महाड तालुक्यात पशुवैद्यकीय डॉक्टरांचा अभाव

शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाचा परिणाम; जनतेमध्ये तीव्र संताप

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील पशुधनावर आलेल्या व्यापक संकटाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ऑक्टोबर 2022 पासून नऊ दवाखान्यांपैकी आठ दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती झाली नसल्याची संतापजनक वृत्त समोर आले आहे. महाडमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे माणगावसह मोबाईल व्हॅनचा अतिरिक्त कारभार दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मागील वर्षभरापासून महाड तालुक्यात विविध भागांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पशुधनाच्या संख्येवर याचा होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन याबाबत केलेल्या सविस्तर चौकशी दरम्यान ही धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.

महाड तालुक्यातील महाड मुख्य कार्यालयासह नऊ पशुवैद्यकीय दवाखाने असून यामध्ये नाते, वाळसुरे, चांडवे, तुडील, तेलंगे ,दासगाव, वरंध, महाड व पोलादपूर तालुक्यातील लोहारे समावेश आहे. मागील काही वर्षात या ठिकाणी नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची भरती करण्यात आली होती. मात्र, प्राप्त झालेल्या माहितीनुसार 31 ऑक्टोबर 2022 नंतर कंत्राटी डॉक्टरांची भरती सुद्धा शासनाकडून करण्यात आली नसल्याचे संताप जनक वृत्त प्राप्त झाले आहे. मागील वर्षी महाड तालुक्याच्या करण्यात आलेल्या पशुधनाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात 25 हजार 529 गाई , 6 हजार 519 म्हैस, 5 हजार 93 शेळ्या व 62 हजार 670 कोंबड्या एवढ्या संख्येने विविध विभागातील शेतकरी बांधवांकडूनच पालन केले जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मागील महिन्याभरापासून तालुक्यातील विविध भागांमध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात विविध रोगांनी त्रस्त असून अनेक ठिकाणी गाई, म्हशी व बकऱ्या, कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात कृषीवलच्या प्रतिनिधींनी महाडचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दुबल यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी, मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या साथींसंदर्भात आपण स्वतः विविध विभागात फिरून शेतकरी बांधवांना याबाबतची काळजी घेण्याबाबत तसेच औषधोपचार करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

शासनाकडून शेतकरी बांधवांसाठी केल्या जाणाऱ्या विविध घोषणा या अनेकदा प्रत्यक्ष स्वरूपात येत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यातच शेतकरी बांधवांच्या महत्त्वपूर्ण असलेल्या पशुधनाच्या उपचारा संदर्भात मागील तीन वर्षांपासून आठ दवाखान्यांतून पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त केले नसल्याने महाड पशुवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या दोन डॉक्टरांवर ही जबाबदारी आली आहे. यापैकी एक महिला वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने एकाच डॉक्टरांना संपूर्ण तालुक्यासह अन्य तालुक्यातील जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे शासनाने महाड तालुक्याच्या असलेल्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या पशुधनाबाबत तातडीने निर्णय घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version