सीआरझेडचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील समुद्रकिनारी रमेश कुंदनमल यांनी बंगला बांधला आहे. सीआरझेचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका महसूल विभागाने ठेवला आहे. त्यामुळे कुंदनमल यांचा बंगला रडारवर असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांनी 1973 मध्ये जागा घेऊन बांधकाम केल्याने ही जागा सीआरझेडमध्ये त्या कालावधीत मोडत नसल्याचे कुंदनमल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महसूल विभाग काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मांडवा परिसरात समुद्रकिनारी अलिशान बंगले बांधण्याचे स्वप्न अनेकांचे आहेत. वेगवेगळे सेलिब्रीटीसह क्रीडा, व्यावसायिक क्षेत्रातील धनदांडग्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी करून त्याठिकाणी अलिशान बंगले बांधले आहेत. अलिबाग तालुक्यातील कोळगांव येथील गट नं. 322 मध्ये रमेश कुंदनमल यांनी जागा घेऊन बांधकाम केले. मात्र, सीआरझेडचे उल्लंघन करून विकास केल्याची तक्रार मागील वर्षी करण्यात आली. यानंतर पुढील कार्यवाहीसाठी अलिबागच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात हा प्रस्ताव पाठविण्यात आला. पत्रात नमुद केलेल्या मुद्यानुसार आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून कुंदनमल यांना देण्यात आले. त्यानंतर सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत उपविभागीय अधिकारी यांनी बांधकाम निष्कासित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे पत्र पाठविले. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांनी बांधकाम निष्कासीत करण्याचे अंदाजपत्रक महसूल कार्यालयाला सादर केले. त्यामध्ये कोळगांव येथील गट नं. 322 च्या बांधकाम निष्कासीतसाठी पाच लाख 11 हजार 181 रुपये अंदाजीत खर्च येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे कुंदनमल यांचा बंगला महसुल विभागाच्या रडारवर असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.
कोळगांव येथील समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर गट नं. 322 मध्ये साधारणपणे 15 गुंठे जमीन घेतली. त्याठिकाणी बांधकाम केले आहे. १९73 मध्ये ही जागा घेऊन बांधकाम केले. सीआरझेड उल्लंघन करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, याबाबत न्यायालयात दाद मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,1991 पुर्वीचे बांधकाम सीआरझेडमध्ये येत नाही. त्यामुळे माझे बांधकाम सीआरझेडमध्ये येत नाही.
रमेश कुंदनमल
व्यावसायिक
कुंदनमल यांचा 1973 ते 1974 मध्ये बांधलेला बंगला आहे. वाढीव काम केले आहे. साधारणपणे 1984 एनएसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. बांधकाम तोडण्याबाबत त्यांना नोटीस दिली होती. मात्र, ते सिव्हील न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे तुर्तास स्थगिती आहे.
मुकेश चव्हाण
उपविभागीय अधिकारी
