| मुरूड-जंजिरा | प्रकाश सद्रे |
गेल्या चार महिन्यापासून मुरूड समुद्रात मोठी-छोटी मासळी मिळत मच्छिमार आर्थिक संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहेत. त्यांना डिझेलचे परतावे देखील शासनाकडून मिळालेले नाहीत. यावर्षी 1 ऑगस्ट पासून मासेमारी सुरू झाली. तिथपासून समुद्रात विविध संकटे आल्याने बहुतांश मासेमारी हंगाम वाया गेला आहे. सध्या समुद्राला उधाण असूनही मासळी मिळत नसल्याने मुरूड, एकदरा,राजपुरी येथील नौका अखेर घरवापसी करीत परतल्या आहेत.
एकदरा येथील मच्छिमार नाखवा रोहन निशानदार यांनी सांगितले की, पद्म जलदुर्ग जवळील समुद्रात या सीझनमध्ये कोळंबी मिळते. याला कोळंबीचा स्पॉट देखील म्हटले जाते; परंतु येथे देखील कोलंबी घटली. जेमतेमच कोळंबी मिळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे फायद्यापेक्षा तोटा जास्त होण्याची शक्यता असते. मासेमारी पुर्णतः बेभरवशाची बनली आहे. राजपुरी येथील धनंजय गिदी यांनी सांगितले की, येथील सुमारे 80 पेक्षा जास्त नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. छोटी मासळी देखील मिळणे दुरापास्त झाले आहे. सुरमई, रावस, पापलेट, जिताडा, घोळ अशी मोठी मासळी मिळत नाही. मुरूडच्या मार्केट मध्ये सकाळी सुमारे 40 टक्के कोळंबीच दिसून येते. खेकडे देखील खूप महागले आहेत. सर्व सामान्य तर मासळी परवडतच नसल्याने दुरूनच माहिती घेऊन घरी परततात किंवा चिकन घेऊन जातात. समुद्रात मासळी का मिळत नाही, या बाबत सर्वजण गोंधळून गेले असून या बाबत आर्थिक आघाडीवर कोणतीच मदत शासनाकडून मिळत नसल्याने कोलमडून पडले आहेत. मुरूडच्या खाडीत नौकांची मोठी गर्दी झाली असून जागा कमी पडू शकते. एकदरा येथील नौका किनार्यावर ओढण्यात आल्याचे दिसून आले.
मच्छिमार रोजगारावर
मासळी मिळत नसल्याने अनेक मच्छिमार अलिबाग-साखर येथे जाळी शिवण्यासाठी रोजंदारीवर काम करीत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक मासेमारी करणार्या नौका मालकांची आणि खलाशी वर्गाची हलाखीची स्थिती आल्याने दुष्काळाचे भीषण वास्तव धक्कादायक आहे. या पुढे कोणत्या परिस्थितीला तोंड दयावे लागेलं याची चिंता मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी मुरूड मासळी मार्केट मध्ये माहिती घेता फक्त टायनी जातीची लाल रंगाची कोळंबी आणि मांदेली विक्रीस आलेली दिसून आली. कोलंबीचे प्रमाण देखील 30 ते 40 टक्केच असल्याचे दिसून मोठया मासळीचा ठणठणाट होता. खवय्यांचा देखील मार्केटमध्ये शुकशुकाट दिसत होता. बहुतांश नौका मुरूड- एकदरा खाडीत नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.