रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांचे पार्किंग
। महाड । प्रतिनिधी ।
महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत येणारी अवजड वाहने औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे. मात्र या समस्येकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यातील मालाची आवक जावक करण्यासाठी विविध ठिकाणांहून ट्रक, टँकर, ट्रॉली, क्रेन आणि इतर अवजड वाहने ये-जा करीत असतात. ही वाहने कंपनीच्या आवारात उभी केली जात नाहीत. कंपनीच्या आवाराबाहेर रस्त्यालगत ही वाहने उभी केली जात असल्याने एमआयडीसी मधील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीस कायम अडथळा निर्माण होत आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कारखान्यांना सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र आजही अनेक सुविधा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. यातील ट्रक टर्मिलनकरीता सातत्याने मागणी केली जात आहे.
काही वाहने नडगाव गावाजवळ दुतर्फा उभी केली जातात. हीच स्थिती नांगलवाडी फाटा ते महाड औद्योगिक पोलीस ठाण्यापर्यंत दिसून येत आहे. महाड नांगलवाडी ते एमआयडीसी हा मार्ग संपूर्णपणे या अवजड वाहनांनी व्यापलेला आहे. सुदर्शन केमिकल, हायकल, प्रीव्ही ऑरगॅनिक, कोप्रान या कंपन्यांच्या समोर अवजड वाहने कायम उभी असतात. आसनताई गावाकडे जाणार्या मार्गावर आणि जिते गावाकउे जाणार्या धारिया इमेप्क्स, टायटन, कुसगाव गावाच्या मार्गावर एम्बायो, अनंत ऑर्गेनिक्स, इफ्का कंपन्यांसमोर कायम वाहने उभी असतात.
अपघाताचा धोका
रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. यामुळे कंपन्यांनी कंपन्यांच्या आवारात अवजड वाहने पार्क करण्याबाबत सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. मात्र कंपन्यांच्या आवारात असलेली जागेची मर्यादा आणि वाहनांची संख्या अधिक असल्याने हे ट्रक बाहेर उभे केले जातात.
औद्योगिक क्षेत्रात वाहतूक नियोजनाचा अभाव
