थर्ड आय फॉर ब्लाइंड प्रकल्प ठरला लक्षवेधी
| नागोठणे | वार्ताहर |
राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाकडून घेण्यात येणारे विभागीय स्तरावरील मुंबई विभागाचे तंत्र प्रदर्शन कुर्ला-मुंबई येथील डॉन बॉस्को या खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 फेब्रुवारी रोजी राज्य तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या तंत्र प्रदर्शनात आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणे (ता. रोहा, जि. रायगड) या संस्थेतील ‘थर्ड आय फॉर ब्लाइंड’ या अंध व्यक्तींसाठी उपयोगी ठरणार्या प्रकल्पाची अमरावती येथे होणार्या राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे नागोठणे आयटीआयमधील वीजतंत्री व्यवसायाचे शिल्पनिदेशक पी.पी. पाटील आणि सहभागी प्रशिक्षणार्थी नीरज पाटील, प्रिन्स गावंड, सानिया म्हात्रे व वैष्णवी म्हात्रे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, कौतुक करण्यात येत आहे. नागोठणे आयटीआयने मिळविलेल्या या यशाबद्दल आयटीआयच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी यश मिळविलेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.