| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. असं म्हणतात की, प्रेमाचा मार्ग पोटातून जातो. तहानलेल्यांना पाणी, भुकेल्या जीवाला अन्न याच उदात्त भावनेतून पुढे आला तो रोटी डे. कुणाल रवींद्र चव्हाण व सहकार्यांचा अनोखा रोटी डे आता राज्यात चर्चेत आला आहे. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून त्यांनी युवा अस्मिता फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत भुकेलेल्या जीवासाठी एक दिवस रोटी डे हा उपक्रम करण्याचे ठरवले. आणि मग त्यासाठी योग्य दिवस निवडण्याचे ठरले.
कुणालच्या कल्पक बुद्धीने 14 फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी योग्य असल्याचे मत त्याने मांडले. कारण आजकालचा तरुण पिढीला एक वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे. मुळात, आपली संस्कृतीच नसणारा 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने साजरी करते. आधुनिकतेचा नावाखाली आजची तरुण पिढी या वेगवेगळ्या डेमुळे भरकटली जाऊ लागली आहे. आजच्या तरुण पिढीला अशा संस्कृतीपासून परावृत करण्यासाठी तरुणांनी या दिवशी ‘रोटी डे’ साजरा करावा म्हणून त्याला हा दिवस योग्य वाटला. सुरुवातीस 10/15 तरुणांना घेऊन सुरु केलेल्या या संस्थेचे जाळे आता संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरदेखील विणले गेले आहे. यावर्षी कुणाल रवींद्र चव्हाण आणि त्याच्या सहकार्यांनी महाराष्ट्रातील 15 ते 16 जिल्ह्यात हा रोटी डे साजरा करून हजारो अनाथांच्या अन्नाची सोय केली. कुणाल चव्हाण व टीमने रोटी डे उपक्रमात भुकेलेल्या जिवांना भोजन दिले व प्रेरक संदेश दिला.
अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे समजून त्यांनी केलेलं कार्य खरंच खूप कौतुकास पात्र आहे. असे संस्काराचे धडे कुठल्याच पाठ्यपुस्तकाच्या धड्यात दिले जात नाहीत. ते येतात ते आईचा उदातून, तिने दिलेल्या संस्कारातून. आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनीदेखील शिक्षण क्षेत्रात अल्पावधीतच मोठं नाव केलं आहे. भविष्यात कुणालच्या हातून असेच तरुणांना दिशा देणारे काम घडो, असेच आशीर्वाद व शुभेच्छा त्याला मिळताना दिसत आहेत.