खानाव शाळेला संगणक संच भेट
। अलिबाग । वार्ताहर ।
खानाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अलिबाग येथील श्री सत्य साई सेवा संघटनेतर्फे कैलास गावडे यांनी संगणक संच भेट दिल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरविण्यातील अडचण दूर झाली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची इच्छा लक्षात घेवून शाळेतील पदवीधर शिक्षक रवींद्र थळे यांनी शाळेच्यावतीने लोकसहभागातून शाळेला संगणक संच मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. शाळेत उपलब्ध झालेला संगणक हाताळायला मिळताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
खानाव शाळेतील व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्याकडून राबविण्यात येत असलेला एक हात मदतीचा हा लोकसहभागावर आधारित एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा लोकसहभागातून शक्य त्या गरजा पूर्ण करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपश्री टोपले, उपाध्यक्ष अभय म्हात्रे, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र थळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, लता गावडे, अभिषेक गावडे, जयवंत मयेकर, यशवंत जोगळेकर व निशिकांत म्हात्रे, संतोष पालकर, संजीवनी थळे, नीलम बुरांडे, सचिन कांबळे, मनीषा बलकवडे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.