24 तास सेवा; सुसज्ज शस्त्रक्रिया विभागामुळे रुग्णांना दिलासा
। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील व दक्षिण रायगडमधील रुग्णांची सेवा करण्यासाठी उभारण्यात आलेले माणगाव उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचे उत्कृष्ट केंद्र बनत आहे. त्यामुळे हे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे. डायलिसिस, सिटीस्कॅन तपासणी, स्त्रियांचे प्रसूती व सिजेरियन ऑपरेशन्स, तसेच विविध शस्त्रक्रिया यांसारख्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे हे रुग्णालय हजारो रुग्णांना आधार बनले आहे. त्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाची वाटचाल स्मार्ट रुग्णालयाच्या दिशेने सुरु आहे.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा हा प्रवास केवळ आरोग्य सुविधांची गरज ओळखून सुरू झाला नाही, तर त्या गरजा तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागात वैद्यकीय सेवांचा अभाव होता. या पार्श्वभूमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने अत्याधुनिक सुविधा आणि कुशल डॉक्टरांच्या टीमद्वारे हे अंतर कमी केले. किडनी विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी डायलिसिस हा जीवन वाचविणारा उपचार आहे. यापूर्वी, दक्षिण रायगड जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसिससाठी मोठ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत असे. आता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या डायलिसिस युनिटमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत. तसेच, प्रशिक्षित तज्ज्ञांच्या देखरेखीखाली डायलिसिसची सुविधा मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळाला आहे. कर्करोग, मेंदूचे विकार, तसेच इतर गुंतागुंतीच्या आजारांचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन सुविधा स्थानिकांसाठी वरदान ठरली आहे.
महिला आरोग्याच्या दृष्टीने प्रसूती व सिजेरियन ऑपरेशन्ससाठी लागणार्या सुविधांची उणीव ग्रामीण भागात जाणवत होती. अनेक वेळा रुग्णांना प्रसूतीसाठी मोठ्या रुग्णालयात हलवावे लागत असे, ज्यामुळे वेळेचा अपव्यय आणि जिवावर बेतणार्या घटना घडत होत्या. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने प्रसूती व सिजेरियन ऑपरेशन्ससाठी अत्यावश्यक यंत्रसामग्री, अनुभवी डॉक्टर, आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे. रुग्णालयात हर्निया, ऍपेंडिक्स, पित्ताशयातील दगड काढणे यांसारख्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे. स्थानिक रुग्णांसाठी ही सुविधा म्हणजे मोठा दिलासा ठरली आहे. या सेवेमुळे रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता उरली नाही, तसेच त्यांच्या वेळेची आणि खर्चाची बचत झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचा हा विस्तार आणि सुधारणा अजूनही सुरू आहे. येत्या काळात आणखी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या पाठबळाने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने हे रुग्णालय ग्रामीण आरोग्य सेवेचा आदर्श निर्माण करत आहे.
या उपजिल्हा रुग्णालयात माहे एप्रिल ते डिसेंबरपर्यंत 63692 बाह्य रुग्ण तपासणे, 7058 अंतर रुग्ण तपासणी तसेच, छोट्या-मोठ्या 2136 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात हर्निया, अॅपेंडिक्स, लीपोमा, गर्भ पिशवीवरील शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, आतड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, फॅक्चर झालेल्या हाडांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचबरोबर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर 625 प्रसूती झालेल्या असून महाड, मंडणगड, पोलादपूर, मुळशी, पाली, श्रीवर्धन, माणगाव व परिसरातील करण्यात आल्या. त्यापैकी 304 रुग्णावर सिजेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.