आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलची सामाजिक बांधिलकी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि नेत्रचिकित्सेतील अग्रणी आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेलने डिसेंबर 2024 पर्यंत 25,000 मोफत नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. हॉस्पिटलने 93,000 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करून पनवेलसह रायगड, नवी मुंबई, डोंबिवली, आणि कल्याण अशा नऊ जिल्ह्यांमध्ये सेवा पुरवल्या आहेत. केवळ दोन-अडीच वर्षांमध्ये हा टप्पा गाठल्यामुळे हा उपक्रम नेत्रचिकित्सेसाठीचा महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे.
या 100 बेडचे हॉस्पिटल शंकरा आय फाऊंडेशन, यूएसए आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार व समाजसेवक स्वर्गीय राकेश झुनझुनवाला यांच्या झुनझुनवाला फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारले आहे. येथे रेटिना, कॉर्निया, ऑक्युलोप्लास्टी, बाल नेत्रचिकित्सा आणि कॅटरॅक्टसारख्या सर्व उपविभागांसाठी सेवा दिल्या जातात.
बाल नेत्रचिकित्सेसाठी राबविण्यात आलेल्या रेनबो उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील 70,000 हून अधिक मुलांची तपासणी करण्यात आली. स्क्विंट आणि कॅटरॅक्टसारख्या समस्यांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत तसेच, मोफत चष्मे वितरित करण्यात आले. पनवेल आणि आसपासच्या भागांमध्ये नेत्रविकारांचे प्रमाण अधिक असल्याचे आणि नेत्रतज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
डॉ. गिरीश बुधरानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल म्हणाले, आमचे हॉस्पिटल ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांसाठी नेत्रतपासणीपासून अत्याधुनिक उपचारांपर्यंत सर्व सेवा पुरवते. येथे कॉर्निया, रेटिना, ग्लुकोमा, मधुमेहजन्य नेत्रविकार, बाल नेत्रचिकित्सा, कॅटरॅक्ट, शस्त्रक्रिया तसेच नेत्रदानासाठी आय बँकदेखील आहे. डॉ. राजेश कापसे, युनिट प्रमुख, आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल म्हणाले, आमचे अत्याधुनिक, सहा मजली हॉस्पिटल आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. उच्च दर्जाच्या सेवा देतांना आम्ही गरीब व गरजू लोकांनाही परवडणार्या दरात सेवा पुरवतो. कोकण व पश्चिम महाराष्ट्रासाठी हे हॉस्पिटल एक आशेचा किरण ठरले आहे.