। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाडच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करणार्या चोरटा दिवसा नोकरी करुन रात्री महाड तसेच माणगाव परिसरातील बंद घरे, फ्लॅटची टेहळणी करुन संधी साधून घरफोडी करून पसार व्हायचा. विशेष म्हणजे घरफोडी, चोरीचे गुन्हे तो एकटाच दिवसाढवळ्या करायचा. त्याला सुतार कामाचा अनुभव असल्याने पंधरा ते वीस मिनिटात चोरीचा माल तो लंपास करायचा. अशा अट्टल गुन्हेगार मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे अंजर्लेला सध्या वास्तव महाडमध्ये असलेल्या संकेत मुकुंद आंजर्लेकर याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. आरोपी संकेत कडून 15 लाख 20 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला असून जिल्ह्यातील 11 गुन्हे उघडकीस आणले आहेत. संकेत याला 4 नोव्हेंबर पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दक्षिण रायगडात माणगाव, महाड, तळा, गोरेगाव परिसरात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे याच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना याबाबत तपास करण्यास आदेश दिले होते. त्यानुसार गावडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण आणि कर्मचार्यांचे पथक तयार केले.
पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांना गुप्त महितीदाराकडून घरफोडी करणारा आरोपी संकेत अंजर्लेकर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून महाड नवेनगर येथून आरोपी संकेत याला पथकाने अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील माणगाव, महाड, तळा, गोरेगाव येथे अकरा ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. रत्नागिरी जिल्ह्यातही तीन गुन्हे केल्याचे कबूल केले. 19 लाख 53 हजार 500 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेपैकी 15 लाख 20 हजार 500 चा मुद्देमाल संकेत कडून हस्तगत केला आहे. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोह शामराव कराडे, प्रशांत दबडे, अमोल हंबीर, पोना अनिल मोरे, अक्षय पाटील ( सायबर सेल), पोशी अक्षय जगताप, मपोशी जयश्री पळसकर यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.