिनकरांचे सिद्घेश्वर टुरींग नाट्यमंदीर कालौघात गेले आणि नाटकवेडा अलिबागकर चांगल्या नाटकांना मुकला. सुसज्ज वातानुकुलीत नाट्यगृह हे अलिबागकरांचे कित्येक वर्ष उराशी बाळगलेले स्वप्न……नजीकच्या काळात ते प्रत्यक्षात उतरेल असं वाटतच नव्हतं. कारण छोट्याशा शहरात नाट्यगृह आर्थिकदृष्ट्या व्हायेबल नव्हतंच. याचवेळी भाईंनी पीएनपी नगराची पायाभरणी केली.
मला आठवतं, भूमीपूजनाच्या वेळीच भाईंनी नाट्यगृहाची घोषणा केली… अगदी नावासकट… पीएनपी नाट्यगृह. झालं, शहरातील काहींच्या डोक्यात किडे वळवळायला लागले. कोट्यवधी रूपयांचा हा प्रोजेक्ट पूर्णच होणारच नाही, झालाच तर तो आर्थिकदृष्ट्या परवडणारच नाही… बंद पडेल… नाना शंकाकुशंका! पण जिद्दी भाई मात्र ठाम होते.
खरं तर शंकेखोरांचं म्हणणंही तसं बरोबरच होते. कारण अलिबाग हे तसंही पन्नास हजार-लाखभराचं शहर. शिवाय सिनेमा, टिव्ही सिरीयल्स यांची तगडी कॉम्पिटीशन होतीच.
पण आव्हाने स्वीकारणे आणि ते लीलया पूर्ण करणे, हा भाईंचा स्वभावच. नाट्यरसिकांना दिलेला शब्द भाई काहीही करून पूर्ण करणारच. आणि झालंही तसंच. अलिबागेत मुंबई-पुण्यातही नाही, असं सुसज्ज एअरकंडीशण्ड नाट्यगृह उभं राहिलं. केवळ आणि केवळ भाईंमुळेच नाट्यगृहाचा पांढरा हत्ती आज व्यवस्थित चालू आहे.
भाई नेहमी म्हणतात, आव्हान, विरोध असला की काम करायला मजा येते हेचखरं! आता रायगड बाजार. कोकणात सहकार रूजत नाही या समजाला पहिला सुखद धक्का दिला तो अलिबागच्या रायगड बाजारने. भाई दत्ता पाटील आणि भाई प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रायगड बाजारने अवघ्या सहकार भांडार क्षेत्रात अव्वल नाव कमावले. सामान्य जनतेला माफक किमतीमध्ये चांगला चोख माल मिळू लागला… तेवढ्यात ग्रहण लागले. रायगड बाजार कायद्याच्या कचाट्यात सापडला. आणि सामान्यांचा रायगड बाजार बंद पडला.
भाईंना ही गोष्ट मनाला लागली पण कणखर, जिद्दी भाईंनी हार मानली नाही. जुनी इमारत स्वत:च्या देखरेखीखाली पाडली आणि लगेचच… त्याच जागी नवे बांधकामही सुरू केले, अगदी स्वत: जातीने उभे राहून. आणि मग लवकरच नवा वातानुकुलीत रायगड बाजार दिमाखात उभा राहीला…चालू झाला. भाईंनी आपला जिद्दी स्वभाव पुन्हा एकदा दिसला.
माझ्याशी बोलताना भाई नेहमी म्हणत की, मी असा पूर्णपणे वेगळा व्यवसाय निवडेन की त्यामुळे माझ्या गावोगावच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. त्यामुळेच व्यवसाय म्हणून भाईंनी कधीही झेडपी वा सार्वजनिक बांधकाम खात्यातील कामे घेतली नाहीत. पूर्णत: वेगळे व्यवसाय निवडले.
अलिबागहून समुद्रमार्गे मुंबईला जायचे तर रेवस बंदर हा एकच पर्याय. गाळात रूतलेले रेवस बंदर आणि लॉन्चला लागणारा जास्तीचा वेळ, यामुळे हा मार्ग खूपच गैरसोईचा होता. पण तसाही त्यावेळी इलाज नव्हताच. पण पर्याय होता ना! तीसेक वर्षांपूर्वी बांधलेली मांडवा जेट्टी पडीकच होती. द्रष्ट्या भाईंना त्या पडीक जेट्टीत अलिबागच्या पर्यटनाचा भाग्योदय दिसला. भाईंच्या प्रयत्नातून ती ठाकठिक झाली आणि भाईंची पीएनपी कॅटमरान सुरू झाली. कॅटमरानमुळे मुंबई अलिबागच्या अजून जवळ आली आणि पर्यटकांची पावले सुंदर अलिबागकडे वळली. एका अर्थाने अलिबागच्या पर्यटन व्यवसायाची भाईंनीच मुहुर्तमेढ रोवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मांडवा-मुंबई जलवाहतूकीचा पर्याय किती यशस्वी झालाय हे आपण पाहतोच.
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी मांडव्याच्या आरसीएफच्या जेट्टीवर चडएइ च्या औष्णिक कारखान्यासाठीचा कोळसा यायचा. बार्ज….ट्रकने कोळसा वाहतूक…हाही एक वेगळा व्यवसाय.
तरीही भाईंचे स्वप्न होते, ते स्वत:ची जेट्टी उभारण्याचं. खरं तर स्वत:ची जेट्टी हे स्वप्नही धाडसाचेच. परंतु अगदी त्याचवेळी सरकारने खाजगी जेट्टीसाठी परवानगी देण्यास सुरवात केली. भाईंनी ठरवले की आता स्वत:ची जेट्टी उभारायचीच. तालुक्यात दोनचार ठिकाणी पाहणी केल्यानंतर धरमतर येथील पाण्याचा राफ्ट वगैरे पाहून तीच जागा फायनल केली गेली. अनेक अडचणी, अनेक परवानग्या पार केल्या गेल्या. काही गोष्टींचा मीही साक्षीदार आहेच.
एखादी गोष्ट मनात आली की त्यासाठी झपाटून काम करण्याची भाईंची पद्धत केवळ अतुलनीय! त्यांचा कामाचा झपाटा भल्याभल्यांना थकवेल. कल करे सो आज कर…आज करे वो अभी…भाईंच्या कामाचं हेच सूत्र. दप्तरदिरंगाई, लालफीत त्यांना मंजूरच नसते. अथक परीश्रम, ठाम निर्णय नि त्यानुसार त्वरीत क्शन यामुळेच भाई असे मोठमोठे प्रकल्प उभारू शकतात.
एक घटना आठवते. ऐन दिवाळीचे दिवस होते. सकाळी सकाळी भाईंचा निरोप आला की अर्जंट बोलवलंय.
कुठे? काय? कशाला??? असे फिजुल प्रश्न विचारायचे नसतातच. भाईंसोबत पेझारीला गेलो. गाडीतच कळले की जेट्टीवर दस्तुरखुद्द शरद पवारसाहेब येणार आहेत. जेट्टीवर पवारसाहेबांना भाई जेट्टीसंबंधी अशा तर्हेने माहिती देत होते, ते पाहून मीही अचंबित झालो. एखादा टेक्नोक्रॅट किंवा हाय प्रोफाईल एक्झेक्युटिव्ह काय माहिती देईल? अशा तर्हेने भाई बोलत होते. जेट्टीसंबंधी सर्व डीटेल्स….अगदी तांत्रिकसुध्दा, सफाईने समजावत होते…खरंच कमाल!
एकदा भाई मला म्हणाले, जेट्टीवर मला मालवाहतुकीसाठी रेल्वेस्टेशन आणायचेय. जेट्टीवर रेल्वे? मलाही ते प्रथमदर्शनी अशक्यच वाटले. पण भाईंनी एकदा मनात आणले की, कुठलीही अडचण त्यांना थांबवू शकत नाही. अनेक ठिकाणी चर्चाचर्वण झाल्यावर, थोडा वेळ लागला, पण अखेर पीएनपी जेट्टीवर पीएनपी मालवाहतूक स्टेशन निर्माण झाले. जेट्टीवर रेल्वे आली. मला जी गोष्ट कठीण वाटत होती, ती भाईंनी प्रत्यक्षात आणली होती… हॅट्स ऑफ!
भाई आता व्यवसायात स्थिरावले होते. पूर्वीपासूनच त्यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करायची इच्छा होतीच. भाई मला नेहमी म्हणायचे, व्यवसायातील सर्व फायदा मी गोरगरीब, होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी वापरेन. खरंच, कुठे शाळांमधून घर भरणारे इतर शिक्षणसम्राट आणि कुठे गरीबांच्या शिक्षणासाठी पदरमोड करणारे भाई जयंत पाटील! भाईंनी ठरवले आणि जमले नाही… असं कधीच झालं नाही. जिल्हाभर पीएनपी शाळा सुरू झाल्या. खेडोपाड्यातील मुलांची लांबवरची पायपीट वाचली.
आज रायगडातील सर्व जुन्याजाणत्यांना मागे टाकून पीएनपी एज्युकेशनची घोडदौड चालू असून, पीएनपी अव्वल नंबरवर आहे. जिद्दी भाईंचे हेही स्वप्न साकार झालेय.
आपण जर पाचदहा वर्षानंतरचे बघत असू तर भाई पंचवीसपन्नास वर्षांपुढचे बघतात. त्यांची र्ींळीळेपरीू िेुशी खरोखरच वाखाणण्यासारखी ! स्वप्न बघून नुसते थांबत नाहीत. तर ते स्वप्नांचा ध्यास घेतात, स्वप्नांचा पाठपुरावा करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. आणि म्हणूनच त्यांनी जी स्वप्ने बघितली, ती सारी प्रत्यक्षात आणली.
जयंतभाईंना शेतकरी भवनामध्ये पाहणे हा एक आनंददायी सोहळा असतो. जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून अक्षरश: हजारो लोक येऊन भेटतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या. सर्वांचे ऐकून घेवून त्यावर मार्ग काढणे हे सोपे काम नव्हेच. अवघा महाराष्ट्र फिरल्याने, जनसामान्यांमध्ये मिसळल्याने, भाईंना महाराष्ट्राच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. प्रश्न समजावून घेण्याबाबतीत भाईंच्या आकलनशक्तीची खरोखर कमाल वाटते. त्यांना प्रश्नाचे आकलन लगेच होते. बरेच वेळा तर व्यक्तीला बघितल्यावर त्यांना प्रश्न समजतो. ‘ता’ म्हटल्यावर ‘ताकभात’ हे त्यांना आपोआप कळते. विलक्षण ॠीरीळिपस िेुशी ही भाईंना मिळालेली दैवी देणगीच !
अशा या माझ्या अभ्यासू, कणखर, जिद्दी मित्राचा आज वाढदिवस. मित्रवर्य जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !