चार तासात महिला आरोपीचा घेतला शोध
। नागोठणे । वार्ताहर ।
चोरी करण्यात आलेल्या मौल्यवान दागिन्यांसह फरार झालेल्या महिला आरोपीला अवघ्या चार तासात मुद्देमालासह जेरबंद करण्याची दबंग कामगिरी नागोठणे पोलिसांच्या पथकाने नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. नागोठणे पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे नागोठणे शहरासह संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
या संदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेणसे गावाच्या लगत असलेल्या रिलायन्स कंपनीच्या निवासी संकुलातील जुना बी 30 या इमारतीमध्ये राहणार्या मनाली मिलिंद सहस्त्रबुद्धे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळी सहस्त्रबुद्धे यांची मुलगी एका बेडरूममध्ये झोपलेली असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दुसर्या बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातील लॉकरमधील सोन्याचे एक सरी मंगळसूत्र, सोन्याचे कानातील झुमक्याची जोड, जास्वंद फुलाच्या आकाराचा एक मोठा चांदीचा हार व लहान चांदीचे फुल असलेला छोटा हार, दोन जोडी चांदीचे पैजण अशा विविध प्रकारचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता.
रिलायन्स निवासी संकुलातील या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सोपोनि सचिन कुलकर्णी, सहाय्यक फौजदार प्रमोद कदम, पोह. महेश लांगी, पोकॉ.प्रकाश हंबीर यांनी चौकशी करून अज्ञात आरोपी महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सदर चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता चोरीची कबुली दिली. चोरीच्या या घटनेत चोरीस गेलेले रुपये 1 लाख 40 हजार किमतीचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा नागोठणे पोलिसांच्या पथकाने उघडकीस आणला आहे.