नवनिर्मिती की दिशाभूल?

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणार्‍या फेसबुकने आपले नाव बदलून मेटा असे नवीन नाव ठेवले आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे, असे फेसबुक कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी याविषयीची घोषणा करताना म्हटले आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना त्यांनी याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, आता कंपनी ज्या प्रकारच्या कार्यात गुंतलेली आहे, ती कार्ये फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नाहीत. त्यामुळे कंपनीने मूळ नाव बदलण्याचा निर्णय घेतला. झुकरबर्ग यांनी या शब्दाचा स्रोत स्पष्ट करताना सांगितले की, त्यांची कंपनी आता मेटाव्हर्स पद्धतीची उत्पादने व सेवा निर्माण करणार असल्याने आणि त्याद्वारे नव्या व जुन्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याचा कंपनीचा उद्देश असल्याने हे मेटा नाव देण्यात आले आहे. नावासोबतच कंपनीने आपला लोगो अर्थात व्यापारचिन्हही बदलले आहे. हे कोणत्याही व्यावसायिक समूहाच्या दृष्टीने तार्किक आणि योग्य वाटत असले तरी फेसबुकने आतापर्यंत ज्या प्रकारे अनैतिक तसेच गैर पद्धतीने व्यवहार केले, त्याच्या संबंधित अन्य माध्यमांतून मूलभूत हक्कांपासून व्यावसायिक नितीमत्तेबाबतच्या नियमांची पायमल्ली केली, ते पाहता फेसबुकची ही नवनिर्मिती आहे की जुन्या अडचणीच्या ठरू शकणार्‍या प्रश्‍नांपासून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या नव्या नावामागे आहे, हे पाहणे आवश्यक आहे. कारण कंपन्या आपल्या वृद्धीच्या विविध टप्प्यावर त्याचे समयोचित पुनब्रँँडिंग करतात. उदा. गुगलनेही आपल्या मूळ कंपनीचे नाव गुगलवरून अल्फाबेट असे केले. कारण ते सर्च इंजिनसोबतच अन्य अनेक भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासात गुंतत होते. फेसबुकनेही तसेच कारण दिले आहे. मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्‍व. कंपनीने त्या आभासी जगताला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका घेत, इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना व्हर्चूअल विश्‍वामध्ये भ्रमंती करण्याचा अनुभव आणि सेवा देण्याचा त्यांचा हेतू आहे. मेटा या ब्रॅण्डनेमअंतर्गत प्रामुख्याने दोन क्षेत्रांत काम केले जाणार आहे. एकतर सध्या विविध उपकंपन्यांतून सुरू असलेल्या सेवा सुरू ठेवल्या जातील आणि त्याचबरोबर भविष्यातील तंत्रज्ञानांचा वेध घेतला जाणार आहे. त्यामुळे गुगलच्या पद्धतीनेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आदी विविध ब्रँडची नावे तशीच राहतील आणि मुख्य कंपनीचे नामकरण करताना या अ‍ॅपची नावे बदलली जाणार नाहीत. फेसबुकच्या निर्मितीचा इतिहास अत्यंत रंजक आणि वादग्रस्तही आहे. त्याची काही प्रमाणात झलक ‘द सोशल नेटवर्क’ या ऑस्कर पुरस्कार प्राप्त चित्रपटात दिसते. मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीची स्थापनाच एका फसवणुकीतून केली, ज्यामुळे खटला भरला जाऊन त्याला मूळ संकल्पना मांडणार्‍या तिघांना पुन्हा दावा न करण्याच्या अटीवर मोठी रक्कम देऊन ते प्रकरण मिटवले होते. या तिघांत दिव्य नरेंद्र हा एक भारतीयही होता. इतक्या वर्षांनंतर हे प्रकरण सांगण्यामागचा हेतू एवढाच की फेसबुकने त्यानंतरही सचोटीने व्यवहार केले नाहीत. भारतात त्यांनी केलेल्या गैरप्रकारांवर निवडणूक काळात अर्थात पैसे घेऊन भाजपला द्वेषमूलक प्रचाराला उदारपणे जागा देण्याचे जसे प्रकार केले, तसेच खोटे प्रचारही केले. तसेच, फेसबुक वापरकर्त्यांची गोपनीय माहिती राजकीय पक्षांना विकण्याचे प्रकार त्यांनी अनेक ठिकाणी केले, जे बाहेर आले. त्याचबरोबर त्यांनी अनेकदा भारतात मोफत इंटरनेट सेवा देण्याच्या नावाखाली वापरकर्त्यांचा मुलभूत अधिकार असलेला इंटरनेटबाबतच्या तटस्थतेची बाजूच उद्धवस्त करण्यासाठी कायदे बदलण्याचे किमान तीनदा प्रयत्न केले. फेसबुकला अलिकडच्या काळात कधी नव्हे इतक्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे आणि त्याला दिवसेंदिवस या कठीण प्रश्‍नांची उत्तर देणे कठीण जात आहे. खास करुन इन्स्टाग्राममुळे काही किशोरवयीन मुलांचे भावनिक नुकसान होत असल्याची तक्रार असून त्याद्वारेही चुकीची माहिती आणि दाहक आशयाद्वारे त्यांच्या जीवनात सामग्रीसह अशांतता निर्माण केली जात असल्याचे आरोप आहेत. खरे तर फेसबुकचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांनी काही अंतर्गत दस्तऐवज लीक केल्यावर नवा ब्रँड निर्माण करण्याला वेग आला. या दस्तऐवजातून फेसबुक पसरवत असलेल्या द्वेष आणि चुकीच्या माहितीमुळे कोणते हानिकारक परिणाम होतात, हे माहिती आहे, असे दिसले आहे. त्यातून कंपनीचे नाव खराब होऊ लागले होते. ते वाचवण्यासाठी नवे नाव पुढे करण्यात आले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Exit mobile version