वाहतूक कोंडीमधून वाहनचालकांना मिळणार दिलासा
। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येत आहे. कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले असल्याने वाहतूक कोंडीमधून वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट हा पुढील 6 महिने बंद ठेवण्यात आला असून, सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. खोदकाम करायला सुरुवात केली असून, सर्व यंत्रणा जलदगतीने कामाला लावली असल्याचं महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कळंबोली जंक्शन अपग्रेड करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ते विकास महामंडळ नोडल एजन्सी असून, याकरिता केंद्रीय रस्ते विकास विभागाकडून 770 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. यामुळे हे वाहतूक सिग्नल आणि ट्रॅफिक फ्री होणार आहे. त्यामुळे तासन्तास वाहनांना अडकून पडावे लागणार नाही. क्रॉस कॉनफ्लेक्टसुद्धा दूर होणार आहे. परिणामी, वेळ आणि इंधन वाचणार आहे. हे काम टीआयपीएल या कंपनीला मिळाले असून, माती परीक्षणाचे कामसुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सहा महिन्यांसाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल एक्झिट बंद करण्यात आली आहे.