। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी पाड्यातील लोकांना विविध दाखले मिळावेत यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध दाखले देण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
विहूर आदिवासीवाड्यांवरील अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन कार्ड प्रदान करण्यात आले. आदिवासी समाज हा अशिक्षित असल्यामुळे सरकारी दप्तरी लागणारे आवश्यक कागदपत्रे कशी मिळवली जातात या बाबत त्यांना माहिती नसते. या परिस्थितीची जाणीव ठेऊन मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी स्वतः स्वारस्य दाखवत या समाजास विविध दाखले मिळावेत यासाठी अधिकारी आणि लागणारे अर्ज व साहित्य घेऊन विहूर ग्रामपंचायत येथे हजर राहून आदिवासी बांधवांना या योजनेचा फायदा करून दिला. दाखले वाटप उपक्रमामध्ये रेशनकार्ड 18, दुय्यम रेशनकार्ड 4, रेशनकार्डमध्ये नाव कमी जास्त करणे 4, जातीचे दाखले18, आधार कार्ड नोंदणी 9 अशा दाखल्यांचे वाटप करण्यात आले.