सिनेतारकांसह सोनाली पवारचा नृत्याविष्कार
| अलिबाग | प्रतिनिधी |
विचारांची देवाण-घेवाण, महिला सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन हा ध्यास घेत गेल्या अनेक वर्षांपासून कृषीवलमार्फत हळदीकुंकू समारंभ आयोजित केला जात आहे. अलिबाग येथील सोहळ्यानंतर शनिवारी खालापूर येथे महिलांच्या अलोट उत्साहात हा सोहळा पार पडला. मराठी मालिकेतील सिनेतारका आणि लावणीसम्राज्ञी सोनाली पवार यांचा नृत्याविष्कार या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या सोहळ्याला हजारोच्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आनंदाचं वाण लुटले.
![](https://krushival.in/grygrars/2024/01/5f1a839a-dc3d-4b4c-95f4-5cbfaa00ed8b-1024x682.jpg)
पारंपरिक मराठमोळा पेहराव करीत महिला दुपारी साडेतीन वाजल्यापासून हळदीकुंकू समारंभाच्या ठिकाणी दाखल झाल्या. बघता-बघता महिलांची अलोट गर्दी झाली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका शिवानी जंगम यांनी उपस्थित महिलांचे औक्षण केले. विलोभनीय सांजशृंगार करून हळदीकुंकू समारंभात दाखल झालेल्या महिलांनी आनंदाचं वाण लुटले. यावेळी एकमेकींना हळदीकुंकू लावून विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.
‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकमेकींना देत हा सोहळा साजरा केला. महिलांना एकत्र आणून प्रबोधन करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चित्रालेखा पाटील यांनी या कार्यक्रमातून केल्याने अनेक महिलांनी कौतुक व्यक्त केले.
![](https://krushival.in/grygrars/2024/01/1dc5edd6-9650-4f8e-8b99-b7af796e2748-1024x683.jpg)
सिनेतारकांना पाहण्यासाठी झुंबड
सोनी मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारका या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल झाल्या होत्या. अभिनेत्रींना पाहण्यासाठी, त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी सोनी मराठी वाहिनीमधील ‘अबोल प्रितीची अजब कहाणी' या मालिकेतील अभिनेता राजवीर उर्फ अजिंक्य राऊत, अभिनेत्री मयुरी म्हणजेच जान्हवी तांबट आणि ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं' या मालिकेतील अभिनेत्री बयो म्हणजे विजया बाबर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. यावेळी सिनेतारकांसोबत सेल्फी काढण्याची हौस अनेकींनी पूर्ण करून घेतली.
![](https://krushival.in/grygrars/2024/01/6abb4b47-6544-41cc-a472-4a509ffeae62-1024x683.jpg)
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कृषीवलनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील, ममता प्रीतम म्हात्रे, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, विद्यमान नगराध्यक्षा रोशना मोडवे, सोनाली पवार, शेकापचे नेते संतोष जंगम, लीला पाटील, सुनीता पिंगळे, कृषीवलच्या संपादक माधवी सावंत, व्यवस्थापक रुपेश पाटील, जाहिरात व्यवस्थापिका हर्षा पाटील, भैरवी जाधव, समृद्धी म्हात्रे, सचिन गुप्ता, सुरेंद्र वेळे, संतोष राऊळ, संपादकीय, वितरण, जाहिरात विभागाच्या महिला कर्मचारी, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या महिला कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपंचायत, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य, विद्यमान पदाधिकारी, सदस्य, खालापूर तालुक्यातील व परिसरातील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.