कुडे बौद्धलेणी विकासापासून वंचितच

| माणगाव | सलीम शेख |
रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळे विकासापासून वंचित आहेत. बौद्ध कालीन या लेणीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास कुडे बौध्द लेणीही जागतिक स्थरावर पोहोचतील,मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज असून संबंधित लोकप्रतिनिधींनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

तळा तालुक्याला लाभलेला एक ऐतिहासिक ठेवा असणारी प्रसिध्द कुडे लेणी आजही विकासापासून दुर्लक्षित राहिली आहे. या कुडेलेणीवर पर्यटक, शैक्षणिक सहली मोठ्या संखेने लेणी पहाण्यासाठी येतात. या लेण्यांकडे जाणार रस्ता खराब झाल्याने दगड, खडी, माती उघडी पडली आहे. तसेच लेणी परिसरामध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय शासनांनी करणे आवश्यक होते. ते ही पाणी परिसरात नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. तसेच या लेण्यांकडे जाणार रस्ता हा राष्ट्रीय मार्गाला जोडला असल्याने त्या ठिकाणी कुडे बौद्ध लेणीकडे मार्ग असा फलक लावलेला नसल्यामुळे पर्यटकांची मोठी अडचण होत आहे. यासर्व बाबीकडे पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळणारी बौद्ध लेणी असुविधांचा पाढा वाचत आहे. त्यामुळे इथे येणारा पर्यटक आपली नाराजी व्यक्त करतात.

परिसराला निसर्गाचे वरदान
तळे आगरदांडा या राष्ट्रीय मार्गावरील कुडे गावाजवळून कुडे लेणीकडे हा रस्ता जातो. या मुख्य मार्गापासून अवघ्या सातशे मीटर अंतरावर ऐतिहासिक कुडे बौद्ध लेणी असून हा रस्ता पक्का नाही.ही बौद्ध लेणी चांगली व आकर्षक तसेच निसर्गाच्या सानिध्यात असल्याने व या लेणी समोर पाहिल्यास मांदाडची अथांग पसरलेली खाडीतील पाणी यामुळे पर्यटक लेणी पहाण्यात तहान-भूक विसरुन जातात त्यामुळे या लेण्यांकडे पर्यटकांचा पहाण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक असतो.

तळा तालुक्याच्या पर्यटनाला चालना देणारी ही लेणी सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. लेणीचा इतिहास पाहीला तर कुडेलेणी संबंधी आंतरराष्ट्रीय संशोधन झाल्यामुळे दोन हजार वर्षापासूनचा इतिहास उलगडला आहे. सातवाहन काळात कुडा लेणी शिल्पकारांनी खोदून अलंकृत केली. कुडे डोंगरावर हेमांडपंथी अजिंठा – वेरुळ धर्तीवर लेण्या हिनयान व महायान या बुध्दांच्या दोन्ही पंथाच्या काळात कोरल्या गेल्या आहेत. चैत्य प्रार्थनेसाठी तर विहार भिक्षुसंघाच्या निवासासाठी त्याकाळी असत. कुडे लेणीतील सभागृहाच्या आतील भागास भेगा पडलेल्या आहेत. पावसाळ्यात या भेगांतून पाणी पाझरून ठिबकत असते, जर असेच पाणी पाझरत राहीले तर झिज होऊन भेगा वाढून लेण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांना कुडे लेणी पाहिल्यानंतर पुढे मुरुड जंजिरा, हरीहरेश्‍वर व श्रीवर्धन ही पर्यटन क्षेत्रे ही पहाता येतात इंदापूर तळा रोवळा मार्गे श्रीवर्धन अथवा इंदापूर तळा मांदाड मार्गे मुरुड असा हा जवळचा प्रवास असून एका दिवसात ही पर्यटन स्थळे पहाता येतील असा हा जवळचा मार्ग आहे.

बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे, सचिव स्वप्निल शिर्के, कार्यकर्ते संभाजी गायकवाड यांनी बौध्द पोर्णिमेदिनी कुडे लेणीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरातत्व विभागाकडे समस्या मांडून लक्ष वेधू असे सांगितले.

Exit mobile version