Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा

कृषीवलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने दिवंगत नारायण नागू पाटील यांनी सुरू केलेल्या कृषीवल वृत्तपत्राने यशस्वी 90 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. विविध उपक्रम आणि दर्जेदार पत्रकारितेच्या बळावर कृषीवल घराघरांत पोहोचले असून, आता ते शंभरीकडे वाटचाल करीत आहे. कृषीवलच्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करण्यासाठी नागेश कुलकर्णी आणि शरद कोरडे यांनी पुढाकार घेऊन पुस्तक प्रकाशित करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना कृषीवलला आणखी उंचीवर नेण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत कृषीवलचे सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी व्यक्त केले.

कृषीवलच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. 7) अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, कृषीवलच्या सहव्यवस्थापक हर्षा नाईक-पाटील, जाहिरात व्यवस्थापक सचिन गुप्ता, सहयोगी संपादक सुयोग आंग्रे, अर्थ विभाग प्रमुख दर्शना पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, उपसंपादक वैभव पाटील, डिजिटल उपसंपादक संतोष राऊळ, जिल्हा प्रतिनिधी प्रमोद जाधव, ज्येष्ठ साहित्यिक शरद कोरडे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील, प्रकाश म्हात्रे, वर्षा मेहता यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच कृषीवलच्या संपादकीय, जाहिरात, वितरण, प्रशासकीय आणि मुद्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगी संपादक सुयोग आंग्रे आणि डिजिटल प्रमुख वर्षा मेहता यांनी केले.

1 / 6

प्रसाद केरकर म्हणाले, कृषीवलमध्ये गेल्या 14 वर्षांपासून काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी आठ वर्षे संपादक आणि सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून कार्य करण्याचा आनंद लाभला. हे नाते आणि ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहावी, अशी अपेक्षा आहे. कृषीवलच्या इंटरनेट आवृत्तीवर भर दिल्यानंतर वृत्तपत्राने डिजिटल विश्वातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. इंटरनेट आवृत्तीत प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे एका तरुणाचे करिअर घडले, तर दुबईतील वाचकानेही त्या बातमीची दखल घेतली. 90 वर्षांची वाटचाल ही निश्चितच अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

2 / 7

प्रसाद केरकर पुढे म्हणाले की, कृषीवलची 90 वर्षांची वाटचाल ही केवळ एका वृत्तपत्राची कहाणी नसून विचार, संघर्ष आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास आहे. संस्थापक स्व. नारायण नागू पाटील यांनी रोवलेल्या विचारांच्या पायावर स्व. प्रभाकर पाटील उर्फ भाऊ यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली. त्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी काळाची पावले ओळखत कृषीवलला नवे रूप, नवी दिशा आणि आधुनिकतेची जोड दिली. आज चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषीवलने प्रिंट, डिजिटल आणि सोशल मीडिया अशा सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय झेप घेतली आहे. बदलत्या माध्यमविश्वातही सर्वसामान्यांचा आवाज म्हणून कृषीवलने आपली विश्वासार्हता कायम राखली असून, शंभरीकडे वाटचाल करताना ही परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.

3 / 7

शोधपत्रकारितेची गरज : माधवी सावंत
वर्धापन दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून संवाद साधण्याचा आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा सोहळा आहे. कृषीवलसोबत गेली 13 वर्षे नाते जोडले गेले असून, पत्रकार, उपसंपादक आणि कार्यकारी संपादक म्हणून एकाच वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेचे स्वरूप बदलत असताना शोधपत्रकारिता अधिक आवश्यक बनली आहे. प्रत्येक वृत्तपत्राची स्वतःची धोरणे असतात, मात्र कृषीवलशी एक कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. आजही जुने कर्मचारी आणि पत्रकार आत्मीयतेने या सोहळ्यात सहभागी झाले आहेत, हीच कृषीवलची खरी ताकद असल्याचे कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी सांगितले.

4 / 7
वृत्तपत्राच्या वाटचालीचे साक्षीदार बनण्याचे भाग्य : नागेश कुलकर्णी
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कृषीवलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या काळात सुविधा मर्यादित होत्या. उरणमधील शेतकरी आंदोलनासारख्या विषयांना कृषीवलने न्याय दिला. शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांचा आवाज बनण्याचे कार्य या वृत्तपत्राने सातत्याने केले आहे. 90 वर्षांची परंपरा जपत शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या या वृत्तपत्राच्या प्रवासाचे साक्षीदार बनण्याचे भाग्य लाभल्याची भावना रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. खिळे जोडण्याच्या युगापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास कृषीवलने अनुभवला असून, हा वारसा सक्षमपणे पुढे नेला जात असल्याचे ते म्हणाले.
5 / 6
कृषीवल सर्वसामान्यांचा आवाज : शरद कोरडे
आणीबाणीनंतर कृषीवलमध्ये बातमीदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. छोट्या बातम्यांपासून पत्रकारितेची सुरुवात झाली. कृषीवलमधील लिखाणामुळे अनेक कलावंतांना शासकीय अनुदान मिळाले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडत कृषीवल हे खऱ्या अर्थाने जनतेचे व्यासपीठ बनल्याचे ज्येष्ठ साहित्यिक शरद कोरडे यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे वृत्तपत्र : सुयोग आंग्रे
कृष्णधवल काळात सुरू झालेले कृषीवल आज सातासमुद्रापार पोहोचले आहे. सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळातही कृषीवलने स्वतःची स्वतंत्र ओळख कायम राखली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वृत्तपत्राची वाटचाल यशस्वीपणे सुरू असून, सर्वसामान्य, आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला जात आहे. प्रतिनिधींनी त्यांच्या बातम्यांमधून ही परंपरा जपली आहे. प्रशासनावर वचक निर्माण करणारी पत्रकारिता ही कृषीवलची ओळख राहिल्याचे सहयोगी संपादक सुयोग आंग्रे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कृषीवलचा दबदबा कायम : प्रकाश म्हात्रे
कृषीवलचा वर्धापन दिन म्हणजे विश्वासार्ह आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा उत्सव आहे. शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण भागातील प्रश्न प्रभावीपणे मांडत कृषीवलने वेगळी झेप घेतली आहे. वृत्तपत्रातील बातम्यांची दखल प्रशासन आणि शासनालाही घ्यावी लागते. जिल्ह्यापासून राज्य आणि देशभरात कृषीवलने आपला ठसा उमटवला असून, आगामी काळातही त्याचा दबदबा कायम राहील, असा विश्वास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केला.
कृषीवलच्या बातम्यांची दखल घ्यावीच लागते : संतोष पाटील
गेल्या काही वर्षांपासून कृषीवलमध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांच्या मार्गदर्शनामुळे ही संधी मिळाली. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्र क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी राहिली असली, तरी कृषीवलने 90 वर्षांची परंपरा यशस्वीपणे जपली आहे. कृषीवलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा विचार सर्वांनाच करावा लागतो. प्रशासन आणि शासनालाही दखल घ्यावी लागेल, अशा प्रभावी बातम्यांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटील यांनी नमूद केले.
निर्भीड पत्रकारितेचा पाया कृषीवल : शैलेश पालकर
कृषीवलसोबत प्रतिनिधी म्हणून तब्बल 39 वर्षांची वाटचाल राहिली आहे. ग्रामीण भागातील प्रश्न आणि वास्तव यांची ओळख कृषीवलच्या माध्यमातून झाली. 1987 मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. निर्भीड पत्रकारितेची मूल्ये कृषीवलने दिली असून, भविष्यात त्याची ताकद अधिक वाढविण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी सांगितले.
कृषीवलशी नाळ शेवटपर्यंत : महेश पवार
तरुण वयात कृषीवलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. विविध विषयांवर लेखन आणि बातम्या करण्याची संधी या वृत्तपत्राने दिली. आज कृषीवलने 90 वर्षांचा टप्पा गाठल्याचा आनंद आहे. शंभरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या वृत्तपत्राशी जुळलेली नाळ आयुष्यभर कायम राहील, असे ज्येष्ठ पत्रकार महेश पवार यांनी सांगितले.
कृषीवलमधील कर्मचाऱ्यांचा सन्मान
कृषीवलचा 90 वा वर्धापन दिन अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलच्या सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कृषीवलच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकार, छायाचित्रकार, विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सल्लागार संपादक प्रसाद केरकर, कार्यकारी संपादक माधवी सावंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, सहव्यवस्थापक हर्षा नाईक-पाटील आणि जाहिरात व्यवस्थापक सचिन गुप्ता उपस्थित होते.
Exit mobile version