उपविभागीय पोलीस अधिकार्यांचे आवाहन
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली शहरात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने सर्व सण-उत्सवासह शिवजयंती साजरी करत असल्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी काहीही असो, पण खोपोलीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्हाला खात्री आहे म्हणूनच खोपोलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शिवजयंतीला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी शांतता बैठकीत बोलताना केले आहे.
शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने खोपोली पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी आयोजित केली होती.
या बैठकीला खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी पवार, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मारूती तांबे, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, शिळफाटा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फक्के, मनसेचे नेते जे.पी. पाटील, मनिष खवळे, शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष संदीप पाटील, भाजपचे राहुल जाधव, हनुमान मंदिर शिळफाटा अध्यक्ष अमोल शहाणे, खोपोली बाजारपेठ सुनील पुरी यांच्यासह विविध पक्षांचे, सामाजिक संघटना, मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
खोपोली नगरपरिषदेच्यावतीने 19 फेब्रुवारी ही शासकीय शिवजयंती साजरी केली जाते. यादरम्यान खोपोली शहरात अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. दरम्यान, कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासंबंधीच्या सूचना पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिल्या, तसेच यादरम्यान शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलिसांना सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.
अधिकारी दोन वर्षांनी बदली होऊन जात असतात परंतु आपण पिढ्यांपिढ्या आपल्या शहरात राहत म्हणून खोपोलीचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, त्यामुळेच सर्वांना आपलं शहर सुरक्षित वाटेल, अशी भावना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी व्यक्त करीत सोशल मीडियावर कुठलेही चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका, शिवजयंतीनिमित्त काही ठिकाणी अनधिकृत महाराजांचे पुतळे बसविले जातात, त्यामुळे वाद होण्याची शक्यता असते असे वाद होऊ नये यासाठी काळजी घ्या, आक्षेपार्ह गाणी, घोषणा देणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे मार्गदर्शन केले. शांतता बैठकीचे नियोजन गोपनीय विभागाचे सतीश बांगर, संतोष रूपनवकर यांनी केले होते.