28 धरणांमध्ये अवघा 42 टक्के पाणीसाठी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उन्हाचा कडाका सातत्याने वाढू लागल्याने रायगड जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणार्या धरणांमध्ये फक्त 42 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन विंधन विहिरींसह विहिरी दुरुस्ती व खोलीकरण तसेच गाळ काढण्यासाठी सुमारे दोन कोटी नऊ लाख 76 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, वर्षानुवर्षे पाणीटंचाई असणार्या भागातील परिस्थिती बदलेली नाही. पाण्याविना नागरिक आजही त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळा अद्याप दोन-अडीच महिने दूर आहे. परंतु, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीबाणी मात्र सुरू झाली आहे.
जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणार्या धरणांची संख्या 28 आहे. या धरणांद्वारे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या तापमानामुळे या धरणांमधील जलसाठा कमी झाला आहे. या धरणात सध्या 42 टक्के पाणी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यातील 15 धरणांमध्ये 11 ते 49 टक्के जलसाठा आहे. काही धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्यासाठी नागरिकांना विशेषतः महिलांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच कोटी 62 लाख 68 हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात एक हजार 16 गावे व वाड्यांचा समावेश आहे. आराखड्यात विहिरी खोल करणे, गाळ काढणे या कामासाठी 60 लाख 18 हजार रुपये, नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी तीन लाख 68 हजार रुपये, विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी 45 लाख 90 हजार रुपये, अशी एकूण दोन कोटी नऊ लाख 76 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात दरवर्षी विंधन विहिरीसह गाळ काढणे, खोलीकरण करणे अशा अनेक प्रकारची कामे घेतली जातात. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही कामे कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे तरतूद केलेला निधी नक्की कुठे खर्च केला जात आहे, अशा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आराखडा तयार केला जात असतानादेखील पाण्याचा प्रश्न सुटत का नाही, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. हा आराखडा फक्त कागदावरच नाही ना, अशी टीका होत आहे. पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकांना रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. काहींच्या गावांमध्ये दोन ते आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला जातो. मात्र, पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. हा प्रश्न कधी सोडविला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
– अशोक पवार, ग्रामस्थ
एप्रिलबरोबरच मे महिन्यात पाण्याची समस्या भेडसावणार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी टंचाई आराखडा तयार केला आहे. विंधन विहिरींसह विविध कामे केली जाणार आहेत. एप्रिलअखेरपर्यंत या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
– संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रायगड